Thursday, 20 January 2011

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण २१: उपसंहार (Afterword)

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण २१: उपसंहार (Afterword)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)


(थोडेसे वैयक्तिकः हे या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण आहे. ही मालिका लिहायला घेतली तेंव्हा "माझ्या हातून हा प्रकल्प पुरा होईल का" याबद्दल मलाच शंका होती. पण जवळ-जवळ गेले ७-८ महिने रोज रात्री ९ ते १२ आणि संपूर्ण रविवार असा माझा लेखनक्रम होता. माझ्या सौ.ने मला खूप प्रोत्साहन दिले. माझ्या वृद्ध आईला तर काळजीच पडायची रोज!
'मिपा'वर अनेकांनी खूप चांगले प्रतिसाद दिले पण मदनबाण आणि विकास पिसाळ यांनी अगदी सातत्याने प्रतिसाद तर दिलेच पण माझ्या लेखनातील अनवधानाने झालेल्या टंकनाच्या चुका आणि अर्थबोध नीट न होणारी वाक्ये माझ्या निदर्शनास आणून दिली. याबद्दल मी या दोघांचा ऋणी आहे.
आता 'साई-सुट्यो' झाले आहे आणि मला खरंच अगदी मोकळे वाटत आहे!
इथल्या अनुभवानंतर ही मालिका ई-सकाळवर प्रकाशित होत असून वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. प्रशंसेचे खूप निरोप मला वैयक्तिक ई-मेलवर येत आहेत. पुस्तकरूपाने हे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठीही विचारणा होत आहे. बघू इथे जकार्ताला राहून कितपत जमते ते!
त्यातच एक 'मिपा'वरील सहसभासदामुळे एका दिवाळी अंकातही या पुस्तकाची ओळख करून देण्याबद्दल विचारणा झालेली आहे.
या उपक्रमात सर्वात शेवटी एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क या उभय लेखकद्वयांचेही आभार मानतो आणि Atlantic Books या कॉपीराईटचे अधिकार धारण करणार्‍या प्रकाशन संस्थेच्या व्हॅलरी डफ आणि व्हानेस्सा केर यांचेही आभार मानतो.)


२००७ साल उजाडले आणि बुश-४३ सरकारला आपल्या उसवत चाललेल्या पाकिस्तानी धोरणाबद्दल काळजी वाटू लागली. ९/११ नंतरच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या ११०० कोटी डॉलर्सच्या मदतीपैकी (बहुतांश लष्करी) ३३ कोटी मदत पाकिस्तानच्या लष्करशहांनी हडप केली होती. ज.मुशर्रफ़ अमेरिकेच्या गळ्यातले एक लोढणे बनू लागले होते कारण इस्लामी अतिरेक्यांशी लढण्याऐवजी व लोकशाही आणण्याबद्दलच्या आधीच्या "शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी पाकिस्तानात लोकशाही आणणारच, कारण मी लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता आहे" अशा राणा भीमदेवी गर्जनांसह दिलेल्या
आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी मुशर्रफ़ यांनी हुकुमशाही सातत्याने राबविली होती. त्यामुळे पाकिस्तानी जनता चिथावली-डिवचली गेली होती व तिथे हिंसेचा डोंब उसळला होता व या अण्वस्त्रसज्ज राष्ट्रात कमालीचे अस्थिर वातावरण निर्माण झाले होते.

त्यांची राष्ट्राध्यक्षपदची मुदत संपत आली होती व घटनेनुसार त्यांना आपला गणवेश उतरवून पुन्हा निवडणुकीला उभे रहाणे जरूरीचे झाले होते. पण त्यांची गणवेश उतरवायला तयारी नव्हती. न्यायसंस्था यावेळी त्यांना घटना बदलू देणार नव्हती हे तिने स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या न्यायसंस्थेने नेहमीच लष्करशहांच्या बाजूने न्याय दिला होता व अशा लष्करशहांच्या कारवायांना हेतुपुरस्सरपणे कायदेशीर चौकट प्रदान केली होती असे पाकिस्तानचा इतिहास सांगतो. पण आता पाकिस्तानी लष्करावर चोरी, भ्रष्टाचार, निवडणुकीत मुद्दाम केलेले गैरव्यवहार वगैरेबद्दलचे आरोप करू शकणारा एक स्वतंत्र आवाज तेथील वकील वर्गाला सापडला होता व या स्वतंत्र आवाजाने लष्करी हुकुमशाहीला एक आव्हान दिले होते आणि त्याची परिणती न्यायमूर्ती इफ्तिकार मुहम्मद चौधरी या सरन्यायाधीशांच्या तडका-फडकी केलेल्या उचलबांगडीत झाली होती. या कृतीची प्रतिक्रिया फारच अनपेक्षित होती. एरवी दोन पक्षातल्या भांडणांचा फायदा घेऊन व त्यातून उद्भवलेले खटले चालवून त्यातून मिळविलेल्या लठ्ठ बिदागीवर छानछोकीत रहाणार्‍या वकीलवर्गाने या वेळी सर्व राज्यांच्या राजधान्यांत खूप उग्र निदर्शनें करून जनजीवन पार विस्कळित करून टाकले होते आणि नऊ वर्षें लष्करशाहीखाली भरडल्या गेलेल्या जनतेने मोठ्या संख्येने या निदर्शनांत भाग घेऊन त्यांना साथ दिली.

इतरत्र काश्मीरच्या व अफगाणिस्तानच्या अनेक युद्धांत सक्रीय अनुभव घेतलेल्या मुस्लिम उग्रवादी संघटनांनी व गटांनी ही संधी साधून मुशर्रफ यांच्यावर जबरदस्त दडपण आणले. पाकिस्तानी लष्कराशी व गुप्तहेरखात्याशी जवळीक असलेल्या कांहीं गटांनी मुशर्रफवर दुटप्पीपणाचे आरोपही केले: एका बाजूने खासगीत जिहादी गटांची प्रशंसा करायची व दुसर्‍या बाजूने अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरून त्यांच्या ध्येयांचा विश्वासघात करायचा! अमेरिकेच्या दृष्टीने सगळ्यात काळजीची गोष्ट ही होती कीं तालीबान ही संघटनाही नव्याने नुसती उभीच राहिली होती असे नाही तर ती चांगली बोकाळली होती व वजीरिस्तानात व वायव्य सरहद्द प्रांतात खोलवर उभ्या केलेल्या नव्या तळांचा वापर करून ते ’नाटो’ फौजांवर उग्र हल्ले चढवून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या अधिकराला सुरुंग लावून त्यांच्या संघटनेचा पगडा पाकिस्तानभर विस्तारण्यात गुंतले होते. स्वात’ प्रांतातून आलेल्या बातम्यांवरून तिथल्या सरकारी इमारतींवर तालीबानचा सफेत त्रिकोणी ध्वज फडकत होता तर रहादारीचे नियंत्रणही पगडीधारी तालीबानी करताना दिसत होते.

अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यापासूनचा इतिहास पहाता त्यांचा दरारा आता झाला होता इतका कमजोर या ८ वर्षांत कधीच झाला नव्हता. पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली व्हाईट हाऊसने (वेळेच्या अभावी व एकाद्या अस्सल व टिकाऊ तोडग्याआभावी) अमेरिकेच्या सर्व विदेशनीतिज्ञांनी व सर्वपक्षीय "आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग समिती"च्या (International Crisis Group) सभासदांनी एकमताने पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूलभूत कारण म्हणून "गौरविलेल्या" मुशर्रफसारख्या नालायक राज्यकर्त्याला कायदेशीर दर्जा प्रदान करून त्याला वाचवले व वरवरची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेतला व आगीत तेलच ओतले.मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक बिनलष्करी (मुलकी) नागरिक या नात्याने राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला. अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यानंतर त्यांचा दरारा आता इतका कमजोर कधीच नव्हता.

पाकिस्तानात लोकशाही स्थापणे-बावनकशी वा बेगडी-हा एकच मार्ग त्या देशाला स्थिर करण्यायोग्य दिसत होता. पण पाकिस्तानातील राजकीय स्वातंत्र्याचा अमेरिकेने कधीच पाठपुरावा केला नव्हता.
पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली वेळ आणि अस्सल व टिकाऊ तोडगा स्थापण्याची प्रवृत्ती या दोन्हींच्या अभावी अमेरिकन सरकारने ’मलमपट्टी’ तोडगा योजला. त्यानुसार पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूळ म्हणून सर्वांनी[१] निंदलेल्या मुशर्रफना बाजूला न करता कायदेशीर बिरुदावली देऊन वाचवायचे ठरले. मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक मुलकी नागरिक म्हणून राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या.

पंतप्रधानपदासाठी उमेदवार अमेरिकेने ठरवायचा आणि पाकिस्तानी जनतेने त्या उमेदवाराला निवडायचे अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला. ९०च्या दशकात त्या दोनदा पंतप्रधानपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप जरी झालेले होते तरी पाश्चात्य देशात शिकलेल्या व पाश्चात्य विचारसरणीशी जवळीक असलेल्या, कांहींशी धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या व मुख्य म्हणजे पाकिस्तानात अद्यापही खूप लोकप्रिय असलेल्या बेनझीर भुत्तो यांना "वासरात लंगडी गाय शहणी" या नात्याने निवडणुकीनंतरच्या सरकारात पंतप्रधान म्हणून निवडावे असा बाऊचर यांचा प्रस्ताव होता.

पण या "मुशर्रफ बचाओ" योजनेच्या मार्गात लक्षणीय अडचणी होत्या. कारण मुशर्रफ यांना बेनझीरबद्दल तर बेनझीरला मुशर्रफबद्दल पूर्ण तिरस्कार होता. पण बाउचरनी दोघांना आपापले प्रतिनिधी निवडायला सांगितले आणि या प्रतिनिधींत दुबई, लंडन, वॉशिंग्टन आणि इस्लामाबादला बैठकी झाल्या. या बैठकी इतक्या पुढे गेल्या कीं शेवटी अतीशय गुप्ततेत आणि तणावात हे दोघे जानेवारी २००७मध्ये अबू धाबीत समोरासमोर भेटले.

या बैठकीने त्यांच्यातील मतभेदांची दरी किती रुंद होती हे दाखविले. बेनझीरबाई लंडनहून रात्रभर प्रवास करून अबू धाबीला पहाटे पोचल्या होत्या. जरी दमल्या असल्या तरीही त्या मद्यपान करत नसल्यामुळे तशा तरतरीत होत्या. याउलट त्या बैठकीत मुशर्रफ़ इतके दारूच्या नशेत होते कीं त्यांना सुसंगतपणे बोलायला अडचण येत होती असे बेनझीरबाईंनी त्यांच्या विश्वासू सहाय्यकांना सांगितले. त्यांनी अशा भेटीसाठी अबूधाबीसारख्या जागेची निवड केल्याबद्दल नाराजी दर्शविली कारण जिथे लाखोंनी पाकिस्तानी लोक नोकरीसाठी आले आहेत अशा कुणीही त्यांना ओळखले असते तर या गुप्ततेतील हवाच निघून गेली असती. याला मुशर्रफ यानी "तुम्ही बुरखा का नाहीं वापरला?" असा उद्धट प्रतिप्रश्न मुशर्रफ़ यांनी केला.

बरेच महिने ही चर्चासत्रे चालू राहिली. या दरम्यान पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती आणखीच चिघळत चालली व शेवटी सप्टेंबर २००७ मध्ये दुसर्‍या भेटीनंतर एक तात्पुरता करार करण्यात यश आले. त्यानुसार मुशर्रफ आपले लष्करी पद सोडून एक नागरिक म्हणून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील व भुत्तो कुटुंबियांविरुद्धचे सर्व फौजदारी आरोप मागे घेतील आणि त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्र खाते, परराष्ट्रनीती, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा आणि वार्षिक अर्थसंकल्पातील वरील खात्यांच्या तरतुदी लष्कराकडेच ठेवायला बेनझीरबाई तयार झाल्या. १९८८मध्ये पंतप्रधानपदी असतानाचा लष्कराकडून झालेल्या अपमानाचा व पदच्युतीचा पूर्वीचा कटु अनुभव बाजूला ठेऊन बेनझीरबाई या कराराला तयार झाल्या.

पण ९०च्या दशकात दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या नवाज शरीफ यांचे विचार वेगळेच होते. त्यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला घोषणा केली कीं पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-N) चे नेतृत्व करायला ते पकिस्तानला परत येऊ इच्छित होते. अमेरिकेला हे नको होते कारण आधी अण्वस्त्रचांचणी करणार नाहीं असे कबूल करून बरोबर त्याविरुद्ध कृती करणार्‍या शरीफ यांच्यावर अमेरिकेचा विश्वास नव्हता. ते कमजोर आणि खोटारडे आहेत असे त्यावेळी त्यांच्याशी वाटाघाटी केलेल्या क्लिंटन यांच्या सहाय्यकांचे मत होते. पण शरीफना त्याची पर्वा नव्हती. "मुशर्रफ याना घालवलेच पाहिजे. ते आता संपलेच आहेत" असे त्यांनी त्यांच्या लंडन येथील सदनिकेत जमलेल्या त्यांच्या पुरस्कर्त्यांना सांगितले. आम्हाला हुमुमशहा नको आणि आम्ही तत्वपूर्ण भूमिका घेऊन लोकशाही आणू. आम्हाला जनतेचा असलेला पाठिंबा स्पष्ट दिसत असून मुशर्रफ आता संपले आहेत असेही ते म्हणाले.

बेनझीरबाईंच्या पाकिस्तानभेटीची पूर्ण आखणी करायच्या दृष्टीने बाऊचर यांच्या हद्दपार म्हणून त्या रहात होत्या त्या दुबईच्या व इस्लामाबादच्या वार्‍या चालू होत्या. तेवढ्यात १० सप्टेंबर रोजी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी लंडनच्या हीथरो विमानतळावरून प्रयाण केले. त्यांच्या एकनिष्ठ अनुयायांनी इस्लामाबाद येथे त्यांच्या वीरोचित आणि भव्य स्वागताची तयारी केली होती, पण ते एक दिवास्वप्नच ठरले. आपल्या समर्थकांना भेटण्याची संधीही त्यांना न देता या माजी पंतप्रधानांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने इस्लामाबाद विमानतळावरच अटक केली व कांहीं तासातच त्यांची पुन्हा सौदी अरेबियाला रवानगी केली.

आता बेनझीरबाईंना जलद पावले उचलणे जरूरीचे होते. त्या आपल्या दुबईतील राजेशाही बंगल्यातून जगभरचे फोन घेत होत्या. आपले पाकिस्तानला परत जायचे मनसुबे जाहीर करताना त्यांच्या मनात त्यांच्या अनेक कुटुंबियांच्या राजकारणापायी झालेल्या मृत्यूंबद्दल विचार येत असावेत.
"जन्माची वेळ व मृत्यूची वेळ विधिलिखितच असते व कुणीच त्या विधिलिखितात लिहिलेल्या वेळेच्या आधी मरत नाहीं." असे भुत्तोबाई बर्‍याचदा निर्विकारपणे म्हणत. "पाकिस्तानचे राजकारण आम्हा भुत्तोंच्या रक्तात खोलवर भिनलेले आहे तसेच ते माझ्याही रक्तात सतत दौडत आहे." असे त्या म्हणत. त्यांच्या सल्लागारांनी त्यांना धोका न घेण्याबद्दल आणि इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी तिचा उपयोग न करू देण्याबद्दल वारंवार सांगितले. त्या म्हणत की वॉशिंग्टनसह सगळे त्यांना वापरत आहेत हे त्यांना माहीत होते पण त्यांना खात्री होती कीं त्यांच्या परतण्यामुळे त्यांचे एका अशा शक्तीत रूपांतर होईल की जी कुणीही थांबवू शकणार नाहीं आणि त्या पाकिस्तानचे नेतृत्व करून आपल्या विधिलिखिताची पूर्तता करून आपली प्रतिमा झळझळीत करू इच्छित होत्या.

१८ ऑक्टोबर २००७ रोजी बेनझीरबाई कराची विमानतळावर उतरल्या. सगळ्यांना त्यांच्या विराट स्वागताचे आश्चर्य वाटले. सारे विमानतळ व बेनझीरबाईंना व त्यांच्या बरोबरच्या पाकिस्तान पीपल्स् पार्टीच्या नेत्यांना व पत्रकारांना नेणासाठी आयोजलेल्या बसला लाखोंचा गराडा पडला. त्यातले बरेचसे PPP चे अनुयायी होते, पण ’गंमत पहायला’ म्हणून आजूबाजूच्या सोसायट्यांमधून आलेले लोकही होते. लष्करी राजवटीच्या वरवंट्याखाली संथ-सुस्त व भविष्याबद्दल भयग्रस्त असलेल्या पाकिस्तानी जनतेत भुत्तोबाईंच्या आगमनाने एक उत्साहाची व अपे़क्षेची लाट उसळली होती. अफाट जनसमुदाय व त्याचा अनोख उत्साह पाहून "बेनझीरला कोण विचारतोय्. ती एक संपलेली शक्ती आहे" असे अनुदार व कुत्सित उद्गार त्यांच्या आधीच्या भेटींत मुद्दाम काढणार्‍या मुशर्रफना एक धक्काच बसला होता.

बेनझीरबाईंची ही रथयात्रा व संचलन ८ तास चालल्यावर एक धमाका, पाठोपाठ एक लखलखाट व नंतर एक प्रचंड स्फोट झाला! बेनझीरबाईंच्या या आनंदयात्रेत एकच गोंधळ माजला व घबराट उडाली. पहावे तिकडे रक्त आणि प्रेते विखुरलेली दिसत होती. दोन आत्मघाती अतिरेक्यांनी या आनंदयात्रेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात १४० लोक मृत्युमुखी पडले व ४० जखमी झाले व बेनझीरबाई थोडक्यात वाचल्या होत्या. बेनझीरबाईंनी लगेच पाकिस्तानी गुप्तहेरखात्यावर हा हल्ला योजल्याचा आरोप केला, तर पाठोपाठ गुप्तहेरखात्याने बेनझीरबाईंवर प्रत्यारोप केला कीं त्यांनी स्वत:चे राजकीय महत्व वाढवण्यासाठी मुद्दाम हा हल्ला घडवून आणला! बेनझीरबाईंनी आपल्या समर्थकांची पुन्हा एकदा जुळणी केली व बाऊचर यांच्या पुढाकाराने केलेल्या व उभयपक्षी मान्य असलेल्या अटींना त्यांनी केराची टोपली दाखवली. स्वतःच्या शक्तीचा व लोकप्रियतेचा अंदाज आल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला.

मुशर्रफ यांनी नुकतीच जिंकलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लष्करातून निवृत्ती घ्यायच्या आधीच लढवली होती व हे कृत्य संविधानाच्या अटीविरुद्ध आहे म्हणून त्यांची ही निवडणूक अवैध ठरवायची हिंमत सर्वोच्च न्यायालयाने दाखवली त्या पाठोपाठ परिस्थितीची पहाणी करण्यासाठी थांबलेल्या वकीलांच्या संघटनेने त्यांची चळवळ पुन्हा सुरू केली.

मुशर्रफ भडकले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला बरखास्त केले आणि नव्या स्वतःला समर्थन देणार्‍या न्यायाधीशांची नेमणूक केली. "पाकिस्तानी लष्कर या देशाचे तारणहार असून त्यांच्या मदतीशिवाय व हस्तक्षेपाशिवाय पाकिस्तान हा "एक देश" या नात्याने शिल्लकच रहणार नाहीं व ज्यांना हे मान्य नाहीं ते भरकटलेले लोक आहेत" असेही ते फूत्कारले. PPP व PML-N चे अनेक नेते, वकील, लोकशाहीवादी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार अशांना हजारोंनी तुरुंगात डांबण्यात आले. खासगी चित्रवाहिन्यांवर बंदी आणली गेली. BBC, CNNला येणार्‍या बातम्या कापल्या गेल्या आणि ब्रिटिश वार्ताहारांना परत धाडण्यात आले. ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानी शहरांत आणि गांवात सैनिक गस्त घालू लागले व सर्व मोठ्या रस्त्यांवर वहातूक मंदगती करण्यासाठी व वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी अडथळे (Roadblocks) उभारण्यात आले. एक आत्मघाती बॉम्बहल्ला लष्कराच्या रावळपिंडी छावणीत झाल्याबरोबर मुशर्रफ यांनी पाकिस्तानची राज्यघटना तात्पुरती स्थगित करून "अतिरेकी घटनांना जास्त योग्य पद्धतीने तोंड देता यावे म्हणून" आणीबाणी पुकारली.

भडकलेली आग विझावी म्हणून केलेल्या उपायाचा परिणाम भलताच झाला. "स्वतःविरुद्ध केलेला कुदेता" असेही त्याचे वर्णन कांहीं भाष्यकारांनी केलं. अलीकडे तुरुंगात डांबलेले १७००० कैदी निधर्मी, पुरोगामी आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. दहशतवाद्यांशी लढणारे सैन्य मुलकी आणीबाणीला तोंड देण्यासाठी तिथून शहरांत बोलावले गेले होते. उलट तुरुंगांतून मुशर्रफनी कट्टर सुन्नी लढवयांना त्यांच्याबरोबर तात्पुरता करार करून सोडले होते. पण मुशर्रफना पाठिंबा द्यायच्या ऐवजी या तालीबानी बिनलष्करी सैनिकांनी त्यांच्या कारवाया आणखीच तीव्र केल्या.

हे पाहून अमेरिकी व ब्रिटिश अधिकार्‍यांचीही पाचावर धारण बसली. मुशर्रफ यांनी मात्र पुन्हा एकदा "घूम-जाव" केले व ते सौदी अरेबियाला गेले. सौदी राजघराण्याच्या सदस्यांची सौजन्यभेट घेऊन ते नवाज शरीफना भेटले. मोजक्याच दिवसांनंतर मुशर्रफ यांच्या आशिर्वादाने नवाज पाकिस्तानला परतले[२]. बेनझीरबाईंच्या मतात फूट पाडण्याचा हा डाव होता. या घटनांनी मुशर्रफ जरासे धीट झाले व त्यांनी लष्करी गणवेश उतरवला व त्यांनी माजी ISI प्रमुख व अयशस्वी ठरलेल्या भुत्तो-वाटाघाटींत मुशर्रफ यांचे प्रतिनिधित्व केलेल्या ज.अश्फाक परवेज कयानी यांना लष्करप्रमुख बनविले. स्वत:च्या राष्ट्रपतीपदाच्या दुसर्‍या सेवाकालाला त्यांनीच नेमलेल्या न्यायाधीशांच्या बेंचकडून मान्यताही मिळविली. ८ जानेवारी ही निवडणुकीची तारीख ठरली. अटकसत्रांसारखे अत्याचार, आत्मघाती हल्ले, राजकीय पक्षांना मोठ्या सभा घ्यायची व प्रचार करायची बंदी अशी अनेक पावले टाकूनही मुशर्रफ यांची लोकप्रियता २१ टक्क्यावर आली[३] आणि बेनझीर व नवाज यांची लोकप्रियता जोरात वाढली. सर्व अडचणींवर मात करून जर मतदान रद्द केले गेले नाहीं तर मुशर्रफ मोठ्या फरकाने हरतील असे चित्र दिसू लागले.

भुत्तो समर्थकांना ते चौरस्त्यावर उभे असल्याची जाणीव होती. एका बाजूने त्यांना विजयाची चाहूल लागली होती तर दुसर्‍या बाजूने बेनझीरबाईंच्या जिवाची काळजी लागली होती. कारण अल्-कायदा व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना या दोन्ही संघटनांमध्ये त्यांना मारू पहाणारे गट होते. एक संरक्षक तटबंदी म्हणा किंवा एक तर्‍हेचा विमा म्हणा पण बेनझीरबाईंनी त्यांचा एक अमेरिकेतला माजी विश्वासू सहाय्यक मार्क झीगल यांना ई-मेल पाठवून मुशर्रफ यांच्या अधिकार्‍यांपैकी त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांची यादी पाठविली. तसेच PPP च्या नेत्यांनी अमेरिकेच्या अधिकार्‍यांसाठी व राजकीय नेत्यांसाठी कागदपत्रांची एक फाईल तयार केली होती ज्यात भुत्तो यांच्या निवडणुकीला सुरुंग लावण्याच्या सरकारी हालचालींची माहिती दिली होती.

२७ डिसेंबर रोजी लष्कराचा बालेकिल्ला असलेल्या व सैनिक व गुप्तहेरांनी गजबजलेल्या रावळपिंडी येथे एका सभेत भाषण करून परत येत असतांना आपला जयजयकार करणार्‍या समर्थकांचे हात हलवून आभार मानण्यासाठी बेनझीरबाईंनी गाडीच्या टपातून डोके बाहेर काढले आणि क्षणार्धात गोळीबाराचे आवाज झाले आणि बेनझीरबाई गाडीत कोसळल्या. पाठोपाठ त्यांच्या गाड्यांचा ताफा उधळून टाकण्यासाठी आत्मघाती अतिरेक्याकडून करविलेला एक मोठा स्फोटही झाला. कांहीं तासानंतर बेनझीरबाईंच्या (व त्यांच्या डझनावारी समर्थकांच्या) मृत्यूची बातमी जाहीर झाली. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर्सनी सांगितले कीं बेनझीरबाईंना डोक्याला व गळ्याला गोळ्या लागल्या होत्या शिवाय बाँबमधून बाहेर पडलेले धातूचे तुकडेही त्यांना सर्वांगावर लागले होते.

बेनझीरबाईंच्या हत्येचे पडसाद सर्व जगात उमटले व सर्व राष्ट्रांनी त्याची एकमुखाने निंदा केली. PPP नेत्यांनी ताबडतोब मुशर्रफला दोषी ठरविले. संतापलेले भुत्तो-समर्थक रस्त्यावर उतरले. क्षणभर असे वाटले कीं पाकिस्तान आता संपले! सरकारही घाबरले. सरकारी दावा होता कीं बेनझीरबाईंचे डोके गाडीच्या टपाच्या खिडकीवर आपटले व त्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. बेनझीरबाईंच्या मृत्यूने मुशर्रफ यांच्या अधिपत्त्याखालील एका भयानक जगाची ठळकपणे ओळख झाली जिथे रावळपिंडीसारख्या लष्कराच्या बालेकिल्ल्यातही हे अतिरेकी बेगुमानपणे व निर्भयपणे कुणालाही टिपून देशात एक भीतीचा उद्रेक उभा करून देशाला पूर्णपणे अस्थिरतेच्या जबड्यात ढकलू शकत होते.
अधिकृत प्रतिक्रियेने दोषाचे खापर त्यांच्या डोके बाहेर काढण्याच्या कृत्यावर फोडले. हे कारण अविश्वसनीय होते पण पाश्चात्य सरकारांनी विश्वास न ठेवण्याचे कांहींच कारण नाहीं असा सूर लावला. बेनझीरबाईंच्या मृत्यूनंतर पाश्चात्य सरकारांना PPP कांःईंच उप्योग नव्हता. दरम्यान बेनझीरबाईंच्या १८ वर्षीय बिलावल या मुलाला तिचा वारस नेमण्यात आले व त्याचे शिक्षण होईपर्यंत जरदारींना पक्षाचे नेते निवडले गेले.

त्यांच्या जिवंतपणी त्यांनी ऐक्यापेक्षा दुहीच जरी जास्त निर्माण केली असली तरी त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जरदारींच्या PPP व नवाज शरीफ यांच्या PML-N मध्ये निवडणूक समझोता झाला व ते भरघोस मताधिक्याने निवडून आले. ६७ टक्के मते मिळवून एक युतीचे सरकार स्थापन झाले व मुशर्रफ यांच्या ’कृपे’ने पाच वर्षें तुरुंगवास भोगलेले गिलानी पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदाचा शपथविधी चालू असताना मुशर्रफ यांच्या चेहर्‍यावरचा अस्वस्थपणा साफ दिसत होता. चित्रवाणीवर दाखविलेल्या या समारंभात त्यांनी गुळमुळीतपणे गिलानींना मान्यता दिली.

पाश्चात्य देशांनी फक्त लष्कराला समर्थन दिले पण मुलकी संस्थांना कमजोर बनविले व यामुळे पाकिस्तान एक दिवस खोल खड्ड्यात पडण्याची घाबरवणारी शक्यता डोळ्यासमोर दिसू लागली होती. अमेरिकेतील सर्वात मातब्बर व प्रभावी लष्करी तज्ञ आणि 'West Point'च्या इतिहासवेत्ते कागन यांनी ताकीत दिली कीं १९७९साली इराणमध्ये शहांचा पाडाव होणार याबद्दल भाकित करू न शकल्यामुळेच आयातुल्ला खोमेनींची इस्लामी क्रांती तिथे यशस्वी झाली होती. आता पाकिस्तानमध्ये नजीकच्या भविष्यकाळात लोकशाही अयशस्वी झाल्यामुळे अमेरिकेला इस्लामाबाद काबीज करावी लागणार असल्याचा धोका त्यांना दिसत होता.

बुश यांनी जरी मुशर्रफ यांना "एक संपूर्णपणे विश्वसनीय सहकारी" या शब्दात समर्थन देणे चालूच ठेवले असले तरी कागन यांनी ’व्हाईट हाऊस’ने आता "पाकिस्तान हे सर्वसंहारक अशा भावी प्रलयाची जननी आहे" या पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याच्या मतावर सखोल चर्चा करावी असा सल्ला दिला. पाकिस्तानच्या सेनेतील धर्मांध गट जास्त-जास्त बळकट होत असून या गटाने जर अचानक सीमांपासून निघून जायचे ठरविले तर जी पोकळी निर्माण होईल ती मूलगामी/कर्मठ अतिरेक्यांकडूनच व्यापली जाईल. अतिरेक्यांनी जर यशस्वी कुदेता घडवून आणला व अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर काय करावे लागेल याचा पाश्चात्य राष्ट्रांनी विचार करून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला. याहूनही जास्त अनिष्ट गोष्ट म्हणजे पाकिस्तानी लष्करात फूट पडून त्यांच्यातल्या लठ्ठालठ्ठीत मूलगामी गटाची सरशी होऊन त्यांनी अण्वस्त्रांच्या साठ्याचा संपूर्णपणे ताबा घेणे. २००७ साली हे पुस्तक प्रकाशित झाले तेंव्हां कागन अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट येथे ज्येष्ठ ’फेलो’ होते व त्यांनी अमेरिकेने आता आपल्या एकेकाळच्या सहकारी देशाची शकले होतील या शक्यतेची अटकळ बांधून त्यानुसार पावले उचलण्याची पूर्वतयारी केली पाहिजे असा सल्ला दिला होता.

थोडक्यात योग्य वेळ येताच अतीशय कर्तबगार (Elite) सैनिक पाकिस्तानात पाठवून सर्व अण्वस्त्रांचा साठा ताब्यात घेणे व ती अण्वस्त्रे पाकिस्तानाबाहेर काढून न्यू मेक्सिकोत एकाद्या गुप्त जागी ठेवणे किंवा ते शक्य नसल्यास पाकिस्तानातच एकाद्या अभेद्य जागी लपवून ठेवणे अशा कांहीं धोकादायक पर्यायांचा विचार करून ठेवला पाहिजे असेही कागन यांचे म्हणणे आहे. श्री. कागन पुढे म्हणतात कीं अमेरिकन लष्कराने आता पाकिस्तानच्या सरहद्दीचा भाग पादाक्रांत करून ही अटीतटीची लढाई तालीबान, त्यांचे मित्रगट आणि अल-कायदा यांच्यावर लादायला (शत्रूच्या भूमीत न्यायला) जय्यत तयार असायला हवे. पाकिस्तानचे इस्लामाबाद, पंजाब आणि दक्षिण व आग्नेय भाग ताब्यात घ्यायची आणीबाणीची योजना करून ठेवायला हवी!

या थराला गोष्टी का आल्या याचे मूल्यमापन कुणीच केले नाहीं किंवा त्याबद्दलच्या चर्चेतही हा विषय आलाच नाहीं. पण पाकिस्तानला ८०च्या दशकात अमेरिकेच्या संमतीने आणि सहकार्याने अण्वस्त्रसज्ज बनताना पाहून परराष्ट्रमंत्रालय, CIA आणि पेंटॅगॉनमधील नेक अधिकार्‍यांना स्वतःला फसविल्यासारखे वाटे. आणि आजच्या बुश-४३ यांच्या सरकारला ते अण्वस्त्रभांडार ताब्यात घ्यायचा सल्ला दिलेला पाहून या अधिकार्‍यांना आपण व्यक्त केलेली भीती खरी ठरल्याने एका बाजूने वाटणारा आनंद पण आपल्या म्हणण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने सार्‍या जगाला भविष्यकाळात भोगाव्या लागणार्‍या दुःखाच्या कल्पनेमुळे होणारा खेद अशा विलक्षण परस्परविरोधी भावना त्यांच्या मनात धुमाकूळ घालत होत्या.
याच अधिकार्‍यांना १९९० साली अमेरिकेने पाकिस्तानकडे कशी पाठ फिरविली हे माहीत होते आणि तेंव्हांही पाकिस्तानची मदत बंद केल्यास ते नक्कीच अण्वस्त्रविद्या विकून पैसे उभे करतील असे त्यांचे लष्करशहा सांगत होते तेही या अधिकार्‍यांना माहीत होते. त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध अण्वस्त्रप्रसाराच्या मुद्द्यावर खंबीरपणे उभे रहायचा अमेरिकेचा निर्णय ९/११नंतर मागे घ्यावा लागला. पाकिस्तानने केलेल्या पापांकडे काणाडोळा करून व सर्व अपराध पोटात घालून त्यांना दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला सहभागी करून घेण्यासाठी लोकशाहीवर मर्यादा घालण्याचा आणि अण्वस्त्रप्रसारात पाकिस्तानने घेतलेल्या सक्रीय भागाबद्दल मूग गिळून गप्प बसण्याचा करार अमेरिकेने पाकिस्तानबरोबर केला आणि लष्कराला पुन्हा वरचढ होण्यास मदत केली. आज सखोल मनन व विचार केल्यावर असाच निष्कर्ष काढावा लागेल कीं या काराराची किंमत पाश्चात्य राष्ट्रांना फारच महाग पडणार होती-केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर पाकिस्तानला विघटनाच्या कड्यापर्यंत नेण्याची. आणि आता तो देश हातातल्या अण्वस्त्रांमुळे होणार्‍या अण्वस्त्रयुद्धाच्या सर्वविनाश करणार्‍या खाईकडे सार्‍या जगाला ढकलत आहे.
----------------------------------------------------
टिपा:
[१] यात परराष्ट्रधोरणाचे अभ्यासक आणि International Crisis Group सारख्या अपक्ष संघटना होत्या.
[२] मुशर्रफ़ किती निर्लज्ज आहेत पहा! अगदी "कामापुरता मामा" जातीचे! सप्टेंबरमध्ये ज्यांनी शरीफना पाकिस्तानात येऊ दिले नव्हते तेच स्वत:ला गरज पडताच, स्वत:ला खुर्चीचा चटका बसू लागताच सर्व मानमर्यादा गुंडाळून शरीफनाच सौदीला जाऊन भेटतात काय आणि शरीफ परत पाकिस्तानात येतात काय! अगदी सोयीची शय्यासोबत!
[३] लोकमतासा कानोसा घेणार्‍या विश्वसनीय संघटनांनी मतदारांना विचारून केलेला अंदाज

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण२०-जागृती (Awakening)

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)


त्यांच्या पाकिस्तानला २००६च्या मार्चमधे दिलेल्या एकुलत्या एक भेटीत राष्ट्राध्यक्ष बुश-४३ म्हणाले होते कीं मुशर्रफना डावावर काय लावले आहे, त्यांची जबाबदारी काय आहे आणि शत्रूला हरविण्यासाठी काय डावपेच आखावे लागतील या सर्वांची पूर्ण माहिती आहे. अल कायदाला हरविण्यासाठी गुप्त माहितीची आपापसात देवाणघेवाण करून दहशतवाद्यांना शोधणे, पकडणे व त्यांना न्यायासनांपुढे खेचणे हेच मार्ग होते. आणि सरते शेवटी द्वेषभावनेच्या विचारसरणीची जागा आशेच्या विचारसरणीने घेणे हाच दहशतवादाला पराभूत करण्याचा योग्य मार्ग आहे हे मुशर्रफना नीट माहीत असून शेवटी दोघे मिळून (मुशर्रफ आणि ते स्वतः) विजय जरूर मिळवतील असेही ते पुढे म्हणाले होते.

पण बुश-४३ यांचे विमान उतरायच्या आधी अमेरिकन उपदूतावासातील (consulate) एक अधिकारी फॉय यांची गाडी स्फोटकाने भरलेली गाडी तिच्यावर आपटून आतील आणखी तीन माणसांसह कराचीतील अतिसुरक्षित समजल्या जाणार्‍या भागात उडवली गेली होती व सारे प्रणांना मुकले. अमेरिकेनेच दिलेल्या 'स्टिंगर' प्रक्षेपणास्त्राचा मारा होऊ नये म्हणून त्यांचे विमान दिवे न लावता उतरवले गेले[१]. लॉरा बुश आणि बुश-४३ विमानातून ३ मार्च २००६ रोजी उतरल्यावर त्यांच्या वधाचा प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून तयार ठेवलेल्या अनेक हेलीकॉप्टर्स आणि चिलखती गाड्यांच्या संरक्षणात ते अमेरिकन दूतावासाच्या आवारात पोचले. आजकाल या दूतावासात कांहीं कामासाठी जाणे म्हणजे एक 'प्रकल्प'च होता!
२४ तासांच्या त्यांच्या भेटीत बुश कुठल्याही आम पाकिस्तानी नागरिकाच्या जवळपासही जाऊ शकले नव्हते! गस्त घालायला हजारो पाकिस्तानी पोलीस, छत्रीधारी सैनिक, अमेरिकेची ब्लॅक हॉक हेलीकॉप्टर्स तैनात होती. इस्लामाबादवरील सर्व मुलकी विमान वहातूकही पूर्णपणे बंद होती. पण इतर शहरांत 'मद्रास्सा'च्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून धार्मिक पक्षांनी छोट्या-मोठ्या आगी लावून आपला निषेध व राग व्यक्त केला होता.

मुशर्रफ यांचाही या काळातील सारा वेळ स्वतःच्या समस्याबरोबर लठ्ठालठ्ठी करण्यातच गेला. पाकिस्तानला यायच्या आधी पाच दिवस बुश-४३यांनी करझाई यांच्या सरकारच्या समर्थनार्थ काबूलला भेट दिली होती. तालीबान्यांनी काबूलहून पळ काढला असला तरी त्यांचे अनुयायी अफगाणिस्तानच्या पश्चिम व दक्षिण भागात धारिष्ट्यपूर्ण व रक्तलांछित हल्ले करून सुधारणांच्या समर्थकांना आणि युतीच्या अफगाणी, ब्रिटिश आणि अमेरिकन सेनेला मदत करणार्‍यांना कंठस्नान घालू शकत होते. त्यावेळी करझाईंनी बुश-४३ना पाकिस्तानी लष्कर आणि ISI तालीबानला व अल कायदाला कसे आसरा व शस्त्रास्त्रे पुरवत होते याबद्दलच्या पुराव्याचे एक बाड दिले होते त्यात क्वेट्ट्याला एका पिक-अप व्हॅनमध्ये बसून सगळीकडे उजळ माथ्याने फिरणारे एकाक्ष मुल्ला ओमर व बिन लादेन यांच्यासकट पाकिस्तानात रहाणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि छोट्या सैनिकदलांच्या मुखियांच्या नावाची यादी होती. करझाईंचे म्हणणे किती सत्य होते याचा प्रत्यय १३ जानेवारी २००६ला आलाच होता. कारण त्या दिवशीच्या ड्रोन विमानांतून डागलेल्या 'हेलफायर' प्रक्षेपणास्त्रांच्या अफगाणिस्तानच्या सीमेपासून ५ मैलावर असलेल्या डामाडोला गावात केलेल्या हल्ल्यातून अल कायदाचे न. २ अयमान अल-जवाहिरी जरी वाचले असले तरी त्यांचे नरसंहारक्षम शस्त्रास्त्रविभागाचे प्रमुख अबू खबाब अल-मास्री मारले गेले होते.

पण मुशर्रफ गुर्मीतच होते. त्यांनी ८०,००० सैनिक अफगाणिस्तान सीमेवर तैनात करून त्यांना जवळ-जवळ पूर्णपणे नेस्तनाबूत केले होते असा दावाही त्यांनी केला व करझाईंच्या यादीतील ६६ टक्के नावे कालबाह्य होती असे सांगून तिची टर उडवली. बुश-४३ यांच्या आगमनाच्या आसपास २५ परदेशी दहशतवाद्यांना पाक लष्कराने ठार मारल्याची शेखी मिरवली पण ते सारे मृत मुले, स्त्रिया व विद्यार्थी होते असे पहाणार्‍यांनी सांगितले होते. बुश-४३ परत गेल्यावर "पाकिस्तानस्थित अल कायदा नेते इंग्लंडमधील व इतर युरोपमधील गंभीर व वाढत्या कार्यक्षमतेच्या दहशतवाद्यांच्या चिवट जाळ्यांचे संचलन करीत आहेत" असे अपूर्व असे जाहीर वक्तव्य एलीझा मॅनिंगम-बुलर या MI5च्या निर्देशिकेने केले. अमेरिकेचे ब्रूस रीडल[२] हेही त्याच मताचे होते. सरकारातून बाहेर पडल्यावर त्यांनी "अल कायदाचे प्रमुख पाकिस्तानात लपले आहेत" असे आपल्या पहिल्याच मुलाखतीत सांगितले. २००२ ते २००४च्या दरम्यान त्यांचे उद्दिष्ट जिवंत रहाणे व पाकिस्तानात क्वेट्टा व बलुचिस्तानात नवे तळ स्थापणे असे होते, २००५ साली त्यांचे पुनरुत्थान झाल्याची लक्षणे साफ दिसू लागली होती व २००६ साली ते बिन लादेन व अल-जवहिरी या नेत्यांच्या चित्रफितींच्या आक्रमक प्रचारासह व नव्या कारवायांसह सूडबुद्धीने प्रतिहल्ला करायला तयार झाले होते! त्यासाठी ते इंग्लंड व अमेरिकेत स्थायिक झालेल्या पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना वापरून दहशतवादी हल्ले करायच्या योजना आखत होते[३].

पाकिस्तानातील मैत्रीपूर्ण वातावरणत अल कायदाने जोरदार पावले टाकून तथाकथित प्रतिबंधित LeT, JeM[४] सारख्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले. मुशर्रफनीच उभ्या केलेल्या काश्मिरी दहशतवादी संघटना, अफगाणी समर्थक संघटना, तालीबान व बिन लादेन वत्यांचे सहकारी यांना आश्रय देणार्‍यांच्या कारवाया पाकिस्तान सरकार सहन करत होते अशीही ताकीद रीडेल यांनी दिली. निवेदनाचे समर्थन करण्यासाठीच जणू पाठोपाठ हेकमतयार[५] यांनी बिन लादेन व त्यांच्या सहकार्‍यांना तोरा बोरा पर्वतांमधून नोव्हेंबर २००१मध्ये कसे पाकिस्तानात सुरक्षितपणे पोचविले होते याबद्दल फुशारकी मारली. पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या छुपी मदत वापरून बलवान झालेले हेकमतयार हे कट्टर पाश्चात्यविरोधी मुजाहिदीन काबूलच्या पाडावात अल-जरकावी[५], अल-मकदीसी[५] यांच्याबरोबरीने लढले होते.

बुश-४३ परतल्यानंतर तालीबान व अल कायदाच्या पुररुत्थानाचे नेमके स्वरूप हे सुस्पष्ट होऊ लागले. उत्तर वझीरिस्तानमधील मिरामशहा नावाच्या एका दुर्गम गावातील हकीकत अंगावर शहारे आणणारी होती. विजेच्या खांबाना लटकवलेली बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेली अनेक शरीरे, शिरच्छेदानंतर तोंडात नोटा कोंबून जमीनीवर भिरकावलेले डोके, बाजारात छिन्न-विछिन्न केलेल्या अनेक शरीरांवर फेकलेले एक मृत कुत्रे आणि "गुन्हेगारांची आणि देवाच्या आज्ञा न पाळणार्‍यांची हीच गत होईल" असे म्हणून त्यातल्याच एका शरीरावर बंदुकीच्या दस्त्याचा फटका मारणारा एक लांब दाढीवाला मुल्ला ही कथा "नरकातील एक दृश्य" म्हणून जाविद हुसेन नावाच्या एका बलदंड पत्रकाराने प्रसिद्ध केली.

या भागांत काळ्या रंगाचा फेटा बांधलेल्या मुल्लांचीच सत्ता चाले व पाकिस्तानी लष्करी आणि मुलकी अधिकारीसुद्धा जाहीर मृत्युदंडांसारख्या घटनासुद्धा प्रेक्षकांसारखे फक्त बघत असत. ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी तिथल्या मुलकी अधिकार्‍यांना 'नव-तालीबानीं'च्या हालचालींना अजीबात अडसर आणायचा नाहीं अशा आज्ञाच दिलेल्या होत्या असे सय्यद जहीर उल-इस्लाम नावाच्या मुलकी अधिकार्‍यानेच सांगितले. पुढे ही मध्यमयुगीन प्रथा टंक, डेरा इस्माइल खान, बन्नू व कोहातसारख्या आजूबाजूच्या शहरातही पसरू लागली. संगीत, टीव्ही, हजामतीची दुकाने वगैरेवर बंदी आणण्यात आली होती.

पण ही आणीबाणी थेट मुशर्रफ यांच्या सैन्यात पसरण्याइतकी खोलवर गेली होती. पाकिस्तानी लष्कराकडे 'नव-तालीबानीं'ना चिरडून टाकू शकतील इतकी भरपूर शस्त्रास्त्रें असूनसुद्धा त्यांच्यावर ते स्वामित्व प्रस्थापित करू शकत नसल्याची कबूली दिल्यामुळे त्या दोघांत एप्रिल २००४मध्ये एक 'शांती-करार' झाला होता. त्याच नोव्हेंबरमध्ये त्यांना खुष करण्यासाठी या असामान्य उपायांना मुशर्रफनी होकार दिला होता. पाकिस्तानवरील निष्ठेची प्रतिज्ञा घेणे आणि परदेशी दहशतवाद्यांना आसरा किंवा मदत देणे बंद केल्याच्या बदल्यात त्यांना मुशर्रफनी त्यांना अल कायदाचे झालेले कर्ज फेडण्यासाठी ५,४०,००० डॉलर्सची मदतही दिली! या पैशाच्या विनियोगावर नियंत्रण ठेवणे अशक्यच होते आणि कुणीही 'नव-तालीबानीं'ना हे कर्ज कसे झाले असले प्रश्न विचारायची सोयच नव्हती! हे पैसे मिळताच एका गटाचा म्होरक्या बाईतुल्ला मेहसूद भूमिगत झाला.

सररोघा येथे नव-तालीबानींबरोबर झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानी लष्कराने २००५च्या फेब्रूवारीत दक्षिण वझीरिस्तान सोडायचे कबूल केले होते. तशाच तर्‍हेचा करार उत्तर वझीरिस्तानवर सत्ता असलेल्या आणखी एका नव-तालीबानींबरोबरही २००६च्या सप्टेंबरमध्ये केला गेला. त्यानुसार तेथील पायदळाचे व हवाई हल्ले थांबविणे, कैद्यांची मुक्तता करणे, सैन्याने बराकीत परत जाणे, नव-तालीबानींना त्यांच्या हानीची नुकसानभरपाई देणे आणि टोळीवाल्यांना हत्यारे बाळगायची परवानगी देणे वगैरे अटीही सरकारने मान्य केल्या. मुशर्रफना विचारून किंवा परस्पर ते माहीत नाहीं, पण पाकिस्तानी जनरल्सनी मुल्ला दादुल्लाबरोबरही करार केले. मुल्ला दादुला हे एक पायाचे मुल्ला असून नाटोच्या फौजांविरुद्ध नैऋत्य भागातील कंदाहार व हेलमंद या प्रांतात[६] बंडाळी केल्याबद्दल व अनेक नाटो सैनिकांच्या मृत्यूबद्दल जबाबदार असल्यामुळे अमेरिकेच्या most-wanted list वर आहेत. सीमेपलीकडील उद्रेकापेक्षा या गुप्त करारामुळे खौस्त, पाक्तिया व पाक्तिका या अफगाणिस्तानच्या पूर्वसीमेवरील प्रांतांत अराजक माजले असे नाटोच्या सेनाधिकार्‍यांचे मत आहे. पाकिस्तानी लष्कर गेल्यावर या नव-तालीबान्यांनी निर्भयपणे शस्त्रें व सैनिक सीमेपलीकडे पाठवले आणि तिथल्या गांवांत व शहरात हिंसक अराजक माजविले आणि दबा धरून (ambush) नाटोच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले. २००५मधील १६०० हल्ल्यांच्या तूलनेत २००६मध्ये ५००० हल्ल्यावर आकडा पोचला व आत्मघाती हल्ले २७ वरून १३९वर पोचले होते.

परिस्थिती इतकी बिघडली कीं सर्व स्थानीय अधिकार्‍यांनी मिळून ज्येष्ठ अधिकार्‍यांकडे अर्ज सादर केला. ६ मार्च २००७रोजी पाकिस्तानच्या बेशिस्त वायव्य सरहद्द प्रांताचे राज्यपाल ले.ज.अली महंमदअली औरकझाईंना एक अहवाल सादर करण्यात आला. त्यात अनेक मुद्दे होते: "कायदा, सुव्यवस्था राखणार्‍यांच्या औदासीन्यामुळे सरकारी पाऊल मागे पडले आहे, प्रत्येक दिवसागणिक सरकारचा वचक कमी होत चालाला आहे, ती पोकळी बिनसरकारी लोक व्याफून राहिले आहेत, सरकारी कर्मचार्‍यांचे आणि सरकारच्या समर्थकांचे मनोधैर्य खचलेले आहे, तालीबानीकरण, कायद्यांचा अभाव आणि दहशतवाद वाढत आहे हे ते मुद्दे होते.

नेहमी या भागाचा दौरा करणार्‍या एका वार्ताहाराने लिहिले होते कीं सरकारी धोरण पशुतुल्य लष्करी अत्याचाराच्या टोकापासून बंडखोरांपुढे शरणागती पत्करण्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत झुलले आहे. पेचप्रसंग सोडविण्याबद्दल विख्यात असलेला जागतिक विचारमंच 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी गटा'ने[७] "असले करार करूनही बंडखोरी चालूच राहिली असून सीमेवरील घूसखोरीही कमी व्हायचे नांव फ़्हेत नाहीं. लष्करी मोहिमा 'अल कायदा'ची वरिष्ठ लक्ष्ये टिपण्यात यशस्वी होत नाहीं आहेत, आणि कित्येक बंडखोरांना इतरत्र आश्रय मिळाला आहे" असे लिहीत अतीशय गंभीर चिंता व्यक्त केली.

पण नवतालीबानी आणि त्यांचे अल कायदा समर्थक यांचा उत्कर्ष आपोआप नाही झाला. अमेरिकन गुप्तहेरखात्याच्या आणि भारतीय गुप्तहेरखात्यातील वरिष्ठ अधिकारी या दोघांनी पाकिस्तानी गुप्तहेरखात्यातील कांही घटकांवर नवतालीबानींबरोबर संबंध ठेवणे, त्यांना प्रशिक्षण आणि आसरा देणे असे आरोप केले. त्यात मुशर्रफ यांचे २००४पर्यंत CJCOS असलेले ज.मोहम्मद अजीज, ISIचे भूतपूर्व Director General आणि बिन लादेनच्या सहकार्याने बेनझीरबाईंना ठार मारण्याचा कट केल्याबद्दल बडतर्फ केलेले ज.हमीद गुल, स्टिंगर प्रक्षेपणास्त्रे परत मिळविण्याच्या CIAच्या प्रयत्नांना खीळ घालणारे ISIचे आणखी एक भूतपूर्व Director General ज.जाविद नासीर, FBIने ९/११ हल्ल्याबद्दलचे संशयित ISIचे आणखी एक भूतपूर्व निर्देशक ज.महमूद अहमद, १९९५मध्ये बेनझीरबाईंच्याविरुद्ध कुदेता रचण्याच्या कटात सामील असलेले व २००१साली मुशर्रफनी माफी दिलेले ज.जहीर-उल-इस्लाम, मुस्लिम अतिरेक्यांकडून मारले गेलेल्या डॅनियल पर्ल यांना त्यांच्या मारेकर्‍य़ांकडे घेऊन गेलेले स्क्वा.ली.खालिद ख्वाजा[८] यांचाही समावेश होता. (खालिद ख्वाजा तालीबानशी (आणि ISIच्या इस्लामाबादच्या मुख्यालयाशी) संलग्न जमीया हफसा मद्रास्साच्या विद्यार्थिनींना बिन लादेनच्या समर्थनार्थ चिथावल्याबद्दल तुरुंगात होते.) मुस्लिम अतिरेक्यांच्या असल्या चळवळी कुठल्या आदिजमातींच्या प्रदेशात होत नव्हत्या तर पाकिस्तानच्या ऐन राजधानीत होत होत्या व मुशर्रफ यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया नव्हती.

धर्म आणि सरकार यांच्यातील नेहमीच्या युद्धखोर संबंधांमुळे सापळे विखुरलेल्या आणि घसरत्या वाळूच्या परिस्थितीत मुशर्रफना फारच काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. एका बाजूला धर्मांध अतिरेकी तर दुसर्‍या बाजूला नवी पाश्चात्य मित्रराष्ट्रें या दोघांत समतोल साधून त्यांना जगायचे होते. २७ मार्च २००७ला मोटरसायकलीवर स्वार असलेल्या आणि मुखवटे वापरणार्‍या बंदूकधारींनी पाकिस्तानच्या वायव्य भागातील FATAच्या बजौर भागात एका लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड फेकले त्यात ISIचे दोन (त्यातला एक उपसंचालकाच्या हुद्द्यावरचा) धरून पाच लोक मृत्युमुखी पडले. २९ मार्चला एका अज्ञात आत्मघाती बाँबरने इस्लामाबादच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका लष्करी प्रशिक्षण मैदानावर स्वत:ला उडवून दिले त्यात तीन सैनिक मृत्युमुखी पडले. पण पाकिस्तानवर राज्य करणे किती कां अवघड होत असेना, पण मुशर्रफ पाश्चात्य राष्ट्रांना देलेली वचने पूर्णपणे पाळत नव्हते व स्वतःची तुंबडी भरू पहात होते याबद्दलचा सबळ पुरावा वाढत होता. पाकिस्तानी लष्कर अल कायदाचा आणि तिच्या सहप्रवाशांचा धुव्वा उडवायला नाखूष किंवा असमर्थ होती हे कळल्यावर पाश्चात्य राष्ट्रांना त्यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात काय मिळत होते याबद्दलचे गंभीर प्रश्न उपस्थित होत होते[९]. २००७ सालापर्यंत अमेरिकन सरकारला कळून चुकले होते कीं आजच्या सोयीसाठी लष्कराला मलमपट्टी म्हणून खानसाहेबांचा बकरा बनविण्याच्या आणि अण्वस्त्रांच्या सरकारी काळ्याबाजाराला लपविण्याच्या त्यांच्या कृत्याची जबरदस्त किंमत त्यांना भविष्यकाळात मोजावी लागणार होती!

दहशतवादाबरोबरच्या युद्धात यशस्वी होण्यासाठी आणि अल-सुरी, अल-झरकावी आणि अल-मक्दीसी[१०] यांच्या प्रबंधाला विकल्प देण्यासाठी "द्वेषभावनेच्या विचारसरणीची जागा आशेच्या विचारसरणीने घेणे" या बुश-४३यांनी त्यांच्या २००६मधील पाकिस्तानला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या वेळी सुचविलेला उपाय लागू करण्यासाठी मुशर्रफ कांहींच करत नव्हते. पूर्वी २००२मध्ये पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षानी मुस्लिम अतिरेकी आणि दहशतवाद यांना तोंड देण्यासाठी "कुठल्याही एका संघटनेला किंवा एका पक्षाला कायदा मोडू दिला जाणार नाहीं" या शब्दात एक योजना सरकारी चित्रवाणीवरून जाहीर केली होती. त्यात सर्व मद्रास्सांची नोंदणी करण्याचे, त्यांचा अभ्यासक्रम ठरविण्याचे, त्यांचा अतिरेक्यांची केंद्रे असा दुरुपयोग होऊ न देण्याचे, परदेशांतून येण्र्‍या देणग्यांवर नियमित करण्याचे आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा घेतल्याशिवाय प्रवेश नाकारण्याचे वचन दिले होते. पण याबद्दलचे बिल पुढील तीन वर्षें रेगाळलेच होते. मार्गदर्शक म्हणून आदर्श मद्रास्सा स्थापण्याचे त्यांचे वचन नावापुरतेच राहिले. ३०० विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या अवघ्या तीन अशा मद्रास्सा अस्तित्वात आल्या. याविरुद्ध नोंदणी न केलेल्या इतर मद्रास्सांमधून लाखों विद्यार्थ्यांच्या मनावर जुन्या अभ्यासक्रमानुसार शिकवण बिंबविली गेली. लंडनमध्ये २००५साली मेट्रोवरील आत्मघाती बाँबहल्ल्यात स्वतःला आणि इतर सात जणांना मारून टाकणार्‍या शहज़ाद तन्वीरने लष्कर-ए-तोयबा चालवीत असलेल्या मद्रास्सामध्ये चार महिने प्रशिक्षण घेतले होते हे उघड झाल्यावर ब्रिटनने पुन्हा मुशर्रफ यांच्यावर दडपण आणले. मग मुशर्रफनी पुन्हा एकदा सर्व मद्रास्सांना ३१ डिसेंबर २००५च्या आत नोंदणी करा अन्यथा त्या बंद केल्या जातील हुकूम दिला. पण २००७ साली 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी गटा'ने[७] केलेल्या पहाणीत हा हुकूम कागदावरच राहिल्याचे आणि मशीदींच्या व मद्रास्सांच्या जाळ्यांच्या आश्रयाखाली सांप्रदायिक आणि जिहादी गट सक्रीय राहिले. ८००० मद्रास्सांना २२ कोटी डॉलर्सची मदत देऊनही बहुसंख्य मद्रास्सांनी नोंदणीस नकार दिला होता आणि त्यांच्या अभ्यासक्रमातील बदलही करण्यात आले नव्हते. मुशर्रफनी पैसे परत मागितले पण कुणिच ते परत केले नाहींत आणि मुशर्रफनीही तगादा लावला नाहीं[११].

जिहादी मद्रास्सा तर चालू होत्याच पण जिहादी विचारसरणी बिंबवणारी केंद्रें आणि सरकारच्या पाठिंब्याने उभे केलेली प्रशिक्षणकेंद्रेही जोरात चालू होती-आधी अफगाणिस्तानात लढण्यासाठी, मग काश्मीरमध्ये लढण्यासाठी व अलीकडे आंतरराष्ट्रीय जिहादचा भाग म्हणून अल कायदामध्ये सामील झालेली! ज्यांच्यावर बंदी आली त्या संघटना नांवे बदलून पुन्हा कार्यरत झाल्या. सिपाह-ए-साहाबाचे नाव बदलून ते मिल्लत-ए-इस्लामिया झाले, तिचे प्रमुख मौलाना अझम तारीक कौदेतून मुशर्रफच्या मेहेरबानीने बाहेर आले. ते जरी विरोधकांच्या गोळीला बळी पडले असले तरी त्यांची मिल्लत-ए-इस्लामिया कार्यरतच राहिली.

२००२च्या जानेवारीत जैश-ए-महंमदवरही निर्बंध घातले गेले होते व तिचा प्रमुख मौलाना अझर मसूद[१२] सार्वजनिक शिस्तबद्धता टिकविण्यासाठी कैदेत होते. ते मुशर्रफ यांचे चेले होते आणि पूर्वी हरकत-उल-अन्सार नावाची दहशतवादी संघटना चालवीत असत व पाश्चात्य पर्यटकांना काश्मीरमध्ये पळवून नेण्यात त्यांचा हात होता. त्यातला एक पर्यटक मारला गेला. पण मसूद यांच्यावर कुठलाही आरोप ठेवला गेला नाहीं आणि ते मुक्तच राहिले आणि त्यांच्या संघटनेचे नाव त्यांनी खुद्दाम-ए-इस्लाम असे बदलले.

कांही महिन्यांतच कायद्यात अशा पळवाटा काढायचे पेवच फुटले. लंडन मेट्रो बाँबहल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या लष्कर-ए-तोयबाचे प्रमुख हाफीज मुहम्मद सईद यांनी त्यांच्या संघटनेचे नांव बदलून जमात-उद-दावा असे ठेवले. दोघेही उघडपणे जिहादसाठी चिथावण्या देत होते व असे करणे मुशर्रफनी बेकायदेशीर घोषित केले असूनही भरती करण्याचा प्रयत्नही करत होते. कांहींही कारवाई न झाल्यामुळे या बेकायदेशीर संघटना मद्रस्सा चालवीतच राहिले.

सिपाह-ए-सहाबा, जैश-ए-महंमद, हरकत उल मुजाहिदीन आणि हरकत-उल-जिहादी-इस्लामी या संघटनांशी थेट संबंध असलेली भरतीची आणि प्रशिक्षणाची नऊ केंद्रें कॉलेजप्रवेशासाठी असते त्या पद्धतीवर चालू होती. या केंद्रांतून अनुयायी भराभर बाहेर पडत होते आणि त्याचे परिणाम लगेच दिसू लागले होते. अमेरिकेच्या दूतावासातील अधिकारी फॉय यांच्या वधाचा आरोप असलेले दोघे या संघटनांच्या मद्रास्सात तयार झालेले जिहादी होते. एक महिन्यानंतर ११ एप्रिल २००६ रोजी झालेल्या एका प्रचंड नरसंहारात एका आत्मघाती बाँबरने कराचीतील निश्तार पार्कमध्ये प्रेषक महंमद यांचा जन्मदिन साजरा करणार्‍या धार्मिक मेळाव्यावर हल्ला केला. त्यात ४७ माणसे मृत्युमुखी पडली आणि शंभरहून जास्त जखमी झाली. सिपाह-ए-सहाबा आणि लष्कर-ए-झांगवी या संघटनांवर संशय होता.

तीन महिन्यांनंतर २१ जुलै २००६ रोजी एका एका आत्मघाती बाँबरने पाकिस्तानी इस्लामी तेहरीक या पाकिस्तानातील सर्वात मोठ्या शियाधर्मियांच्या पक्षाचे अध्यक्ष अल्लामा हसन तुराबी यांना ठार मारले. ६ एप्रिलला त्यांच्या जिवावर झालेल्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. सिपाह-ए-सहाबा आणि लष्कर-ए-झांगवी यांच्यावरच प्रामुख्याने संशय होता. ३० सप्टेंबरला एका पाकिस्तानी आत्मघाती बाँबरने बारा नागरिकांना काबूल येथील एका सरकारी इमारतीसमोर ठार मारले. या हल्ल्याची योजना आणि यात भाग घेतलेल्या लोकांचा मागोवा घेतल्यास त्यांचा संबंध कराचीतील मस्जिद-ए-नूर या मशीदीने चालविलेल्या मद्रास्साशी लागला. या योजनेत सहभागी असलेल्या व्यक्तीने सांगितले कीं या हल्ल्याला (आणि यापुढच्या हल्ल्याला) हरकत-उल-मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेचे सक्रीय सभासद मौलवी अब्दुल शकूर खैरपुर यांनी मस्जिद-ए-नूर मद्रास्सात मंजूरी दिली होती

ज्यात ७५,००० लोक प्राणांना मुकले आणि तीस लाख लोक बेघर झाले त्या ऑक्टोबर २००५च्या भीषण भूकंपाने मुशर्रफ, अमेरिका व युरोपीय देशांनी बंदी घातलेल्या किंवा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवरील नजर ठेवायच्या यादीत नाव असलेल्या या सतरा दहशतवादी संघटनांना जणू संजीवनीच दिली. लष्कर आपल्या सुमार संघटनाशक्ती व सुमार नेतृत्वामुळे डोंगराळ विभागात साधनसामुग्रीसह पोचायचा अद्याप प्रयत्नच करीत असताना हे दहशतवादी गट त्यांची कार्यालये डोंगराळ भागात भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असल्यामुळे तिथे लगेच पोचले व त्यांनी अन्न, तंबू, आणि पांघरुणे लगेच वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी तिथे आपले कापडी झेंडे आणि फलक उभे केले. प्रतिबंधित संघटना अल-बद्र अल-मुजाहिदीन या संघटनेच्या फलकावर "१०,००० मुजाहिदीनांच्या रक्ताचे रक्षक" अशी घोषणा होती. असेच अनेक ध्वज तिथे पाकिस्तानी लष्कराच्या डोळ्यासमोर फडकत होते.

'जमात उद-दावा'ने (आधीचे नाव लष्कर-ए-तोयबा) मुजफ्फराबादला डॉ. अमीर अजीज खान यांच्या नेतृत्वाखाली एक क्षेत्रीय रुग्णालय उघडले. यांना २००२साली त्यांच्या अल कायदा आणि ओसामांच्याबरोबरील असलेल्या संबंधासाठी अटक झाली होती. (ते ओसामांना भेटलेही होते.) मुशर्रफनी जमात-उद-दावाची भूकंपानंतरच्या पहिल्या कांहीं आठवड्यातील गंभीर परिस्थितीला लगेच 'ओ' दिल्याबद्दल आणि त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली.

खालिद महंमद शेख या ९/११च्या योजकाला रहायला सुरक्षित जागा पुरविणार्‍या जमात-ई-इस्लामी या संघटनेने भूकंपग्रस्त बत्ताग्राम या गावात 'अल-खिदमत संस्थे'च्या नावाखाली (खिदमत=सेवा, service) तंबूमध्ये भरणारी एक शाळा काढली आणि शेकडो नव्याने अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना तिथे आसरा दिला. खुद्दाम-उल-इस्लाम (उर्फ जैश-ए-महंमद) या संस्थेनेही भूकंपग्रस्त भागात अल रशीद विश्वस्तसंस्थेच्या नावाने सेवाकार्य सुरू केले. जिहादाच्या तत्वावर चालणार्‍या आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने अल कायदाबरोबरच्य संबंधांमुळे निर्बंध घातलेल्या या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले[१३]. मुशर्रफ यांचे आवडते वाक्य होतेच "एका माणसाचे दहशतवादी दुसर्‍याचे स्वातंत्र्यसैनिक असतात" आणि त्यांच्या मतें अल कायदाशी जुडलेला काश्मीरमधील संघर्ष हे नेहमीच स्वातंत्र्ययुद्ध होते! हा शब्दच्छल फारच धोकेबाज होता कारण तशी भाषा वापरणार्‍यावर कुठलीच थेट जबाबदारी नव्हती आणि कट्टर इस्लामी लोकांना खुष ठेवायला असा शब्दच्छल उपयोगी होता!

भूकंपग्रस्त भागात भुकेचा प्रश्न तीव्र होणार होता. मद्रस्सांतील सुधारणांच्या बाजूने असणार्‍यांना वाटू लागले कीं या (असुधारित) मद्रास्सा नष्ट झालेल्या सिक्षणसंस्थापद्धतीची जागा घेतील. हा भाग जिहादीसाठी एक सुपीक जागा बनली होती. नव्याने अनाथ झालेल्या मुलांना विश्वासात घेणे व त्यांना कट्टर जिहादी दीक्षा देणे सोपे झाले होते. नंतर खरे आई-बाप त्यांच्याकडे मुले परत मागायला आले तेंव्हां जमात-उद-दावाच्या लोकांनी त्यांना परत द्यायला नकारही दिला.

पाकिस्तानमध्ये तालीबानी, नव तालीबानी, अल कायदा, सुन्नी पंथाचे नियमबाह्य स्वयंसेवक आणि कुणाशीच संलग्न नसलेले-लढण्यासाठी जगणारे-सटरफटर-'दादा'प्रवृत्तीचे, कधीही बॅग भरून व पवित्र कुराण ग्रंथाची एक प्रत घेऊन कुठेही लढायला निघू इच्छिणारे मुल्ला अशी अतिरेक्यांची रेलचेल होती. पाश्चात्य राष्ट्रांतील जुन्या पठडीतील विचारवंतांना मोठी भीती ही होती कीं पाकिस्तानातील अण्वस्त्रें या भिन्न अतिरेक्यांच्या हातात पडतील-मग ती परमाणूप्रकल्पातील त्रुटींमुळे असो किंवा परमाणूप्रकल्पातील असंतुष्ट शास्त्रज्ञांमुळे असो किंवा कहूता तंत्रज्ञान विकून पैसे मिळवायला तयार असलेल्या पाकिस्तानातील तत्वहीन निर्धन सरकारामुळे असो. पण बुश-४३ यांच्या नव्या पठडीतील विचारवंतांचे लक्ष इराक, उ.कोरिया व खास करून इराणमुळे इतके विचलित झाले होते कीं त्यांना या सर्व आपदांचे मूळ पाकिस्तान आहे याचेच विस्मरण झाले होते. २००६ साल आले तोवर परमाणूप्रकरणाला अडगळीत टाकण्यात आले होते. खानसाहेबांच्याबद्दल बाहेर पडणार्‍या बातम्यात फक्त त्यांच्या ढासळणार्‍या प्रकृतीबद्दल बातम्या असायच्या. पण त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबद्दल मात्र इशारा होता. म्हणजे मुशर्रफ-आर्मिटेज यांच्यातल्या करारालाही मुशर्रफनी धुडकावलेले दिसत होते. २४ ऑगस्टला पाकिस्तानी अणूबाँबचे पिताश्री प्रोस्ट्रेटच्या कर्करोगाने आजारी असल्याची बातमी देतांना त्यांचा अशक्त पण हसरा चेहेर्‍याचा फोटो जाहीर करण्यात आला. सौदी अरेबियाच्या मशीदींतून त्यांच्या झटपट बरे होण्यासाठी खास प्रार्थनाही झाल्या. ७ नोव्हेंबरला खानसाहेबांची स्थानबद्धतेतून तात्पुरती मुक्तता करण्यात आली आणि त्यांना कुटुंबीय आणि वैयक्तिक डॉक्टर ज.चोहान यांच्यासह सरकारी विमानातून कराचीला आणण्यात आले व तिथे ते कांहीं दिवस राजिया हुसेन या आपल्या बहिणीकडे कांहीं दिवस राहिले आणि मगच आगा खान विश्वविद्यालय रुग्णालयाच्या खासगी विभागातील १३० नंबरच्या खोलीत दाखल झाले. तीन दिवसानंतर त्यांची प्रोस्ट्रेट ग्रंथी काढून टाकण्यात आली. १६ सप्टेंबरला तारखेला रुग्णालयातूनही ते पुन्हा आपल्या बहिणीकडे कांहीं आठवडे राहिले. खानसाहेबांच्या जवळच्या वर्तुळांतून सांगण्यात आले कीं या काळात कहूता, परमाणू उद्योग आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका पोचवणार्‍या घटनांच्या मालिकेनंतर मुशर्रफ त्यांचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न करत होते.

पहिली घटना होती ११ महिन्यांपूर्वी! ऑक्टोबर २००५च्या भूकंपामुळे काश्मीर भागात नुकसान झाले होते असे नाही पण कहूतालाही झाले होते, पण ते गुप्त ठेवण्यात आले होते. खानसाहेबांच्या जवळच्या सहकार्‍यांचा दावा होता कीं भूकंपामुळे त्यांच्या पायाच्या काँक्रीटला चिरा पडल्यामुळे एकूण सेंट्रीफ्यूजेसपैकी एक तृतियांश सेंट्रीफ्यूजेस नष्ट झाल्या होत्या आणि त्या भूकंपाच्या वेळेला फिरत होत्या त्यामुळे त्यातले भाग चोहीकडे फेकले गेले. १९८३च्या भूकंपानंतर पायाचे काँक्रीट बळकट करण्यात आले होते तरीही २००५चा भूकंप इतका जोरदार होता कीं त्याने गदारोळ माजवला कारण एका क्षणात हजारों सेंट्रीफ्यूजेस भग्न होऊन त्यांचे भाग वाकडे-तिकडे झाले होते आणि कच्चा माल भरण्याची आणि काढायची यंत्रणा तुटली होती आणि UF6चे लोट आणि अंशत: शुद्धीकृत युरेनियम सगळीकडे पसरले होते. पाकिस्तानी सरकारने आणि लष्कराने चुप्पी साधली होती. पण कहूताप्रकल्पातील उत्पादन ताबडतोब बंद केले गेले होते आणि अनेक तज्ञांचे गट सर्वनाश आणि राजनैतिक नुकसान थांबविण्यासाठी पाठविले गेले होते. कुठलीही बातमी बाहेर जाऊ दिली गेली नव्हती! एकाच माणसाला अशा परिस्थितीत काय करायला हवे ते माहीत होते खानसाहेबांना. पण मुशर्रफनी त्यांना खोट्या आरोपांत गोवून त्यांचा जाहीरपणे अपमान केला होता आणि ISI कडून त्यांचा छळही केला होता.

सगळ्या महत्वाच्या व्यक्ती अटकेत होत्या. मुशर्रफनी सर्वाची हकालपट्टी केली होती त्यामुळे हा घोळ साफ करू शकेल असा कुणी अनुभवी माणूसच कहूताला नव्हता. शेवटी मुशर्रफ घाबरून इतके निराश झाले झाले कीं ते खानसाहेबांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली कीं त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञाना बरोबर घेऊन कहूताला परत यावे. जर त्यांना अटकेतून दोन आठवड्याची मोकळीक मिळाली तर ते हे काम करतील असे खानसाहेबांनी मुशर्रफना सांगितले. 'अडला हरी' न्यायाने मुशर्रफ तयार झाले. पण झालेल्या अपमानामुळे संतापलेल्या खानसाहेबांनी आपला शब्द पाळला नाहीं. त्यांना आपल्याला वेढून अपमानित केलेल्या माणसाला मदत करवेना. त्याचा बदला म्हणून खानसाहेबांच्या आयेशा नावाच्या मुलीला त्यांना भेटायची सवलत मुशर्रफनी काढून घेतली!

शेवटी अननुभवी इंजिनियर्सना संरक्षक कपडे चढवून आत पाठविण्यात आले. खानसाहेबांच्या सहय्यकाने त्याना बसमधून उतरताना पाहिले. या नेतृत्वहीन गटाला कामा माहीत नव्हते. त्यातले बरेच दगावले. कहूताला मार्गावर यायला खूप काळ लागला. पण सार्‍या जगाला परमाणूप्रकल्पातील अपघाताची नाचक्की करणारी बातमी जगाला सांगण्याची वेळ मुशर्रफ यांच्यावर आली नाहीं कारण खानसाहेबांनी अतिशुद्धीकृत युरेनियमचा भरपूर साठा बनवून ठेवला होता म्हणून कहूता बंद पडल्याची बातमी दडपता आली.

पुढच्याच मार्चमध्ये बुश-४३ वरकरणी जरी भूकंपग्रस्तांच्या मदतीबद्दल चर्चा करण्यासाठी आणि मूलगामी इस्लामला आवर घालण्यात पाकिस्तानकडूनच्या अपेक्षांबद्दल बोलायला आले असले तरी खरा उद्देश अमेरिकेच्या भारताबरोबरच्या परमाणूकराराबद्दल माहिती देऊन पकिस्तानचा विश्वास पुन्हा संपादण्यासाठीही होता. बुश-४३ यांनी भारत व पाकिस्तान वेगळे देश असून त्यांचे इतिहास आणि त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत असे इस्लामाबादला पोचल्यावर निवेदन केले होते. पण भारताबरोबरचा हा करार मुशर्रफ यांच्याबाबतीत मोठी अनर्थकारक घटना होती. या आधीची तीस वर्षें परमाणूप्रकल्पाकरता साधनसामुग्री विकत घेतल्याबद्दल छळ सहन केलेल्या पाकिस्तानला डावपेच, वाणिज्य आणि लष्करी या तीन्ही बाबतीत फायदेशीर असलेला सौदा आपल्या सीमेपलीकडील कट्टर वैर्‍याला दिल्याचे पहावे लागत होते. मुशर्रफना व त्यांच्या विरोधकांना बुश-४३ नवे मित्रराष्ट्र शोधत असल्यासारखे वाटले.

बुश-४३ यांच्या आगमनाआधी कांहीं दिवस मुशर्रफ यांनी भारताबरोबरच्या व्यवहाराची बरोबरी करण्यासाठी बुश यांच्याकडे काय मागणी करावी खानसाहेबांचा सल्ला विचारला होता. खानसाहेबांनी त्यांना सांगितले कीं ते मुशर्रफना मदत करू शकत होते पण त्यांनी मदत द्यायचे नाकारून त्याऐवजी बुश यांचे बूट चाटायचा सल्ला दिला[१४]. बुश यांची भेट पाकिस्तानच्या पदरात कांहींही न पडता संपली. बदल्याच्या भावनेने मुशर्रफनी खानसाहेबांचे उरलेसुरले समर्थकही कहूतापासून दूर केले. त्यांचे उत्तराधिकारी जाविद मिर्झांना १ एप्रिल २००६ला सेवानिवृत्ती दिली. मोहम्मद करीमना त्यांच्याहून १३ ज्येष्ठ अधिकार्‍यांना डावलून कहूताप्रकल्पाचे प्रमुख नेमण्यात आले, पण करीम एक साधारण कर्तृत्वाचे अधिकारी होते, पण मुशर्रफना जवळचे होते आणि त्यांना त्या कामाची फारशी माहिती नव्हती. खानसाहेबांच्या सेवानिवृत्तीपासून आणित्यांच्या स्थानबद्धतेपासून सुरू झालेली कहूतातील सत्तास्पर्धा शेवटी अशा तर्‍हेने संपली पण प्रकल्प A/B मध्ये अजून धुगधुगी होती.

जानेवारी २००६मध्ये जर्मन, ब्रिटिश, फ्रेंच आणि बेल्जियन या देशांनी आपली गुप्तहेरांकरवी मिळविलेली माहिती एकत्र करून एक मोठा अहवाल IAEAला सादर केला ज्यात अण्वस्त्रांच्या बेकायदा संशोधन आणि खरेदी करण्याबाबत आरोप असलेल्या दर्शनी कंपन्यांच्या नावाच्या याद्या, ठिकठिकाणचे दूतावास, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालयें आणि सेवाभावी संस्थांची तपशीलवार माहिती होती. ते अण्वस्त्रप्रसाराचे प्योंग्यांगपासून बेजिंगपर्यंत, सोफियापासून तेहरान, सीरिया, इजिप्त, सुदान ते इराण-उ.कोरियापर्यंत असे जगभर पसरलेले प्रचंड जाळेच होते! युरोपमधील अभियांत्रिकी कंपन्याना या यादीतील कंपन्यांपासून दूर रहाण्याची ती एक ताकीदच होती. त्यांच्याशी दुहेरी उपयोगाच्या गोष्टी विकायचा व्यवहार केल्यास याबाबतचे अज्ञान आता त्यांना उपयोगी पडणार नव्हते. या अहवालात मुशर्रफ यांच्यासाठी एक वाईट बातमी होती! पाकिस्तान अद्यापही गुप्तपणे परमाणू तंत्रज्ञान विकत घेत होता व विकत होता. खानसाहेबांच्या कबूलीनंतर परमाणू क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर चाललेल्या खरेदीबद्दलच्या नोंदी झाल्या होत्या. त्यानुसार वेगवेगळे साहित्य आणि घटकभाग ज्या प्रमाणावर आयत होत होते ते इस्लामाबादच्या जरूरीपेक्षा खूपच जास्त होते. यावरून त्यांची आयात पुनर्निर्यातीसाठी होती आणि आता तरी ही निर्यात दुष्ट शास्त्रज्ञांच्या नावाने खपविली जाणे शक्य नव्हते!
खानसाहेबांना घालवून दिल्यावर आणि त्यांच्या वारसाला सक्तीची सेवानिवृत्ती दिल्यानंतरसुद्धा कहूता प्रकल्पातून युरोपमधील आखाती देशातील, दक्षिणपूर्व देशातील दर्शनी कंपन्यांद्वारे गिर्‍हाइकाची खोटी नांवे लिहिणे, निर्यातीचे खरेखुरे शेवटचे स्थान न लिहिणे, कस्टम्सच्या कागदात हेराफेरी करणे हे उद्योग चालूच राहिले. लिबियासाठी अल्युमिनियमचे पाइप्स बनविणार्‍या नव्या कंपनीशी व्यवहार चालूच होता. खानसाहेबांना बाजूला केल्यानंतर मुशर्रफ यांच्या मर्जीतले लोक अधिकाराच्या जागांवर होते आणि गद्दाफींनी आपला परमाणूप्रकल्प २००३मध्ये बंद केला होता त्यामुळे नवे गिर्‍हाईक कोण होते हे कुणालाच माहीत नव्हते!

पाकिस्तान-उ.कोरियामधील संबंध चालूच होते. अहवालानुसार शस्त्रास्त्रांची निर्यात हा उ.कोरियाचा कमाईचा मुख्य उद्योग बनला होता आणि इजिप्त, इराण आनी सीरियाबरोबर पाकिस्तान त्यांचे मुख्य गिर्‍हाईक होते. तीसपेक्षा जास्त दर्शनी कंपन्या आणि संघटना शस्त्रास्त्रविक्रीच्या या जाळ्यात होत्या. पण पाकिस्तानने उ.कोरियाला परमाणूसंबंधीच्या पश्चिम युरोपीय खरेदीजाळ्यात माल आणि मशीनरी यांच्या खरेदीसाठी गोवले होते. तिथे स्वस्तात घटकभाग बनत होते आणि पाकिस्तान ते इतर गिर्‍हाइकांना विकत होता.

नव्वदीच्या दशकाच्या शेवटी ताहीर यांनी शहा आलम या मलेशियातील एका मोठ्या शहरात सेंट्रीफ्यूजेसचे घटकभाग बनवायचा कारखान उघडला होता आणि त्यातील गुंतागुंतीचे घटकभाग दक्षिण आफ्रिकेतील आणि युरोपमधील कंपन्यात बनवून घेऊन ते सारे दुबईला आणले जात होते. आता उ.कोरियानेही हाच मार्ग अवलंबला होता व कांहीं भाग चीनमधील सरकारी अभियांत्रिकी कंपन्यात बनवून घेणे सुरू केले. यातील कांहीं कंपन्यांवर डिसेंबर २००५ पासून अमेरिकेने निर्बंधही घातले गेले होते.

चीन-पाकिस्तान-उ.कोरिया हे त्रिकूटही अद्याप अभंगच राहिले होते. या तीन देशांचा युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या घटकभागांचा, प्रक्षेपणास्त्रांबद्दलच्या तंत्रज्ञानाचा आणि नेहमीची शस्त्रास्त्रे यांचा व्यापार इराण, सौदी अरेबियासारख्या जुन्या गिर्‍हाइकांबरोबर तसेच इजिप्त, सीरियासारख्या नव्या गिर्‍हाइकांबरोबर चालूच होता.

सगळ्यात भीतीदायक शोध होता कीं खानसाहेबांनी जमविलेले लाखों घटकभाग ते सेवानिवृत्त झाल्यापासून गायब झाले होते. १९९८ ते २००१च्या दरम्यान हरवलेल्या घटकभागांचा ३२ कोटी डॉलर्सचा द्व्यर्थी सामुग्रीचा सगळ्यात मोठा हिस्सा लिबियासाठी बनविलेला होता पण सुदानच्या गुदामात ठेवला होता. २००६साली आणखी एका पाकिस्तानी संस्थेने त्याचा सामुग्रीचा ताबा घेतला होता आणि तिला दुसरीकडे पाठविले होते. तो ना सुदानमध्ये होता, ना लिबियात! गुप्तचरसंघटनांनी सुचविले कीं तो कहूतानेच पुन्हा हाताळला होता व आता तो तेहरानमध्ये असावा. याचा अर्थ आता हा व्यापार मुशर्रफ यांच्या देखरेखीखाली सुरू झाला होता.

लिबियाला पाठविलेल्या P-2 जातीच्या सेंट्रीफ्यूजेसच्या नऊ फिरणार्‍या भागांपैकी (rotors) दोनच भाग लिबियात सापडले पण मलेशियातून दुबईला सर्व नऊ आले होते. लिबियामधील नरसंहारक्षम शस्त्रान्वेषकांना शंका होती कीं ते कुणा नव्या गिर्‍हाइकाला पाठविले गेले होते. ताहीर म्हणाले कीं ते नष्ट झाले. पण ते खरे नसावे असेच अन्वेषकांना वाटले.

खानसाहेबांचा काटा काढण्याचा कट बुश-४३ यांच्याबरोबर मुशर्रफ न्यूयॉर्कमध्ये शिजवत असतानाच पाकिस्तानी लष्कराने अण्वस्त्रांसाठी लागणारे भाग विकत घेण्याचा विकत घेण्याचा मुर्दाड प्रयत्न इस्लामाबादस्थित एका कंपनीद्वारा केला होता. खानसाहेबांच्या सेवानिवृत्तीनंतर एक वर्षापेक्षा जास्त वेळ गेल्यावर हा सौदा सुरू झाला होता. त्यात पाकिस्तानच्या लष्कराशी बराच मोठा धंदा करणार्‍या हुमायून खान नावाच्या व्यावसायिकाने दक्षिण आफ्रिकास्थित एका इस्रायली व्यावसायिकाशी सौद्यासाठी संपर्क साधला होता. त्यानुसार केप टाऊन येथील टॉप-केप टेक्नॉलॉजी या अमेरिकेतून इलेक्ट्रॉनिक माल दक्षिण आफ्रिकेत आणणार्‍या कंपनीच्या आशर कामी यांना अमेरिकेत बनविलेले ३६ ऑस्सिलोस्कोप मिळविण्याची १३ लाख डॉलर्सची ऑर्डर मिळाली. एरवी किरकोळ कामासाठी वापरले जाणारे हे ऑस्सिलोस्कोप अण्वस्त्रांच्या चांचणीत त्यांची परिणामकारकता मोजण्यासाठी उपयुक्त होता. हे सामान विकत घेण्याचे पाकिस्तानने आधीही प्रयत्न केले होते व हे सामान नियंत्रित होते. पण दक्षिण आफ्रिका अण्वस्त्रधारी राष्ट्र नसल्यामुळे हे निर्बंध त्या सौद्याला लागू नव्हते आणि त्यामुळे ते भाग अमेरिकेतून काढता येतील अशी आशा होती.

या मालाची वाट पहात असताना २००३च्या वसंत ऋतूत हुमायून खाननी कामी यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि २०० ट्रिगर्ड स्पार्क गॅप्सही मागवले. हे मूत्रपिंडातील खडे नष्ट करण्याकरता वैद्यकीय क्षेत्रात वापरले जातात पण ते अण्वस्त्रांत प्रज्वलक म्हणूनही वापरता येतात. पाकिस्तानने मागविले असते तर त्याला निर्यात परवाना लागला असता म्हणून हुमायूनखाननी कामींना या मालाचे अंतिम मुक्कामाचे ठिकाण जाहीर न करण्याबाबत सांगितले.

१७ जून २००३ला कामींनी हुमायूनना कळविले कीं ज्या फ्रेंच कंपनीकडून हा माल यायचा होता त्यांनी निर्यात परवाना नसल्यामुळे ते सामान देण्यास नकार दिला होता. पण हुमायूननी कामींना कसेही करून ते मिळविण्यास सांगितले. २४ जूनला मुशर्रफ कँप डेव्हिडला बुश-४३ना भेटायला आलेले असताना कामींनी हुमायूनना आपल्या यशाची बातमी कळविली व प्रत्येक नगाला ९५० डॉलर्स पदतील असे सांगितले.

२८ ऑगस्टला कामींच्या गुदामातून दोन ऑस्सिलोस्कोप पाकिस्तानला दुबईमार्गे पाठविण्यासाठी DHLने उचलले. १५ सप्टेंबरला हुमायूननी स्पार्क गॅप्स्ज कधी येतील याबाबत ई-मेलद्वारा चौकशी केली. आठ दिवसांनंतर मुशर्रफना बुश-४३कडून न्यूयॉर्क येथील वॉलडॉर्फ-अ‍ॅस्टोरिया हॉटेलमध्ये खानसाहेबांच्यावरून समोरासमोर निकराच्या चर्चेसाठी बोलावणे आले. दुसर्‍या दिवशी CIAच्या जॉर्ज टेनेट यांच्याबरोबरच्या बैठकीत टेनेटनी मुशर्रफना पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्रांच्या काळ्याबाजाराबद्दल पुराव्यावर पुरावे दिले. पण मुशर्रफनी अजाणतेपणाचे सोंग घेऊन कानावर हात ठेवले. पण या व्यवहारामुळे पाकिस्तान अद्यापही या काळ्या धंद्यात गुरफटल्याचे स्पष्ट झाले. चार दिवसांनंतर ६६ स्पार्क गॅप्स दक्षिण आफ्रिकेत ६ ऑक्टोबरला आले व त्याच दिवशी आर्मिटेज व मुशर्रफ खानसाहेबांचा कसा बकरा बनवायचा याचा कट शिजवत होते. या तारखांवरून पाकिस्तानचा व मुशर्रफचा दुटप्पीपणा व बेडरपणा दिसून येतो.

पण दक्षिण आफ्रिकेतील कामींच्या हितशत्रूने कस्टम्सच्या अधिकार्‍यांना याबद्दल टिप दिली होती आणि त्यानुसार कस्टम्सवाल्यांनी मुशर्रफना कळू नये म्हणून स्पार्क गॅप्सऐवजी दुसरेच निरुपयोगी भाग भरल्याचे नाटक केले. १ जानेवारीला विमानात चढत असताना कामी, त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांना डेन्व्हरच्या विमानतळावर अटक झाली. कामींच्या पत्नीने सांगितले कीं कामींची अशी धारणा होती कीं ते पाकिस्तानला अत्यंत तातडीने हवी असलेली वैद्यकीय उपकरणे पाठवीत आहेत.

सुरुवातीला अमेरिकेचे कस्टम्सचे अधिकारी कामी-हुमायून केसबद्दल जोशात होते पण नंतर हे भाग पाकिस्तानी लष्कराला पाठविले जात नव्हते व नंतर ते अण्वस्त्रांसाठी वापरले जाणार होते हे सर्व तर्कावर आधारित आहे म्हणून आम्हाला सखोल चौकशी करायची आहे असे अमेरिकन सरकारच्या उपउद्योग आणि संरक्षणमंत्र्याने ठासून प्रतिपादन केले.

पण २००५साली केस जेंव्हां न्यायालयात गेली तेंव्हां पुराव्याचा माग हरवला होता. त्यांच्या मार्गात परराष्ट्रमंत्रालयाकडूनच अडथळे आणले जात होते. वाणिज्य मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले कीं एकाएकी अमेरिकन सरकारला दहशतवादाविरुद्धच्या युद्धातल्या भागीदाराला-पाकिस्तानला-दुखावण्याची भीती वाटू लागली होती. रेगनच्या कारकीर्दीत झाले होते त्याचीच पुनरावृत्ती झाली, न्यायाधीशांनीच कामींबद्दलचे सारे पुरावे सीलबंद केले. जणू रेगनच्या काळातली रेकॉर्ड बुश-मुशर्रफ यांच्या काळात पुन्हा वाजत होती.

दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील भागीदार असलेले बुश-४३ यांचे सरकार किंवा इतरही कुणी आपल्याला जाब विचारू शकणार नाही याची खात्री असल्यामुळे पाकिस्तान बिनधास्तपणे अण्वस्त्रप्रसार करीत होता. कुणीही यात आपल्याला हटकणार नाहीं या विश्वासाने लष्कर आणखीच महत्वाकांक्षी झाले व जुन्या साधनसामुग्रीची डागडुजी करून आता निर्बंध असलेला माल नव्या गिर्‍हाइकांना निर्यात करू लागले होते. ८०-९०च्या दशकांत खानसाहेबांनी युरेनियम अतिशुद्धीकरणाचे आणि अणूबाँब बनवायचे तंत्रज्ञान निर्यातीसाठी तयार ठेवले होते. पण आता कच्चा माल, मशीने आणि घटकभाग असे सगळेच निर्यातीला तयार ठेवले होते.

धातूशास्त्राची पदवी घेतल्यावर खानसाहेबांनी कराचीतील People's Steel Millकडे नोकरीसाठी वारंवार अर्ज केले होते पण दर वेळी त्यांचा अर्ज उद्धटपणे फेटाळण्यात आला होता. पण १९९४साली बेनझीरबाईंनी त्या कंपनीची सूत्रें त्यांच्याच हाती सोपविल्यानंतर त्यांनी ज्यानी त्याना नकार दिला होता त्या सर्वांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यांना या पोलादकारखान्यातून कहूताला लागणारे आणि युरोप-अमेरिकेत निर्यात निर्बंध असलेले मारेजिंग जातीचे खास पोलाद बनविण्यासाठी तिथली साधनसामुग्री सुधारायच्या प्रकल्पाचे प्रमुख बनविण्यात आले होते. CIA आणि ब्रिटिश हेरसंघटना या निर्बंधित पोलादाच्या हालचालींचा उपयोग करून अण्वस्त्रप्रसारावर नजर ठेवत असत आणि खानसाहेबांनी जरी असले पोलाद बनवू शकणार्‍या यंत्रांची आणि कच्च्या मालची आयात केली असली तरी हा प्रकल्प त्यांच्या कारकीर्दीत उत्पादनाच्या टप्प्यापर्यंत पोचला नव्हता.
१९९९साली स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करताच मुशर्रफनी हा पोलादकारखाना ताब्यात घेतला आणि त्याची पुनर्रचना केली. त्या भरपूर भांडवल ओतले आणि तिला एकाद्या युरोपियन पोलाद कारखान्याचे रूप देऊन तिची उत्पादनशक्तीही वाढविली. २००५ साली तेथील नव्या अभ्यासकेंद्राचे उद्घाटन करायच्या वेळी या कारखान्याला भेट देणारे ते पहिले राष्ट्रप्रमुख ठरले. राष्ट्राध्यक्षाचे स्वागत करताना पोलादकारखान्याचे अध्यक्ष ज.अब्दुल कायूम म्हणाले होते कीं मुशर्रफ यांच्या धाडसी, प्रामाणिक आणि द्रष्ट्या नेतृत्वामुळेच पाकिस्तानला तो क्षण दिसला होता. ज.आरिफ मोजून-मापून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते. ते १९८७साली निवृत्त होईपर्यंत परिणामकारकपणे परमाणूप्रकल्पाचे नेतृत्व करणार्‍या आणि सेवानिवृत्तीनंतरही पाकिस्तानात प्रभावी भूमिका कायम ठेवणार्‍या ज.आरीफना परमाणूप्रकल्प आणि पोलादकारखान्याबद्दलचा आपला हर्ष लपवता आला नाहीं. नव्या पिढीचे आणि नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करून त्यांनी पाश्चात्यांच्या तोडीच्या नव्या प्रयोगशाळा आणि नव्या उद्योगांचे कौतुक केले. पूर्वी high-frequency inverters आणि माराजिंग प्रतीचे पोलाद मिळविण्यासाठी पाकिस्तानला खूप वणवण करावी लागायची पण आता ही उत्पादने देशात बनत असून निर्यातही होत आहेत याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

मुशर्रफ इन्कार करत असले तरी पाकिस्तान अण्वस्त्रप्रसारात गुंतलाच होता व माहितीच्या आणि अज्ञात गिर्‍हाइकांना ते तंत्रज्ञान विकतच होता. त्याचा अर्थ होता कीं मुशर्रफ यांच्या गुप्त आशिर्वादाने हा व्यवहार चालला होता किंवा त्यांना याबद्दल खरेच माहिती नव्हती आणि परमाणूप्रकल्प त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला होता. FATA[१५]मधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांनीच उभी केलेली जिहादींची टोळकीही आता अल कायदात विलीन झाली होती आणि त्यांच्या नियंत्रणाखाली नव्हतीच.

अमेरिकन आणि ब्रिटिश नेते जेंव्हां मुशर्रफ यांचा उल्लेख दहशतवादाविरुद्धच्या युद्धातला महत्वाचा सहकारी असाकरीत तेंव्हां त्याचा खरा अर्थ होता कीं ते त्यांचे या भागातील एकुलते एक मुस्लिम सहकारी होते आणि जोवर त्याना आणखी दुसर्‍या कुठल्या तरी मुस्लिम राष्ट्राचे पाठबळ मिळत नाहीं तोपर्यंत पाकिस्तान असेच दहशतवादाच्या केंद्रस्थानी असलेले आणि एक बोट अण्वस्त्रांच्या सुकाणूवर असलेले कपटी राष्ट्रच रहाणार!
सुन्नींच्या जहालमतवादाची वाढती कमान आणि परमाणू तंत्रज्ञानाची वेगाने होणारी निर्यात यांच्या संयोगाने जगाचा प्रलयंकारी विनाश कधीही होऊ शकेल असे वाटते. १९७९मध्ये पाकिस्तानच्या परमाणू महत्वाकांक्षांकडे काणाडोळा करायचा सल्ला सर्वप्रथम देणार्‍या कार्टर यांच्या भूतपूर्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रेझिन्स्कींनी २००७च्या मार्चमध्ये अशी ताकीत दिली कीं जर बुश सरकारने सध्याच्या इराण व इराकबाबतच्या धोरणात बदल केला नाहीं तर अमेरिकेला वीसेक वर्षें इराण, इराक, अफगाणिस्तान आणि कदाचित् पाकिस्तानबरोबर युद्ध लढावे लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचे जागतिक श्रेष्ठत्व संपुष्टात येईल.

पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचा त्या प्रकल्पाच्या मुलतान येथील १९७२ साली झालेल्या जन्मापासून मागोवा घेणारे आणि बुश यांचे नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबाबतचे भूतपूर्व सल्लागार रॉबर्ट गालुच्ची याहीपुढे जाऊन म्हणतात कीं पाकिस्तानचा जगाला सगळ्यात जास्त धोका आहे. जर अमेरिकेवर किंवा युरोपवर अण्वस्त्र हल्ला झाला तर सर्वांचे डोळे पाकिस्तानकडेच वळतील.
---------------------------------------
टिपा:
[१] पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख बेग आणि ISIचे प्रमुख ज.जाविद नासिर यांनी ही प्रक्षेपणास्त्रें अफगाणिस्तानमधील युद्धसमाप्तीनंतर परत मिळवून देण्यात मदत नाकारली होती.
[२] भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांचे मध्य-पूर्व व दक्षिण आशियातील बाबींबद्दलचे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा समितीवरील एकेकाळचे सल्लागार. यांच्या नावाचा उल्लेख आधीच्या प्रकरणांतसुद्धा आलेला आहे.
[३] याचे उत्तम उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये बाँब उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला फैसल शहजाद. एक वर्षापूर्वीच अमेरिकेचे नागरिकत्व पत्करून अमेरिकेशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतलेल्या शहजादने पाच महिने पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन परत आल्यावर बाँबहल्ला करायची असफल योजना कार्यान्वित केली.
[४] LeT म्हणजे लष्कर-ए-तोयबा व JeM म्हणजे जैश-ए-मुहम्मद. या दोन्ही संघटनांवर वरकरणी बंदी असली तरी त्या नव्या नावांनी कार्यरत आहेत.
[५] हेकमतयार यांच्याबद्दल अधीक माहिती वाचा http://en.wikipedia.org/wiki/Gulbuddin_Hekmatyar आणि http://news.bbc.co.uk/2/hi/middle_east/2701547.stm या दुव्यांवर. अल-झरकावी व अल-मकदीसी यांची माहिती १९व्या प्रकरणात आलेली आहे. अल झरकावी पुढे इराकमधील अल-कायदाचे प्रमुख होते व एका अमेरिकन हल्ल्यात ते मारले गेले.
[६] नकाशा पहा.
[७] International Crisis Group
[८] यांना २०१०साली तालीबान्यांनी ठार मारले. http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-47 इथे माझे नवहिंद टाइम्समधील या विषयावरचे पत्र वाचा (त्या पानावर चौथे)!
[९] आजही हे प्रश्न आहेतच!
[१०] १९व्या प्रकरणात यांच्याविषयी विस्तृतपणे माहिती आली आहे.
[११] हलवायाच्या (अमेरिकेच्या) घरावर तुळशीपत्र!
[१२] डिसेंबर ९९ला यांनाच भारत सरकारने हावईचांच्यांनी पळविलेल्या IC184 च्या प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात (त्यावेळी) तालीबानच्या ताब्यातील कंदाहारला नेऊन सोडले होते.
[१३] म्हणूनच मी मुशर्रफना सरड्याची उपमा देतो. कधी कुठला रंग धारण करतील ते सांगणे कठीण. पण पंतप्रधान/राष्ट्राध्य्क्ष कांहीसे असेच धूर्त असायला हवेत!
[१४] खरे तर खानसाहेबांनी याहूनही अश्लील सल्ला दिला होता!
[१५] Federally Administrered Tribal Areas

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण १९: नवी विचारसरणी (New Vision)

न्यूक्लियर डिसेप्शन: प्रकरण १९: नवी विचारसरणी (New Vision)

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)


KRL कर्मचार्‍यांना कुठे ठेवले आहे व त्यांचे "debriefing" अडीच वर्षें चालणार आहे हे कुणालाच माहीत नव्हते. सुरक्षित केलेल्या घरांत ISI अधिकारी त्यांना सांभाळत होते. मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रोगी असलेले आणि पाकिस्तानच्या परमाणूजगतात दोन नंबरची व्यक्ती समजले जाणारे ५४ वर्षीय डॉ. फरूक त्यांचे बहुतेक सारे दिवस अंधारात, आज या गांवात तर उद्या दुसर्‍या, काढत होते. वारंवार होणार्‍या चौकशीमुळे ब्रि.सजवाल कृश झाले होते आणि Parkinson's disease झालेल्या रोग्यासारखे त्यांचे अंग थरथरे! कधीकधी ISI मधून अचानक फोन येई व भेटायची अनुमती मिळे, पण त्यांच्या संभाषणातला शब्द अन् शब्द कांहीं लपविलेली माहिती बाहेर येते कां हे पहाण्यासाठी ISIचे अधिकारी ऐकत असत.

हे कर्मचारी 'प्रकल्प A/B'मध्ये लष्कराची आणि स्वतः मुशर्रफ यांची कशी साथ होती याबद्दल जिवावर उदार होऊन सांगायला तयार होते अशा अर्थाच्या वावड्या पाकिस्तानात उडत होत्या. सर्व शास्त्रज्ञांची परिस्थिती फार वाईट होती, त्यांच्या घरात चोरून ऐकण्यासाठी सूक्ष्म मायक्रोफोन्स बसविलेले होते, त्यांचे फोन काढले होते आणि अख्खी वसाहतच पोलिसी गराड्यात असल्यामुळे या शास्त्रज्ञांची मुले जणू तुरुंगवासातच होती!

कांहीं थोडी माणसे बाहेर रावळपिंडीत रहात, पण तेही एक 'कँटोनमेंट'च होते व तिथेही या कुटुंबियांवर नजर ठेवण्यासाठी खूप लोक उपलब्ध होते. त्यामुळे कुणीही आला-गेला तर ते सगळीकडे होत असे.
मुशर्रफ गादीवर आल्यापासून तर कित्येक लोक हॊटेल्समध्ये, चहा-कॉफीच्या दुकानांत कोण काय बोलतय् ते ऐकून 'वर'च्यांना त्याबद्दल सांगून चार पैसे कनवठीला लावायला बघत असत. टॅक्सीचे चालकही आत बसलेल्या गिर्‍हाइकांचे संभाषण ऐकून 'वर' रिपोर्ट करत असत. प्रत्येक हॉटेल्समधील प्रत्येक खोलीही असुरक्षित होती कारण पाहुण्यांच्या संगणकाची hard drives कॉपी केले जात व त्यांच्या ई-मेल्स वाचल्या जात. रेस्तोराँमधील वेटर्सही चोरून ऐकलेली संभाषणाबद्दल 'वर'च्यांना सांगून बक्षीस मिळवीत असत. असे काम करायची ISI ची नेहमीची पद्धत होती आणि गरीबी आणि भीती यांच्या जोरावर ते असले 'हेर' सहज नेमत असत. कधीकधी वेळ लागे, पण ISI अधिकारी या भुकेल्या नागरिकांना वेठीला धरून काम करून घेत.

KRL च्या परदेशी खरेदी विभागाचे प्रमुख असलेले डॉ. महंमद फरूक हे एक अतीशय साधे गृहस्थ होते. त्यांचे घरही साधे होते. पण त्यांचा मुलगा त्या दिवसात भीतीपोटी कुणाशी बोलतच नसे. घराबाहेरही जायची चोरी कारण वडिलांना भेटण्यासाठी ISI कडून कधी फोन येईल याचा भरवसा नसे[१].
डॉ. फरूक यांचे घर म्हणजे एक बेडौल आधुनिक बंगला होता. तिकडे एरवी कुणाचे लक्षही गेले नसते पण हल्ली तिथे फिक्या पिवळसर रंगाच्या कुर्त्यातले लोक गस्त घालायला उभे असल्यामुळे लक्ष जात असे. लेव्ही आणि स्कॉट-क्लार्कना या पुस्तकाच्या संदर्भात भेटायचे होते. कसेबसे त्यांचे सुपुत्र त्यांच्याशी बाहेरच येऊन बोलले कारण घर सारे मायक्रोफोन्सनी भरलेले होते. त्यांनी आपण स्वतः खूप घाबरल्याचे सांगितले. ते डॉक्टर होते त्यामुळे त्यांना रक्त पहायची संवय होती पण खानसाहेबांच्या अटकेमुळे त्यांना सगळ्यांनाच अतोनात त्रास होत होता व पाश्चात्य वृत्तपत्रांत येणार्‍या सर्व वार्ता सत्याचा विपर्यास करणार्‍या होत्या असे ते म्हणाले. त्यांचे वडील एक सज्जन कर्मचारी होते, कुठल्याही हेरगिरीत त्यांचा हात नव्हता व देशासाठी जे करायला लावले गेले ते त्यांनी केले पण तरीही त्यांना हा त्रास होत होता. एवढे कसेबसे बोलून ते लगबगीने आत गेले.

ISI अधिकार्‍यांनी आपले काम चोख केले होते. सगळ्याच घरांमध्ये आणि सगळ्या पातळ्यांवर हीच परिस्थिती होती. अगदी सत्ताधीशांना जवळ असलेल्या शरीफुद्दिन पीरजादा यांच्यासारख्यांनाही खानसाहेबांबद्दल बोलायची हिम्मत नव्हती. हुमायून गौहर हे प्रसिद्ध संपादकही प्रत्येक शब्द तोलून-मापून बोलत. पाकिस्तानमध्ये हे फार तणावाचे व क्लेशदायक दिवस आहेत असे सांगून ते इतर बिनमहत्वाच्या विषयांकडे वळले. 'हे लष्करी लोक जीव घ्यायलाही मागे-पुढे पहाणार नाहींत' असे सांगून बेनझीरबाई म्हणाल्या कीं अजूनही आंतरराष्ट्रीय समाज त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नव्हता, उलट असे बोलल्याबद्दल त्यांनाच वेड्यात काढत होता असेही त्या म्हणाल्या[२].

खानसाहेबांचे कराचीतील मानसोपचारतज्ञ डॉ.अहमद यांच्याबरोबरचे संबंधही पूर्णपणे तुटले होते कारण भरपूर देणग्या देऊन त्यांनी स्वतःची अध्यक्ष म्हणून नेमणूक करून घेतली होती व लष्करी सैनिकांसह त्यांच्या बंधूंनी तिथे येऊन डॉ.अहमदना त्यांच्या नर्सेस व इतर अधिकार्‍यांसह बाहेर काढले होते. डॉ.अहमदनी खानसाहेबांच्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला होता व त्याला खूपच (कु)प्रसिद्धी मिळाली होती. पण जानेवारी २००४च्या खानसाहेबांच्या अटकेनंतर ISI अधिकारी डॉ.अहमदना भेटले व त्यांना सांगितले कीं त्यांच्या खटल्यामुळे सरकार, मुशर्रफ आणि खानसाहेबांच्यात दिलजमाई होत नसून त्यांनी डॉ.अहमदना धीर ठेवायला, गप्प बसायला आणि आपला खटला मागे घ्यायला सांगून खानसाहेबांच्या बरोबरचे त्यांच्या सार्‍या समस्यांचे निवारण होईल असे आश्वासन दिले. खानसाहेबांनी कमावलेला सारा पैसा सोन्याच्या रूपात दुबईच्या ARY Bankमध्ये असून डॉ.अहमदनी धीराने घावे असा सल्ला देऊन ते गेले. डॉ.अहमदनी खटला मागे घेतला नाहीं. त्यांच्यावरचा दबाव वाढविण्यासाठी ISI अधिकारी खानसाहेबांचे मित्र असलेल्या 'डॉन' वृत्तपत्राच्या एका ज्येष्ठ संपादकाकडे गेले. याने जिद्दीने खानसाहेबांविरुद्धच्या खटल्याला प्रसिद्धी देणे चालू ठेवले होते. त्यांना 'डॉन'ने तडकाफडकी नोकरीवरून कमी केले[३].

मुशर्रफनी खानसाहेब प्रकरणातले सगळे मोहरे पोतडीत बंद केले होते कीं खानसाहेबांचे आणि त्यांच्या सहकार्‍यांची मुस्कटदाबी केल्यावर पाश्चात्य राष्ट्रे ही भानगड आणि त्यातला लष्कराचा सहभाग विसरून जातील. लष्कराची अधिकृत भूमिका होती कीं KRL अधिकारी अटकेत आहेत, खानसाहेब आणि त्यांचे वैयक्तिक जाळे नष्ट करण्यात आले आहे आणि आणखी कुणाला अटक करण्याची जरूरी नाहीं. आणखी ज्यांची नांवे घेण्यात येत होती त्या व्यक्ती हयातच नव्हत्या. त्यात डॉ. जाफर नियाझी (जुल्फिकार भुत्तोंचे राजकीय सल्लागार) आणि ज.इम्तियाज अहमद (त्यांचे लष्करी सचीव) हे दोघे सुद्धा होते. हे दोघे बेनझीरबाईंचेही मदतनीस होते आणि इराणला परमाणू तंत्रज्ञान विकण्याचा बाईंनी आग्रह धरला होता असा आरोपही त्यांच्यावर केला जात होता. (तो आरोप बेनझीरबाईंनी साफ धुडकावून लावला होता.)

पाश्चात्य राष्ट्रांना काळजी होती अण्वस्त्रप्रसाराची आणि तो जर थांबवला गेला असेल तर त्यांना खानसाहेब आणि त्यांचे सहकार्‍यांच्या अटकांबाबतीत कांहींच स्वारस्य नव्हते. यात आर्मिटेज-मुशर्रफ कराराद्वारां अमेरिकेने अग्रणी भूमिका घेतली होती व त्यानुसार मुशर्रफनी अमेरिकेला खानसाहेबांची चौकशी करण्यास मोकळीक दिली होती (अर्थात् ISI द्वारा!) पण त्यानंतरच्या सहा महिन्यात ब्रिटिश गुप्तहेरसंघटना, IAEA आणि अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागातील अधिकार्‍यांनुसार मुशर्रफ आपल्या वचनाला जागत नव्हते. खानसाहेब नाहींसे झाले होते व त्यांना मध्यस्थांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. परराष्ट्रमंत्रालयातील खानसाहेबांच्या चौकशीतील एक महत्वपूर्ण आधिकारी आइनहॉर्न म्हणाले कीं खानसाहेबांना व त्यांच्या सहकार्‍यांना गृहकैद झाल्यापासून त्यांना पाकिस्तानकडून कांहींच महत्वाची माहिती मिळाली नव्हती. खानसाहेबांच्यासारखे महत्वाचे लोक अमेरिकनांपासून दूरच ठेवले जात होते. अमेरिकन अधिकारी आपल्या प्रश्नांची यादी घेऊन उभे होते आणि त्यांचे आवडते मित्रराष्ट्र त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नव्हते.

थोड्याशा अवधीनंतर मुशर्रफनी सार्‍या 'खान चौकशी'लाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या! पाकिस्तान सरकारने जाहीर करून टाकले कीं चौकशी संपली असून सर्व गोष्टींची शहानिशा करण्यात आली आहे. मे २००६ मध्ये परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम म्हणाल्या कीं अमेरिकन सरकार व IAEA पाकिस्तानने ज्या तर्‍हेने हा मुद्दा हाताळला त्यावर संतुष्ट असून सरकारला याहून जास्त कांहींही उघड करायचे नव्हते! थोडक्यात एका वारात मुशर्रफनी 'प्रकल्प A/B'ची प्रगती रोखली होती! ना भूतो न भविष्यति या स्तरावर ३० वर्षे सतत चालविलेले खरेदी आणि अण्वस्त्रप्रसाराचे जाळे, हजारो शास्त्रज्ञ, मध्यस्थ, दलाल, माल पुरवणारे, निर्यात करणारे, आयात करणारे या सर्वांच्यासाठी या १०-१२ जणांना बळी देऊन मुशर्रफ मोकळे झाले. अमेरिकेच्या कायद्यांच्या आणि त्यांच्या गुप्तहेरकात्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठीच जणूं अटक झालेल्या सर्व KRL कर्मचार्‍यांना आयुष्यभर गृहकैदेची शिक्षा दिली गेली! तस्नीम अस्लमनी कबूल केले कीं जरी तांत्रिक दृष्ट्या डॉ. फरूक हे स्थानबद्धतेतून सोडले गेलेले खानसाहेबांच्या सहकार्‍यांमधील शेवटचे कर्मचारी असले तरी उरलेल्या आयुष्यात ते कधीही ISI च्या सोबतीशिवाय घराबाहेर पडू शकणार नव्हते!

पाकिस्तानने या कर्मचार्‍यांवर कुठलेही धड आरोप ठेवले नाहींत, अमेरिकेला त्यांच्या चौकशीबद्दल कुठलीही गुप्त माहिती दिली नाहीं. गालुच्ची[४] चकितच झाले. अमेरिकेच्या पाकिस्तानी मित्राने द्रोह केला होता व त्याचा राग येणे सहाजिकच होते आणि तसा राग युरोपियन राष्ट्रें, इस्रायल व भारताला आलाही. पण ते बुश-४३ सरकारला सोयीचे होते कारण मुशर्रफना वाचवून त्यांना एका नव्या राजवटीविरुद्ध वापरायचे होते. . ती राजवट होती नरसंहारक्षम शस्त्रास्त्रसज्ज इराण. त्या राष्ट्राला ही शस्त्रें मिळाली होती व ती माहिती त्यांना खानसाहेबांच्याकडून मिळाली असे दाखवायचे नव्हते कारण खानसाहेबांचेच राष्ट्र (पाकिस्तान) त्यांच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात साथीदार होते. व असे कबूल करून बुशना त्यांचे लक्ष विचलित होऊ द्यायचे नव्हते.

अमेरिकेने खानसाहेबांच्या टोळक्याला व त्यांच्या लष्करी नियंत्रकांना जणू मुक्तच केले होते आणि आपला मोर्चा इराणकडे वळविला होता. आणि हे करताना तेथील मुरब्बी मुत्सद्द्यांना आणि अनुभवी शस्त्रास्त्रतज्ञांना बाहेर काढून परराष्ट्रमंत्रालयाची जणू 'सफाई'च केली होती व त्यांच्या जागी सरकारच्या आक्रमक धोरणाची री ओढणार्‍या नवशिक्यांना नेमले होते. पहिली कांहीं वर्षें बुश-४३ सरकारला अण्वस्त्रप्रसारविरोधाचा भक्कम आधार मिळाला होता, पण खानसाहेबांची चौकशी गुंडाळून टाकली तेंव्हापर्यंत ते धोरण कधीच मृत्यू पावले होते.

२००१मध्ये जेंव्हां बोल्टनना 'शस्त्रास्त्रनियमन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा'विभागाचे उपपरराष्ट्रमंत्री या नात्याने परराष्ट्रमंत्रालयात घुसवण्यात आले तेंव्हां त्याला कोलिन पॉवेल व इतर अनुभवी अधिकार्‍यांचा विरोध होता. कारण त्यांना हा बदल म्हणजे परराष्ट्रमंत्रालयाला 'व्हाईट हाऊस'ची बटीक बनविण्याचा प्रयत्न वाटला होता. बुश-४३चे शस्त्रकपात विभागाचे फिरते मुत्सद्दी नॉर्म वुल्फ यांच्या आठवणीनुसार बोल्टन हे पॉवेल यांची या जागेसाठीची पहिली निवड नव्हते. त्यामुळे ते बोल्टनना टाळून थेट वुल्फ यांच्याशीच बोलायचे. पण आपल्याशी विरोध करणार्‍यांची पदावनती करून बुश-४३ यांच्या समर्थकांना पदोन्नती देण्याबद्दल बोल्टन यांची ख्याती होती.

बोल्टन यांचे परराष्ट्रमंत्रालयात आगमन झाले तेंव्हां शस्त्रास्त्रनियमनाच्या कार्यपद्धतींच्या मोठ्या प्रमाणावरील पुनर्रचनेला दोन वर्षें झाली होती. त्यानुसार ACDAचे[५]'शस्त्रास्त्रनियमन', अण्वस्त्रप्रसारविरोध आणि 'सत्यान्वेषण व पालन' असे तीन उपविभाग करण्यात आले होते. बोल्टन नेहमी जाहीरपणे बोलत कीं त्यांच्या लेखी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय कारारांना व IAEAसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे अण्वस्त्रप्रसारविरोधी करार व त्यावर नजर ठेवणार्‍या संघटनांमधील दोष शोधणार्‍या सत्यान्वेषण उपविभागाच्या प्रमुखांशीच त्यांची गट्टी जमली.
बोल्टन यांच्या या स्वभावामुळे या तीन्ही उपविभागात संघर्षमय वातावरण असे. ती वेळ अशी होती कीं इराण व उ.कोरिया यांच्या परमाणू प्रकल्पांचा सतत मागोवा घेणे, पाकिस्तानमधील "प्रकल्प A/B" गुंडाळून टाकणे आणि आर्मिटेज यांच्या मुशर्रफ यांच्याबरोबरच्या गुप्त कराराला अंतिम स्वरूप देणे अशी महत्वाची कामे होती. पण शस्त्रास्त्रनियमन विभागातील अधिकार्‍यांचे लक्ष या तीन उपविभागातील आपापसातील चढाओढीमुळी विचलित होत होते व त्यात अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभागावर सगळ्यात जास्त परिणाम होत असे. अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागाचे उपनिर्देशक तिथल्या कपट कारस्थानांमुळे, गुप्त बैठकांमुळे आणि त्यांना वगळून एकमेकांकडे जाणार्‍या निरोपांमुळे त्रासलेले होते पण बोल्टन असल्या समस्या सोडवायच्याऐवजी ते असल्या वागणुकीला उत्तेजनच देत असत. बोल्टनना अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभाग अविश्वसनीय वाटे कारण त्यांचे मतभेद ते उघडपणे मांडत. त्यामुळे अधिकार्‍यांमध्ये रोजची भांडणेही होत असत. त्यामुळे बर्‍याचदा परदेशी सरकारें आणि इतर मंत्रालयांनासुद्धा कळत नसे कीं इथे प्रमुख कोण आहे!

सावळ्यागोंधळामुळे शेवटी समरप्रसंगच आला व शेवटी परराष्ट्रमंत्रालयाच्या 'इन्स्पेक्टर जनरल'ला अन्वेषणासाठी बोलावण्यात आले. सप्टेंबर २००४मध्ये खानसाहेबांना गृहकैदेत ठेवल्याला सात महिने झाल्यानंतर इन्स्पेक्टर जनरलनी शस्त्रास्त्रनियमन आणि अण्वस्त्रप्रसारविरोध या दोन उपविभागांचे एकीकरण करून एक सर्वोच्च अधिकार असलेला विभाग बनविण्याचा सल्ला दिला. पण यावर अंमलबजवणी व्हायच्या आधीच पॉवेलनी राजीनामा दिला आणि 'पेंटॅगॉन'बरोबरचे दहशतवादाविरुद्धच्या युद्धाबद्दलचे चार वर्षांचे त्यांचे मतभेद संपुष्टात आले. दोनच दिवसात बुश-४३नी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीवरील सल्लागार काँडोलीझा राईसबाईंची त्या जागेवर नेमणूक केली. या बदलामागे त्यांच्या मंत्रीमंडळातील मतभेद दडपण्याचा उद्देश होता. लवकरच बोल्टनना संयुक्त राष्ट्र संघटनेतील अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमण्यात आले. त्या संघटनेबद्दल "सदसद्विवेकबुद्धी व परिणामकारकता नसलेली संघटना" असे मत असलेले व सार्‍या जगाचे नेतृत्व एकुलत्या एक अतिसमर्थ राष्ट्राने (म्हणजेच अमेरिकेने) केले पाहिजे अशी एकांगी मते असलेले बोल्टन तिथे आणखीच अनर्थ माजवतील अशी भीती होती.

बोल्टनच्या जागी लिबियातील वाटाघाटीत सहभागी असलेल्या आणि अतीशय आक्रमक धोरणांना पाठिंबा देणार्‍या रॉबर्ट जोसेफना नेमण्याचा राईसाबाईंचा निर्णय ऐकल्यावर अण्वस्त्रप्रसारविरोधी उपविभातील परिस्थिती सुधारण्याच्या आशेवर पाणी पडले! सर्व आंतरराष्ट्रीय करारांबद्दल आदर नेसलेले व एकतर्फी युद्ध करण्याबद्दल अनुकूलता असलेले अशी त्यांची ख्याती होती! अण्वस्त्रप्रसारात गुंतलेल्या अधम राजवटींना तोंड देण्यासाठी अमेरिकेने आपल्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचे शस्त्रागार संपन्न ठेवावे व अमेरिकेवर कुणी स्वारी करायच्या आधीच त्या राष्ट्राविरुद्ध अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर करावा असे त्यांचे मत होते.

इराण, इराक आणि उ.कोरिया ही तीन राष्ट्रे अमेरिकेला सगळ्यात जास्त धोकादायक आहेत अशा निष्कर्षाप्रत आलेल्या १९९८च्या रम्सफेल्ड आयोगाचे जोसेफ एक सभासद होते. नायजरकडून अशुद्ध (कच्चे) युरेनियम विकत घेण्याच्या इराकच्या प्रयत्नांबद्दलचा (चुकीचा) उल्लेख बुश-४३ यांच्या २००३सालच्या State of the Union अभिभाषणात घुसविण्याचा आग्रह धरणारेही जोसेफ आणि बोल्टनच होते. (याच उल्लेखांची परिणती वॅलरी प्लामबाईंचे CIAशी असलेले संबंध उघडकीला येण्यात झाली होती.)

सरकारातील पुनःप्रवेशानंतर जोसेफनी एक नवी चळवळ आरंभली: अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात[७]. याचा अर्थ होता जी राष्ट्रें अण्वस्त्रप्रसारात गुंतली असतील अशांनी अमेरिकेवर हल्ला करण्याआधीच अमेरिकेने त्या राष्ट्रांविरुद्ध अण्वस्त्रें वापरणे! वॉशिंग्टनस्थित National Defense University येथील "अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात केंद्रा"चे संस्थापक व निर्देशक म्हणून काम करताना जोसेफनी या प्रणालीचे विकसन केले होते. अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात ही बुश-४३ यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणाची कोनशिलाही होती. हे धोरण त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सप्टेंबर २००२च्या आमसभेत जाहीर केले होते व ते त्यांच्या "अण्वस्त्रप्रसारविरोधी संरक्षणासाठी पुढाकार" या अनेक राष्ट्रांच्या सेनादलांच्या सहभागाने बनविलेल्या 'सागरी व हवाई प्रत्याघात दला'च्या मे २००३च्या स्थापनेमागील तत्व होते. हे दल संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित नसणार होते आणि अण्वस्त्रधारी दहशतवाद्यांना आणि अण्वस्त्रप्रसार करणार्‍या राष्ट्रांना अटकाव करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली होती. २००५च्या जुलैमध्ये राईसबाईंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि अण्वस्त्रप्रसारविरोधासाठीचे सर्वोच्च अधिकार असलेल्या विभागाची-"ISN"ची-[८] मुहूर्तमेढ रोवली! हा बदल परराष्ट्रमंत्रालयाला आणि 'पेंटॅगॉन'ला जवळ आणेल या मुद्द्यावर जोर देत त्या म्हणाल्या होत्या कीं मोकाट शास्त्रज्ञ, शस्त्रास्त्रें काळ्या बाजारात विकणारे आणि अण्वस्त्रप्रसार करणार्‍या अधम राजवटींविरुद्ध आक्रमक धोरण वापरण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या कीं प्रतिबंध व शस्त्रास्त्रनियमन यापेक्षा बरेच जास्त करण्याची वेळ आली होती व त्यांनी या नव्या विभागाला त्यांच्या त्यावेळच्या जबाबदार्‍यांहून अधीक अशा अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात, डावपेचाच्या योजना आणि नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांवर आधारित दहशतवादाला तोंड देणे नव्या जबाबदार्‍या दिल्या. आता अमेरिकेचे अण्वस्त्रप्रसारविरोधी धोरण व शत्रूच्या हल्ल्याआधीच करावयाच्या प्रत्याघाताचे नवे धोरण एकसंध केले गेले.

या विभागातील अधिकार्‍यांच्या नेमणूकीची जबाबदारी जोसेफनी "Peacekeeping Fiascos of the 1990s" या पुस्तकाचे लेखक फ्रेडेरिक फ्लाइत्झ यांच्यावर सोपविली. "शांतिसेना नेहमीच अयशस्वी होते" अशा मताच्या फ्लाइत्झ यांनी बोल्टन यांच्या हाताखाली काम केलेल्यांच्या (राजकीय) नेमणुका सुरू केल्या. या सर्व लोकांनी परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागातील अधिकार्‍यांच्या योग्यता ठरविण्यासाठी गुप्तपणे डोळा ठेवायला सुरुवात केली. तीस वर्षें सरकारी नोकरीत असलेले नॉर्म वुल्फ भ्रमनिराश झाले होते. ISNचे अधिकारी गुप्तपणे भेटून कुणाला कुठल्या कामासाठी निवडायचे याची चर्चा करीत आणि बुश-४३ यांची पकड २००८नंतरही कायम असावी या हेतूने तीस-तीस वर्षांचा अनुभव असलेल्या मुरब्बी लोकांना बाजूला सारून 'उजव्या' विचारसरणीच्या तरुण 'होयबां'ची नेमणूक करत! भूतपूर्व निर्देशक रस्ट यांचे मत तर याहूनही चमचेगिरी आणि वजन या पलीकडील एक हेतू होता आणि तो म्हणजे ९/११नंतरच्या बदललेल्या परिस्थितीत परराष्ट्रमंत्रालयातील नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दलच्या जुन्या तज्ञांची जुनी विचारसरणी कामाची नसून नव्या विचारसरणीची गरज होती. आणि त्यावेळी नवी विचारसरणीचा अर्थ होता वाटाघाटी करून सर्वानुमती साधण्याऐवजी कमांडो युनिट्सद्वारा हल्ला करून किंवा प्रसंगी विमानातून एकादा अणूबाँब टाकून प्रश्न सोडविणे. त्या इराणचाही समावेश होता.

मायकेल रोझेंथाल[९] नावाचे अण्वस्त्रप्रसारविरोधी कार्यातले अमेरिकेतील एक ज्येष्ठतम तज्ञ आणि वुल्फ यांचे सहकारी आपली व्हिएन्नातील IAEAची दोन वर्षांची तात्पुरती सेवा आटोपून परत आल्यावर अमेरिकन मुत्सद्देगिरीचे संचालक या नात्याने त्यांना नेमून दिलेले इराण व उ.कोरिया यांच्याबरोबरच्या परमाणू चर्चेतली कोंडी फोडण्याचे काम एक बोल्टन यांचा पित्त्या असलेले तरुण अधिकार्‍याला दिलेले दिसले. रोझेंथाल यांच्यासारख्या पातळीवरील १५ लोकांनी पदावनीमुळे किंवा बाजूला सारले गेल्यामुळे सेवानिवृत्तीच्या वयाआधीच सरकारी नोकरी सोडली होती. नवीन अधिकार्‍यांच्या भरतीसाठी बुश-४३ व राईसबाईंबद्दलची निष्ठा हाच एकच कस धरून विश्वविद्यालयातून अर्जही मागविण्यात आले. अशा तर्‍हेने अतीशय कार्यक्षम असलेले खूप लोक निघून गेले व जोसेफ यांच्या हातात सर्व सत्ता आली.

जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फ्लाइत्झ यांच्या व्यवस्थापनाखाली बारापैकी पाच जागी ज्यांना त्या कामाबद्दल कांहींही अनुषंगिक अनुभव नसलेले नवे संचालक नेमले गेले व त्यात अण्वस्त्रप्रसारविरोधी करार, IAEA आणि सर्वात महत्वाच्या इराण व उ.कोरिया यांच्याशी व्यवहार करणार्‍या विभागांचा समावेश होता. या नव्या खांदेपालटामुळे सरकारकडील इराण व उ.कोरियासारख्या अधम राष्ट्रांकडून असलेल्या धोक्यांना तोंड देऊ शकणार्‍या कार्यक्षम मुत्सद्द्यांच्या मनुष्यबळात खूपच घट झाली!

उ.कोरियाबरोबरच्या १९९४सालच्या "सहमत करारा"चे[१०] शिल्पकार आणि "जुन्या विचारसरणी"चे अध्वर्यू गालुच्ची म्हणाले कीं रॉबर्ट ओप्पनहायमर[११] यांच्या जमान्यात अण्वस्त्रांचे नियमन याचा अर्थ होता अन्वस्त्र तंत्रज्ञानाचे आणि घटकभागांचे नियमन. यात मुत्सद्देगिरी, सहनशीलता व दडपण आणणे या सर्व बाबी येतात. गेल्या पन्नास वर्षात पाचच राष्ट्रांकडे हे तंत्रज्ञान ठेवण्यात यशस्वी झालेली (व त्यांच्या बाहेर हे तंत्रज्ञान पसरू न देणारी) प्रणाली नक्कीच चांगली होती हे सिद्धच झाले आहे. उ.कोरियासारख्या युद्धखोर राष्ट्रालाही वाटाघाटी करायला या विचारसरणीने भाग पाडले होते. पण वॉशिंग्टनमध्ये एकाएकी 'निर्बंध/मनाई' आणि 'प्रत्याघात' या शब्दांची चलती झाली आहे!
गालुच्चींच्या मते जोसेफ यांच्या विचारसरणीमुळे अमेरिका आणि सारे जग असुरक्षित बनले होते. सरकारने मुत्सद्देगिरीला डावलून आणि तिला कमी महत्वाचे लेखून आंतरराष्ट्रीय सदिच्छा व पत तर घालविली होतीच पण आता अमेरिकन सरकारला खोल जमीनीखाली लपविलेल्या अण्वस्त्रसज्ज जागा आणि विघटनशील मूलद्रव्य विकत घेऊ पहाणारी छोटी आणि विखुरलेली अल कायदाच्या दहशतवाद्यांची टोळकी अशा तर्‍हेच्या तोंड द्यायला अवघड अशा धोक्यांना सामोरे जावे लागत होते.
त्यांच्या मते इराणमधल्या या जमीनीखालच्या जागा कशा शोधून काढणे किंवा पाकिस्तानातून एकाद्या सूटकेसमध्ये लपविलेला अतिशुद्धीकृत युरेनियमचा एक गोळा अमेरिकेत यायला निघाल्यास त्याची माहिती मिळणे अशक्यच होते! यासाठी मुत्सद्देगिरीचीच आवश्यकता आहे पण बुश-४३भोवती प्रत्याघात विचारसरणीचे लोक जमले होते व त्यांचा तोंडून एकच उद्घोष चालू होता: इराण! 'व्हाईट हाऊस' आणि 'पेंटॅगॉन'चेही हेच टुमणे चालू होते कीं इराण अणूबाँब मिळवायचा जिद्दीने प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर तो ते तंत्रज्ञान इतरांनाही विकायला मागे-पुढे पहाणार नाहीं. इतर कुठल्याही राष्ट्रापेक्षा इराणच अणूबाँबचा आपण होऊन आणि सरसकटपणे वापर अमेरिकेच्या सगळ्यात जवळच्या मित्रराष्ट्राविरुद्ध-इस्रायलविरुद्ध-करेल अशीही त्यांची खात्री होती. अमेरिकन जनतेला इराण हे एक गूढ आणि अधम राष्ट्र वाटते. अमेरिकेचे अतीशय लाडके मित्रराष्ट्र असलेले इराण १९७९ साली सर्वात कट्टर शत्रू झाले होते आणि हे परिवर्तन होताना अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करून व तिथल्या अमेरिकन मुत्सद्द्यांना दीड-दोन वर्षें ओलीस धरून इराणने अमेरिकेला अतीशय दुःखद अनुभवातून रखडवले होते. बुश-४३ सरकारच्या दृष्टीने एकच इराण होते! एक कडवी आणि एकचक्री धर्मगुरूंच्या ताब्यात असलेली राजवट असणारे, आपल्या प्रजेला ओलीस धरणारे, अणूबाँब बनविण्याचा ध्यास घेतलेले आणि तो अणूबाँब इस्रायलविरुद्ध आणि इतरांविरुद्ध वापरू इच्छिणारे राष्ट्र! पंचवीसपेक्षा जास्त वर्षें अमेरिकेचे धोरण यातच अडकले होते व तेहरानमधील स्विस दूतावास त्यांचे काम पहात असे. इराणकडे अमेरिका एक पाश्चात्य जगाशी टक्कर घेण्यासाठी पावले टाकणारे राष्ट्र याच नजरेतून पहात असे. पण इराणला जाणणार्‍यांना व १९७९पासून इराणच्या नेत्यांच्या संपर्कात असलेल्या अमेरिकनाना माहीत होते कीं ते एक एकसंध नसलेले, आतल्या गाठीचे, कुठलीही पारदर्शक ध्येये नसलेले, एकमेकांशी कडवी स्पर्धा करणारे राजकीय व धार्मिक पक्ष असल्याने-त्यातली बरीच प्रगतीकारक व पाश्चात्य जगाबद्दल सहानुभूती असलेले-कशाचाही संबंध जोडता न येणारे असे राष्ट्र होते. १९८६साली इराण-काँट्रा करार म्हणून (कु)प्रसिद्ध असलेल्या व्यवहारात इराणने इस्रायलची मध्यस्ती स्वीकारून आणि अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करून स्वतःच्या व्यवहारीपणाची चुणूकही दाखविली होती!

अमेरिकेच्या इराणबद्दलच्या गैरसमजांमुळे आणि बुश-४३ यांच्या मंत्रिमंडळाच्या आक्रमक धोरणामुळे आयातुल्लांच्या हाताला बळकटी देण्यापलीकडे कांहींही फायदा झालेला नव्हता! खरे तर अमेरिकेने शियाधर्मीय इराणच्या पूर्वेकडील शत्रूला-तालीबानला आणि त्यांच्या पश्चिमेकडील कट्टर शत्रू असलेल्या सद्दामला[१२] नष्ट केले होते आणि इराकमध्ये इराणशी मैत्री ठेवणारी शिया राजवट स्थापन केली होती. फोर्ड, कार्टर आणि रेगन यांच्या कारकीर्दीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीवर इराणबद्दलचा तज्ञ म्हणून काम केलेले गेरी सिक यांच्या मते अमेरिकेने एक बोटही न उचलता इराण या भागातले इस्रायलइतकेच सामर्थ्यवान आणि बलाढ्य राष्ट्र बनेल अशी जणूं तजवीजच केली होती.

इराणवर बोल्टन, जोसेफ व असंख्य इस्रायली गुप्तहेर गुप्त P-2 सेंट्रीफ्यूजेसची सुविधा उभारणे, अणूबाँब बनविणे, त्याचा वापर करणे किंवा ते तंत्रज्ञान इतरांना विकणे असे जे आरोप करत होते त्यातली कुठलीच गोष्ट अद्याप इराणने केली नव्हती! पण 'प्रत्याघात' तत्वानुसार इराणने असे कांहीं करण्याआधीच अमेरिकेने त्याचे पडघम वाजवायला घेतले. ओलीस धरलेल्या मुत्सद्द्यांच्या घटनेमुळे अमेरिकन सरकारच्या मनात इराणबद्दल इतकी तिरस्काराची भावना होती कीं तिथले सरकार बदलण्यासारखी अतीशय पराकोटीची कल्पनासुद्धा कांहीं डेमोक्रॅट व सगळ्या रिपब्लिकन जहालमतवाद्यांच्या पसंतीस उतरे. २००३ साली फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांनी इराणबरोबर त्यांनी आपला अण्वस्त्रप्रकल्प मागे घ्यावा म्हणून वाटाघाटी सुरू केल्या होत्या, पण बुश-४३नी तिला मुळीच पाठिंबा न देता उलट ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे धाडण्याचा आग्रह धरला. बुश-४३ यांचे अधिकारी इराणच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देत असले तरी हेही खरे होते कीं युरोपियन राष्ट्रांच्या शिष्टाईला यश येऊन युरेनियम अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम त्यांनी निलंबित केला. त्याला प्रत्याघात म्हणून २००४च्या जूनमध्ये उपग्रहाद्वारे घेतलेले नातांझ सुविधेचे फोटो अमेरिकेने प्रसिद्ध केले. त्यात प्रत्येकी ५०,००० सेंट्रीफ्यूजेस बसविता येतील अशा आकाराच्या व ७५ फूट जमीनीखाली असलेल्या, RCC काँक्रीटने भक्कम केलेल्या व दगड व मातीने झाकलेल्या दोन मोठ्या दालनांवर छप्पर घातल्याचे फोटो होते. ही सुविधा इतकी मोठी होती कीं तिथे अणूबाँबसाठी विघटनशील मूलद्रव्य बनवण्याचाच उद्देश होता असा दावा अमेरिकेने केला. रोज चाळीस लाख पिपे तेल काढणार्‍या इराणला अणुशक्तीपासून वीजनिर्मिती करण्याची कांहींच गरज नव्हती. अशा पुराव्यांना इराणमधून बाहेर पडून बाहेरदेशी राजकीय आश्रय घेतलेल्या आणि सरकार बदलण्याची इच्छा असलेल्या इराण्याकडून पुष्टीही मिळायची. इराण 'मारेजिंग' प्रतीच्या पोलादाची खरेदीही करू पहात होता. पण इराणला सेंट्रीफ्यूजेस सातत्याने चालवायला आणि अणूबाँब बनवायला किती अवधी लागेल याबद्दल भिन्न मतें होती! 'युरेंको'मधील भूतपूर्व शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या अंदाजावरून अणूबाँब बनवायला कमीतकमी पाच वर्षे लागतील असे IAEAचे मत होते. गालुच्चीसारख्या या विषयाचा खूप वर्षें मागोवा घेतलेल्यांचा अंदाज होता आठ वर्षांचा. पण इस्रायली गुप्तहेरसंघटनेच्या माहितीवर अवलंणार्‍या अमेरिकन सरकारचा अंदाज होता तीन महिने ते एक वर्ष! हा अंदाज जास्तकरून राजकीय होता कारण इस्रायल हे इराणच्या तोंडावरचे राष्ट्र आणि त्यांना इराणच्या परमाणू महत्वाकांक्षांचा नायनाट करण्यात सगळ्यात जास्त खुमखुमी होती. म्हणून त्यांचे बोल्टन यांच्या इराणच्या P-2 सेंट्रीफ्यूजेसने भरलेल्या दुसर्‍या प्रकल्पाबाबत एकमत होते. 'मोसाद'च्या मतें इराण एक प्रकल्प प्रकटपणे तर दुसरा लष्कर आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सतर्फे गुप्तपणे राबवत होता. म्हणजे या बाबीचा अभ्यास करणारे दोन वेगवेगळ्या जगात रहात होते, एक व्हिएन्नाच्या माहितीच्या आधारावर तर दुसरा अमेरिकन आणि इस्रायली गुप्तहेरखात्याकडून आलेल्या माहितीच्या आधारावर! पण IAEAने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने आणि युरोपीय सरकारांनी पुरावा मागितला. मग अमेरिकेने जाहीर केले कीं एक इराणी परमाणूसंशोधक एका निनावी युरोपियन दूतावासात तांत्रिक ड्रॉइंग्ज व अण्वस्रांच्या संरचनांची १०००पेक्षा जास्त पाने असलेला लॅपटॉप घेऊन आला होता. त्यात त्या 'दुसर्‍या' प्रकल्पाचीही माहिती होती. पण IAEA दिलेली आणि जगातल्या सार्‍या मीडियाला 'इराण अणूबाँब बनविण्यात कल्पनेपेक्षा जास्त जवळ आहे' असे भय निर्माण करण्यासाठी मुद्दाम 'सारलेली' ही गुप्त बातमी चुकीची होती हे जगापुढे नंतर अमेरिकेला कबूल करावे लागले होते कारण ती माहिती नेहमीच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दल होती व तीही अतीशय ढोबळ अशा रेखाचित्रांच्या स्वरूपात!

एकाएकी २००५च्या ऑगस्टमध्ये जणू संगनमत केल्याप्रमाणे इराणमधील परिस्थिती तत्कालीन आक्रमक विचारसरणीच्या अमेरिकन सरकारच्या बाजूला झुकली. ४९ वर्षाचे आणि तेहेरानच्या उत्तरेस असलेल्या गर्मसार या गांवातील एका लोहाराचे सुपुत्र महमूद अहमदीनेजाद सुधारक समजले जाणार्‍या आणि तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार्‍या हाशेमी रफसंजानी यांचा पराभव करून अध्यक्षपदी निवडून आले. २००३साली असेच तेहेरानची नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सगळ्यांना चकित केलेले अहमदीनेजाद हे आयातुल्ला खोमेनींच्या पठडीतील कट्टर सनातनी समजले जात. इराकमधील शियांच्या कत्तलीवरून भावनापूर्ण भाषणांद्वारे धार्मिक कष्टकर्‍यांवर्गाची मते मिळवून ते निवडून आले होते. २००४च्या शेवटी अबू मुसाब अल-झरकावींच्या नेतृत्वाखाली अनेक परदेशी लढवय्यांनी इराकमध्ये शिया व सुन्नी पंथियात यादवी युद्ध सुरू केले होते आणि २००४च्या ऑक्टोबरमध्ये झरकावींनी ओसामा बिन लादेन यांच्याबाजूने आपली निष्ठा जाहीर केली होती. बिन लादेननी झरकावींच्या हातात "मेसोपोटेमियातील अल कायदा" ही नवी संघटना स्थापून दिली व त्यांना आपले इराकमधील प्रतिनिधी म्हणून नेमले. या संघटनेने इराकमध्ये शिरच्छेद, सरसकट कत्तली आणि आत्मघाती बाँबहल्ले करून 'न भूतो न भविष्यति' असा हिंसाचाराचा हैदोस घातला. या हिंसांनी शिया पंथाच्या अतीशय आदरणीय मानल्या जाणार्‍या मशीदीना आणि दर्ग्यांना घेरले आणि या हिंसाचारात इराणहून गेलेल्या हजारों यात्रेकरूंचे शिरकाण झाले होते. निवडून आल्याबरोबर अहमदीनेजादनी इराणच्या परमाणूप्रकल्पाला राष्ट्रीय प्राधान्य दिल्याची घोषणा करून इराणने आपला एसफाहान येथील युरेनियम अतिशुद्धीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याचे उघड केले. वाटाघाटीमध्ये इराणचे प्रमुख असलेले अली लारीजानी यांनी चिथावणीखोरपणे जाहीर केले कीं इराणला NPT करारान्वये इंधनरूपात युरेनियम बनविण्याचा पूर्ण अधिकार होता.

परमाणूप्रकल्पाबद्दल बोलूनच अहमदीनेजाद थांबले नाहींत. त्यांनी वारंवार व जाहीरपणे पाश्चात्य राष्ट्रांना डिवचले. होलोकॉस्ट या नांवाने (कु)प्रसिद्ध असलेल्या नाझीकाळातील ज्यूंच्या सामूहिक हत्याकांडाच्या व्याप्तीबद्दल शंका उपस्थित करून त्यांनी त्यावर विश्वास नसल्यांची आणि त्यात बदल करू इच्छिणार्‍यांची दुसर्‍या महायुद्धातल्या या कपोलकल्पित (आणि खोट्या) घटनेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेल्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी एक संमेलन बोलावले. त्यांनी या संमेलनात जगाच्या पाठीवरून ज्यू राष्ट्र (इस्रायल) पुसून टाकण्याचे आवाहन केले. हे आवाहन त्यांनी अरब जगतातील सुन्नी लोकांनी शिया इराणच्या अटळ उदयाकडे जास्त लक्ष देऊ नये यासाठी (त्यांना समजेल अशा भाषेत) केले होते! पण सुन्नी अरबी जनतेला कळले कीं नाहीं कुणास ठाऊक, पण ते अमेरिकेला आणि इस्रायलला चांगलेच झोंबले. बुश-४३ यांचे अधिकारी अहमदीनेजादना 'भावी' हिटलर असे संबोधू लागले. मध्य-पूर्व व पाकिस्तानबद्दल भरपूर लिखाण करणार्‍या सेमूर हर्श यांना अमेरिकन गुप्तचरसंघटनेचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले कीं सगळे त्यांना याच नावाने संबोधत होते आणि वर विचारत होते कीं इराणच्या हातात अणूबाँब पडल्यावर ते तिसरे महायुद्ध तर सुरू नाहीं ना करणार?

अहमदीनेजाद यांच्या उद्रेकामुळे इराणबद्दलच्या धोरणाचा गंभीरपणे आढावा घेण्यात आला व परराष्ट्रमंत्रालय, 'पेंटॅगॉन' आणि CIA यांच्यावर इराणवर स्वारी करण्याच्या उद्देशाने माहिती मिळविण्यासाठी आणि तिचे पृथःकरण करण्यासाठी 'व्हाईट हाऊस'कडून प्रचंड दबाव आणण्यात आला. AEI आणि WINEP[१३] या व यांच्यासारख्या समविचारी संघटनांसह राजवट बदलण्याची भाषाही सुरू झाली व भावी संभाव्य राज्यकर्त्यांची नावेसुद्धा विचारात घेण्यात येऊ लागली. अशीच यादी इराकसाठीही बनविण्यात आली होती व त्यात इराकी नॅशनल काँग्रेसचे बदनाम नेते अहमद चलाबींसारख्यांचीही नावे होती. चलाबी हेच सद्दाम यांच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांबद्दलच्या खूपशा चुकीच्या माहितीचा उगम होते.
AEI, WINEP सारख्या संस्था १९९९च्या विद्यार्थी बंडापासून सक्रीय होत्या व त्यांनी या बंडाळीचा 'इराणची सुधारणा मोहीम' असा चुकीचा अर्थ काढला होता. AEI आणि WINEP यांनी १९७९सालच्या राज्यक्रांतीच्या वेळी बाहेर पडलेल्य सहा लाख इराण्यांची वस्ती असलेल्या 'लॉस एंजेलेस' शहरात चलचित्रवाणीची इराणमध्येही दिसू शकणारी फारसी वाहिनी सुरू केली. या वाहिनीवरून रेझा पहलवी या शहांच्या मुलाने राजेशाही थाटात इराण्यांना उठाव करण्याची चिथावणी दिली. पाच महिन्यांनंतर पहलवींनी WINEPमधे दिलेल्या भाषणात या उठावाचा पुनरुच्चार केला. CIAचे समर्थन लाभलेल्या इतर रक्तरंजित हातांच्या नेत्यांच्या मानाने पहलवी फारच स्वच्छ हाताचे होते! पहलवी स्वतःला इराणचे सनदशीर सम्राट समजत आणि त्यांना शीघ्रकोपी आणि अयोग्य निवेदने देण्याची संवय होती!

२००२च्या State of the Union अभिभाषणात बुश-४३ यांनी इराणची दुष्टांच्या अक्षात इराणची गणना केल्यापासून पहलवींनी मित्रांना सांगितले कीं ते घरी जाऊ इच्छित होते. पण बुश-४३ यांच्या भाषणानंतर इराणचे अमेरिकेबरोबरचे संबंध आणखीच बिघडले आणि अमेरिकेच्या पुढच्या वर्षीच्या इराकमोहिमेनंतर ते आणखीच लयाला गेले आणि इराणस्थित नागरिक निष्क्रीय आणि नैराश्यग्रस्त झाले .

अमेरिकेचे राजवट बदलण्याचे बेत जसे पक्के होऊ लागले तशी इराणला भीती वाटणे सहाजीकच होते. २००३मध्ये 'पेंटॅगॉन'ने इतर विरोधी पक्षांशी संधान बांधण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली व त्यात नातांझच्या परमाणूप्रकल्पाची माहिती उघड करणारी मुजाहिदीन-ए-खल्क ही वादग्रस्त संघटनाही होती. 'पेंटॅगॉन'ने राष्ट्राध्यक्षांकडूनच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या सूचनेचा मसूदा बनविला व त्यात इराणमधील विद्यार्थ्यांना आपापसात व परदेशस्थांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी लागणारी साधने देणे, 'पासदाराने इन्किलाब'च्या[१४] सदस्यांना विकत घेणे किंवा निकामी करणे आणि लॉस एंजेलिसमधील उपग्रहाद्वारे कार्यरत मीडियाच्या कळीला समर्थन देणे यांचा समावेश होता. कॅन्सस राज्यातील रिपब्लिकन सिनेटर ब्राऊनबॅक यांनी १० कोटी डॉलर्स इराणमधील अशा सक्रीय विरोधी गटाना पोचविण्यासाठीच्या बिलावर सहीसुद्धा केली.

वॉशिंग्टनमधून 'राणा भीमदेवी'छाप गर्जना वाढत होत्या. अहमदीनेजाद १९८३च्या बेरूतमधील अमेरिकन दूतावास व अमेरिकन बराकीवरील हल्ला घडवून आणणार्‍या दहशतवादी संघटनेचे[१५] सभासद असल्याचा 'तर्क' एक वस्तुस्थिती म्हणून 'व्हाईट हाऊस'कडून प्रसृत करण्यात आला आणि इराणच्या नातांझ व इस्फाहान येथील परमाणूप्रकल्प उध्वस्त करण्याचे उल्लेख सुरू करून तणाव वाढविण्यात आला. असले उल्लेख आणि दहशतवादाविरुद्धचे युद्ध आणि अण्वस्त्रप्रसारविरोध हा कळीचा शब्द यांना एकत्र वापरून एक ताकीद देण्यात आली, "दहशतवादी गटांना अण्वस्त्रे पुरवणे चालू देता कामा नये. ते फार धोक्याचे आहे!"

बुश जे करावे लागत होते ते करण्याची हिंमत भविष्यकाळातल्या कुठल्याच राष्ट्राध्यक्षात-डेमोक्रॅटिककिंवा रिपब्लिकन-असणार नाहीं असा उदो-उदो करायला बुश-४३ यांच्या अधिकार्‍यांनी सुरुवात केली. इराकमधील दोन पंथातल्या रक्तपातामुळे "इराक मोहिमेचे अध्वर्यू" ही प्रतिमा कुठल्याच नेत्याला नको होती, म्हणून इराणला वाचवणारे राष्ट्राध्यक्ष अशी प्रतिमा बुशना बनवायची होती. झाल्मय खलिलजाद यांच्यासारख्या अफगाणी-अमेरिकन मुस्लिम अधिकार्‍याला इराकचे राजदूत म्हणून पाठवूनही तिथला नरसंहार थाबला नव्हता आणि तिथे एक आदर्श लोकशाही स्थापण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची लक्षणे दिसत नव्हती असे अमेरिकन अधिकारी मान्य करू लागले होते. इराकमधील आणीबाणीची स्थिती इतक्या पराकोटीला गेली होती कीं अमेरिकेच्या मध्य-पूर्वेतील मित्रराष्ट्रांनाही चिंता वाटू लागली होती. एरवी कधीही न बोलणारे सौदीचे परराष्ट्रमंत्री व फैसल या सौदीच्या राजाचे सुपुत्र सौद अल-फैसल यांनी त्यांच्या २००५च्या सप्टेंबरच्या अमेरिकावारीत इराकच्या ठिकर्‍या होण्याच्या शक्यतेबद्दल ताकीद दिली होती.

रम्सफेल्ड यांच्या हुकुमानुसार इराकमधून इराणमध्ये गुप्तपणे गेलेल्या अमेरिकेच्या सैनिकांनी जमा केलेल्या माहितीवरून अमेरिकेच्या विमानदलाने इराणमधल्या ४०० जागा बाँबहल्ल्यासाठी हेरून ठेवल्या. अमेरिकेच्या कायद्यातील पळवाटांचा उपयोग करून, प्रतिनिधीगृहाची परवानगी न घेता टोळीवाल्यांना आणि धनगरांना पैसे देऊन मिळविलेली ही माहिती अचूक नव्हतीच. 'व्हाईट हाऊस'ला अवैध मार्गाने महिती मिळविण्याचे आणखी इतर मार्गही सापडले. बुश-४३ इराकवरील त्यांच्या चढाईला समर्थन देणार्‍या कांहीं निवडक राजकीय नेत्यांना आपल्या इराणच्या योजनांबद्दल माहिती देत असत. कांहीं नेत्यांनी असहमती दाखविली पण त्यांनी जे मार्मिक प्रश्न विचारले त्यावरून 'पेंटॅगॉन'चे युद्धाचा व्यूह रचणारे अधिकारी हे युद्ध कुठल्या दिशेने नेत होते याबद्दलची धक्कादायक माहिती बाहेर येत होती. उदाहरणार्थ जेंव्हां या नेत्यांनी एकाच वेळी इराणच्या परमाणूप्रकल्पाच्या सगळ्या जागा एकसमयावच्छेदेकरून नष्ट करण्याच्या काय योजना होत्या असे रम्सफेल्डना विचारले तेंव्हां त्यांचे उत्तर थक्क करणारे होते. बंकर्स भेदून जाऊ शकणारे 'B61-11' प्रकारचे अणूबाँब वापरण्याची त्यांची योजना होती व ही विमाने अमेरिकेच्या अरबी समुद्रात उभ्या असलेल्या विमानवाहू नौकांवरून उड्डाण करणार होती व या उडाणांचा सरावही सुरू केला होता. युद्धाची ही कल्पना रॉबर्ट जोसेफ यांच्या २००१ सालच्या डावपेचांच्या एका खास व्युहपत्रिकेबरहुकूम होता. 'B61-11' अणूबाँब हा जमीनीत भोक पाडून आत घुसणारा आणि नंतर होणार्‍या स्फोटामुळे जमीनीखाली मुद्दाम ठेवलेल्या परमाणूप्रकल्पांवरील काँक्रीटचे अनेक स्तर उद्ध्वस्त करण्याची शक्ती असलेला बाँब होता.

जोसेफ यांच्या सूचनेचा परिणाम युद्धात अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अशा ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍यांतही दोन भाग पडण्यात झाला. अणूबाँबचा वापर केल्यास किरणोत्सर्ग, प्रचंड नरसंहार आणि सर्व वातावरण अनेक वर्षें दूषित होणे असे गंभीर परिणाम होणार होते. अणूबाँब वापरण्याच्या सर्व विध्वंसक पर्यायाचा 'जगन्नाथाचा रथ' काहींहीं करून थांबवायलाच हवा होता. ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍यांकडून अणूबाँब वापरण्याच्या पर्यायाला अधिकृतरीत्या विरोध असल्याची सूचना जारी करण्यात आली. दरम्यान IAEA च्या एलबारादेईंचा सल्ला होता कीं वाटाघाटींचा सातत्याने पाठपुरावा करणे हा एकच ही समस्या सोडविण्याचा मार्ग होत. मार्च २००६मध्ये एलबारादेईंनी ताकीद दिली कीं इराणमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीला तोंड देण्यासाठी एक सर्वंकश राजकीय समझोत्याची गरज होती. पण बुश-४३ यांनी ही ताकीद धुडकावून लावली आणि सांगितले कीं आमचे मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका लष्करी शक्तीचा उपयोग करेल. फुशारकी राहू दे बाजूला, पण अमेरिकेची लष्करी शक्ती शेजारच्याच इराकमध्ये अपयशी ठरत होती. अमेरिकेच्या मताला न जुमानता संयुक्त राष्ट्रसंघाने या युद्धाचे वर्णन यादवी युद्ध असेच केले होते. अहमदीनेजादनी आपल्या निवडणूक प्रचारात भाकित केल्याप्रमाणे २००६च्या फेब्रूवारीमध्ये शियापंथियांच्या सर्वात पवित्र समजल्या जाणार्‍या मशीदीत अल-झरकावींच्या आत्मघाती बाँबर्सनी घडवून आणलेल्या स्फोटात शेकडो इराणी यात्रेकरू मृत्यू पावले होते व त्याचा बदला म्हणून सुन्नी समाजावर आणि सुन्नी मशीदींवर हल्ले घडवून आणण्यात आले.

अमेरिकेची परिस्थिती कमकुवत असल्याचे जाणविल्यामुळे इराणने आपण नातांझ येथील युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या सेंट्रीफ्यूजेस पुन्हा सुरू करीत आहोत असे जाहीर केले. मग अमेरिकेने IAEAवर दबाव आणून इराणची बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे पाठविण्यासाठी बैठक घेण्यास भाग पाडले. जोसेफ व्हिएन्नाला गेले व त्यांनी एलबारादेईंना इराण अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षिततेला एक थेट धोका बनला असून तो धोका अमेरिका सहन करणार नाहीं व म्हणून इराणमध्ये एकही सेंट्रीफ्यूज फिरता कामा नये असा स्पष्ट निरोप दिला. नुकतेच नोबेल पारितोषिक जिंकलेल्या एलबारादेईंना युरेनियम प्रकल्पात जरी इराणच्या लष्कराची लुडबूड दिसत असली तरी इराणमध्ये विघटनशील मूलद्रव्यांचा अणूबाँब बनविण्यात वापर होतोय् हे पटले नव्हते. युरोपीय देशही अमेरिकेने इराणबरोबर बोलणी करावीत या पक्षाचे होते. शेवटी IAEAने इराणची बाब सुरक्षा समितीकडे सोंपविण्याला मान्यता दिली पण बुश-४३ इराणशी वाटाघाटी न करण्यावर ठाम राहिले. वॉशिंग्टनला सरकार उलथून टाकायचे होते व रेडियो/टीव्हीप्रसारण अमेरिकेतून इराणला करण्याच्या सुविधेसाठी साडेआठ कोटींच्या निधीची मागणी राईसबाईंनी प्रतिनिधीगृहाकडे केली. कॅलीफोर्नियातील 'रेडियो फर्दा' या स्टेशनाने मोसादने एक बक्षिसे मिळविलेले इराणी परमाणू वैज्ञानिक अर्देशीर हसनपूर यांची हत्या केल्याची बातमी थेट प्रक्षेपित करून आपली अशा थेट प्रक्षेपणाची क्षमता सिद्ध केली होती. इस्रायल आता थेट हल्ला करेल कीं काय याबद्दलच्या अटकळी चर्चेत आल्या.

अमेरिकेचा बोलणी न करण्याबद्दलचा हट्टीपणा तसाच राहिला. २००६च्या मार्चमध्ये निकोलास बर्न्स[१६] यांनी परमाणूप्रकल्पाबद्दल इराणशी थेट वाटाघाटी करणे परिणामकारक होईल ही कल्पनाच धुडकावून लावली. अमेरिकेचे IAEAचे राजदूत 'ग्रेगरी शूत्झ' इराणशी बोलणी करण्याविरुद्धच्या धोरणाबद्दल जास्त विस्ताराने बोलताना म्हणाले परमाणूप्रकल्पाबाबत इराणशी थेट वाटाघाटी करण्याचा अमेरिकेचा अजीबात इरादा नसून फक्त त्यांच्या इराकमधील अस्थिरतेमधील योगदानाबद्दलच अमेरिका त्यांच्याशी बोलायला तयार होती. या वेळेपासून तसा कुठलाही विश्वसनीय पुरावा नसतानादेखील बगदादमधील रक्तपात आणी तेहरान यांच्यातील दुवा ('पासदाराने इन्किलाब'च्या[१४] जिहादींनी इराकमधील अतिरेक्यांना प्रशिक्षण दिल्याचे आरोप) वारंवार पुढे करणे सुरू केले. असे आरोप करण्यामागे इराणला हल्लेखोर ठरवून त्याच्यावर पुढे-मागे हल्ला करण्यासाठी पार्श्वभूमी करण्याचा व त्यातून इराकमधील हाताबाहेर चाललेल्या युद्धावर नियंत्रण आणण्याचाच होता असे मत ब्रेझिन्स्कींनी[१७] व्यक्त केले.

अहमदीनेजाद यांची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती. २००६च्या एप्रिलमध्ये त्यांनी नातांझ येथील युरेनियमचे शुद्धीकरण ३.५ टक्क्यापर्यंत पोचल्याचे जाहीर केले. या यशाचा अर्थ होता कीं इराणी वैज्ञानिकांनी सेंट्रीफ्यूजेस चालविण्याची अवघड पद्धती आत्मसात केली होती. आणखी ३००० सेंट्रीफ्यूजेस एक वर्षाच्या आत कार्यरत करण्याची योजना वेळापत्रकानुसार चालू होती व यावरून इराण याहून जास्त शुद्धीकरणाची पातळी गाठेल असे भाकित करण्यात येऊ लागले. चार आठवड्यांनंतर इराणने ४.८ टक्क्याची पातळी गाठल्याचे जाहीर करण्यात आले व शुद्धीकरणाची पातळी याहून जास्त वर नेऊन विघटनशील मूलद्रव्य बनविणे शक्य होईल यात शंका राहिली नाहीं. १९७९नंतरच्या अमेरिकन आणि इराणी राष्ट्राध्यक्षांत झालेल्या पहिल्यावहिल्या थेट संदेशात अहमदीनेजादनी बुश-४३ना आंतरराष्ट्रीय समस्यांतून आणि त्यावेळच्या जागतिक नाजुक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बोलणी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले.

२००६च्या मेमध्ये दिलेल्या अमेरिकेने दिलेल्या उत्तरात राईसबाईंनी लिहिले होते कीं जर इराणने परमाणूसंबंधीच्या सर्व हालचाली थांबविल्या व IAEA च्या भेदक तपासणीला परवानगी दिली तर अशा तपासणीनंतर बोलणी करायला अमेरिकेची तयारी होती. अहमदीनेजादनी याला नकार देऊन IAEAचा ऑगस्टमध्ये ठरलेला तपासणीदौराही रद्द केला. जेंव्हां सुरक्षा समितीने युरेनियम अतिशुद्धीकरण थांबविण्यासाठी इराणला त्यांच्याच एका ठरावानुसर दिलेली निर्वाणीची तारीख ३१ ऑगस्टपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिल्यावर अमेरिका नाराज झाली व तिने एकतर्फी कारवाईला जास्त श्रेयस्कर ठरवून इराण स्वातंत्र्य समर्थन ठराव संमत करून घेतला ज्या अन्वये इराणच्या परमाणू कार्यक्रमाला मदत करणार्‍या सर्व राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिली. पाठोपाठ इराणने नातांझला सेंट्रीफ्यूजेसच्या आणखी १६४ मालिका (Cascades) सुरू करून सडेतोड प्रत्युत्तर दिले.

प्रलोभन नाहीं, प्रहार नाहीं, बोलणीही नाहींत! अमेरिकेचे हे धोरण अमेरिकेला नाशवंत अशा आगीच्या डोंबाकडे नेते होते याची प्रचीती २००६च्या ऑक्टोबरमध्ये आली. उ.कोरियाने आपला युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प मागे घेण्याची तयारी दर्शवण्याच्या पर्यायापासून अण्वस्त्रप्रसारविरोधी करारातून[१८] बाहेर पडण्याच्या पर्यायापर्यंतचा प्रवास बोल्टन आणि जेम्स केली यांच्या हस्तक्षेपानंतर थोड्याच महिन्यांत ऑक्टोबर २००२मध्ये पार पाडला होता. २००६च्या ऑक्टोबरमध्ये उ.कोरियाने प्योंग्यांगच्या २४० मैल ईशान्येला एका जमीनीखाली खणलेल्या बोगद्यात आपली पहिली अण्वस्त्रचांचणी केली. ही ऐतिहासिक घटना असून स्वतःचे शक्तिशाली संरक्षणसामर्थ्य हवे असलेल्या कोरियाच्या सैन्याला आणि जनतेला मुदित केले आहे अशी घोषणाही सरकारी प्रवक्त्याने केली. चीनने या चांचणीचे "मुर्दाड" असे वर्णन केले तर जपानने तिचे वर्णन अक्षम्य असे केले. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सभापती डेनिस हेस्टर्ट यांनी या चांचणीला तुच्छ लेखत हा स्फोट एका गुन्हेगार सरकारची अविचारी कारवाई आहे असे निवेदन दिले. पण गालुच्चींसारख्या अनुभवी लोकांच्या दृष्टीने हे अमेरिकच्या नव्या अण्वस्त्रप्रसारविरोधी परराष्ट्रनीतीचा पहिला लक्षणीय पराभव होता आणि इराणबरोबरही याच परराष्ट्रनीतीचा वापर केला जात होता.

यानंतर इराणवरचा मानसिक दबाव वाढविण्यात आला. २००६च्या नोव्हेंबरमध्ये "इराणने "झिरजमीन-२७"[१९] अशा परवलीच्या शब्दाचा एक गुप्त लष्करी प्रकल्प सुरू केला आहे" असा लंडनच्या 'डेली टेलिग्राफ'ने आरोप केला. या प्रकल्पाचा उद्देश अण्वस्त्रयोग्य शुद्धता असलेले युरेनियम बनविणे आणि त्याला पुरावा होता IAEAच्या शास्त्रज्ञांनी कापसाचा बोळा वापरून आणलेल्या इराणच्या साधनसामुग्रीवरील युरेनियमच्या धुळीच्या नमुन्यात सापडलेली अण्वस्त्रयोग्य शुद्धता[२०]. पण ही सारी साधनसामुग्री 'चोरी-चोरी' पाकिस्तान किंवा चीनकडून आलेली होती व म्हणून IAEAने या उच्च शुद्धतेचा उगम पाकिस्तान किंवा चीनकडून आलेली ही सामुग्री किंवा 'प्रकल्प A/B'साठी पाठविलेल्या अतिशुद्ध युरेनियमच्या ड्रम्समधील अवशेष असल्याचे IAEAने अनुमान काढले होते. 'डेली टेलिग्राफ'चा हा लेख कदाचित् खोडसाळ असेल, पण त्याबद्दल माहिती पुढे येत आहे.

२००६च्या निवडणुकीत सिनेट व प्रतिनिधीगृह ही दोन्ही गृहे रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाला गमावली. त्यात ८ नोव्हेंबरला रम्सफेल्डना राजीनामा द्यावा लागला होता. तरीसुद्धा बुश-४३ यांची 'ब्रिंकमनशिप'चे[२१] धोरण चालूच राहिले! तीन महिन्यानंतर तर रम्सफेल्ड, वुल्फोवित्झ व उपसंरक्षणमंत्री एरिक एडल्मन यांच्यावर इराकवरील गुप्तहेरखात्यांच्या माहितीत हेराफेरी केल्याचा आरोप झाला! त्यांनी चक्क 'पेंटॅगॉन'मध्ये मुलकी अधिकार्‍यांना नोकरीवर नेमून त्यांच्याकडून CIAकडून मिळालेल्या माहितीला शह द्यायचा प्रयत्न केला. या चमूने अस्तित्वात असलेल्या गुप्त फायलीतील माहिती पिंजून काढली. या माहितीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि त्याचे पृथःकरण नीट केले गेले नव्हते असा दावा बुश-४३ यांच्या अधिकार्‍यांनी केला होता! पण सत्यपरिस्थिती अशी होती कीं या चमूला जहाल गटाच्या मतांशी जुळणारी माहिती निवडून ती राष्ट्राध्यक्षांकडे पोचवायची जबाबदारी दिली होती. त्यांचा रोख इराण, उ.कोरिया आणि इराकवर होता. २००२च्या उन्हाळ्यात[२२] या चमूचे सारे प्रयत्न सद्दाम हुसेन यांचा अल कायदाशी कसा संबंध होता हे दाखविण्याकडे होते. याची परिणिती शेवटी संरक्षण धोरणाच्या विभागाचे उपपरराष्ट्रमंत्री डग्लस फाईथ यांना "इराक व अल कायदा यांच्यात संबंध आहेत" या अर्थाचा अहवाल देण्यात झाला व त्याच्या आधारें इराकमधील राजावट बदलायचे धोरण आखण्यात आले.

२००४च्या जुलैमध्ये ९/११वरील आयोगाने इराकी सरकार आणि अल कायदा यांच्यातील संबंध कधीही परस्परसहाय्य करून एकाद्या घटनेत सक्रीय सहभाग घेण्याइतके जवळचे झाले असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाहीं निष्कर्ष काढला. याच आरोपाबद्दलची चौकशी सिनेटच्या सेनादल समितीवरील डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ सभासद सिनेटर लेविन यांनी केली होती. त्या चौकशीत अधिकृत गुप्तहेरसंघटना साशंक असतांना अयोग्य प्रकारे वैकल्पिक पृथक्करण करून इराक व अल कायदा यांच्यातील संबंध अतिरंजित करणार्‍या रम्सफेल्ड यांच्या अनधिकृत गुप्तहेरचमूबाद्दलची माहिती बाहेर आली. मग इन्स्पेक्टर जनरलना पाचारण करण्यात आले आणि २००७च्या फेब्रुवारीत त्यांनी अधिकृत गुप्तहेरखात्यातील अधिकार्‍यांच्या एकमताने काढलेल्या निष्कर्षांपासून वेगळे अशी वैकल्पिक गुप्त माहितीच्या मूल्यांकनाची निर्मिती, विकसन आणि प्रसारण करणार्‍या 'पेंटॅगॉन'मधील या अनधिकृत मुलकी अधिकार्‍यांवर टीका केली. थोडक्यात सांगायचे तर रम्सफेल्ड यांच्या या 'सेने'ने इराकबरोबरच्या युद्धाच्या बाजूने चुकीने जनमत बनविले होते. एव्हाना सिनेटच्या सेनादल समितीचे अध्यक्ष झालेले लेविन म्हणाले की कितीही अपुरा संबंध असो, या चमूला तो पुरावा म्हणून वापरायचा होता!

इराकनंतर आता इराणबद्दलही हाच प्रयोग सुरू झाला होता. खोटे-नाटे लेख अमेरिकन आणि ब्रिटिश वृत्तपत्रात येऊ लागले होते त्यात इराण 'अल कायदा'वर हुकूमत आणू इच्छित आहे हीही बातमी आली होती. म्हणजे एका कट्टर शिया पंथाचे पुनरुत्थापन करण्याच्या चळवळीने सुन्नींच्या वाहाबी गटाच्या अतिरेक्यांना हाताशी धरत आहे ही बातमीच अतर्क्य होती. पण AEI[१३] या संस्थेला तो पुरावा ग्राह्य वाटला आणि या संघटनेच्या मुरावचिक नावाच्या निवासी अभ्यासकाने २००४च्या नोव्हेंबरमध्ये बुशच्या अधिकार्‍यांना दिलेल्या व्याख्यानाची सुरुवातच "आपण इराणवर बाँबहल्ले केले पाहिजेत"या वाक्याने केली.

मुरावचिक हा बुश-४३ यांच्या जहालमतवादी गटाला चांगला माहीत होता. त्यांनी जाहीर केले कीं शिया पंथीय सुन्नी लोकांचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होत आहेत व म्हणून ते अल कायदावर ताबा मिळवू शकतील. इराण दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊ लागलेला असून हे लेबॅननमधील शिया हिजबोल्ला आणि गाझापट्टीतील पॅलेस्टिनी सुन्नी यांच्यातील करारावरूनही उघड होते असे आरोपही 'डेली टेलिग्राफ'मधील लेखांत आले. या परिस्थितीवर विजय मिळविण्यासाठी इराकवर केली तशी स्वारी करणे हा योग्य उपाय नसून इराणच्या सर्व परमाणूसुविधा हवाई हल्ले.करून नष्ट करणे हा योग्य उपाय होता असे मुरावचिक यांनी लिहिले होते. त्यांच्या मते १५०० परमाणूकेंद्रे लक्ष्य म्हणून निवडता येतील. यातील बहुसंख्य लक्ष्यें जर कांही दिवसांच्या प्रखर बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त करता आली तर इराणचे कंबरडेच मोडेल. असा हल्ला न करणे हे चर्चिल यांनी सांगूनसुद्धा १९१७ साली बोल्शेविक चळवळीला नेस्तनाबूत न केल्याच्याच पातळीचे इतिहासाचे विडंबनच ठरेल असेही त्यांनी लिहिले होते. नवे लेनिन बनू इच्छिणार्‍या अहमदीनेजादना शक्तीचा उपयोग करून थांबवता येईल असेही त्यांचे मत होते.

२००६च्या निवडणुकांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या प्रतिनिधीगृहाने इराकमधील वाढत्या रक्तपाताच्या दंगलीपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधण्यासाठी एक द्विपक्षीय "इराक अभ्यास समिती" नेमली होती. या समितीने डिसेंबरमध्ये आपला अहवाल सादर केला व त्यात इराक युद्ध नजीकच्या भविष्यकाळात संपेल असे वाटत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी इराण आणि सीरियाबरोबरच्या मुत्सद्देगिरीत वाढ करून व टप्प्याटप्प्याने अमेरिकन सैन्य परत आणणे यातच अमेरिकेचे हित आहे असा निष्कर्ष काढला. पण त्यानंतर कांहींच आठवड्यांनंतर इराकमधील शिया राजवटीने सद्दामना फासावर चढविले. त्यावेळी फास त्यांच्या गळ्याभोवती घालतांना रक्षकांनी त्यांच्यावर टोमणे मारून डिवचल्याची चित्रफीत प्रसृत झाली व बुश-४३ पुन्हा बलप्रयोगाकडे वळले. १० जानेवारीला 'व्हाईट हाऊस'च्या वाचनालयातून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी इराकमध्ये चुकीचे डावपेच वापरल्याची कबूली राष्ट्रीय चित्रवाणीद्वारा दिली पण फौजा मागे घेण्याऐवजी आणखी २१,५०० सैनिक तिथे पाठविण्याच्या आपल्या निर्णयाला राष्ट्राकडून पाठिंबा मागितला.

या 'सैनिक लाटे'चे जनक फ्रेडरिक कागन[२३] होते. त्यांच्या मते विजय हा अद्यापही एक विकल्प होता व इराकमध्ये आज पराजय स्वीकारल्यास याहून जास्त जालिम परिस्थितींत भविष्यकाळात याहूनही जास्त त्याग करावा लागणार होता. विजयाच्या बाजूला उभे राहिल्यास आपल्या मित्रांना आणि शत्रूंना अमेरिका आपले सामर्थ्य दाखवू शकेल असेही त्यांनी सांगितले. बुश-४३ यांना ते पटले व त्यांनी लगेच जास्तीचे सैनिक पाठवायला सुरुवात केली. अमेरिकन आणि ब्रिटिश नैसेनादलांनीही अनेक लढाऊ जहाजे व विमानवाहक जहाजे पाठविली. नुकत्याच सुरक्षा समितीकडून मर्यादित निर्बंधांचा फटका बसलेल्या इराणचेही तिकडे पूर्ण लक्ष होते. इराणच्या परमाणूप्रकल्पावरून सुरू झालेली ही समस्या २००७च्या जानेवारीपर्यंत चालूच राहिली. अहमदीनेजादनी ३८ परमाणू अन्वेषकांना इराणमध्ये यावयास मनाई केली आणि इराणचा परमाणू इंधन निर्मितीचा प्रकल्प नातांझ येथे कार्यरत असलेल्या ३००० सेंट्रीफ्यूजेस वापरून युरेनियमच्या ४.८ टक्के शुद्धीकरणासह कांहीं आठवड्यातच संपेल असे जाहीर केले.

इराणच्या अण्वस्त्रधोक्याला छिद्र पाडण्याऐवजी अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात धोरणामुळे तो धोका वाढलाच होता. अहमदीनेजाद यांच्या युद्धखोर परराष्ट्रीय धोरणावर आधी टीका झाली होती त्या धोरणाला आता पुष्टीच मिळाली. इराणने असा संभाव्य युद्धाचा पवित्र घेतल्यावर सारे इराण त्यांच्यामागे उभे राहिले. २००७च्या एप्रिलमध्ये नातांझ येथील भाषणात अहमदीनेजादनी जाहीर केले कीं इराणच्या शास्त्रज्ञांनी एक मोठी छलांग मारली असून आता त्यांची अतीशय सुसूत्रपणें चालणारी ३००० सेंट्रीफ्यूजेस एका औद्योगिक स्तरावर युरेनियम अतिशुद्धीकरण करण्यात यशस्वी झाली आहेत. याचा अर्थ होता कीं नऊ महिन्यात एक अणूबाँब बनवता येईल इतके शुद्ध युरेनियम इराण बनवू शकणार होता. अहमदनेजाद हे स्वतःच स्वतःचे सर्वात मोठे शत्रू असून अमेरिकेतील जहालमतवादी नेते त्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत असे मत अली अन्सारींनी[२४] व्यक्त केले. IAEAच्या एलबारादेईंनी दोन्ही बाजूंनी थंड होण्यासाठी वेळ मागितला तर एक युरोपियन मुत्सद्दी म्हणाले कीं यावेळी जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर अहमदीनेजादसुद्धा अरब विश्वाचे[२५] सद्दामपेक्षा जास्त विश्वासार्ह व समर्थ असे नवे सद्दाम बनतील!

परराष्ट्रमंत्रालयात चिंतेचे वातावरण होते. कारण अण्वस्त्रप्रसारविरोधी प्रतिघात धोरणामुळे दुष्टांच्या अक्षातल्या एका देशाने अण्वस्त्रचांचणी केली होती आणि दुसरा ती करायला तयार होत होता. दरम्यान बुश सरकारने उ.कोरियाबरोबरचे आपले युद्धखोर धोरण सोडल्याचे २००७च्या फेब्रुवारीत जाहीर केले. चीनच्या दबावाखाली वाटाघाटीला तयार झालेल्या बुश-४३च्या अधिकार्‍यांनी चीनच्या दबावामुळे गेली पाच वर्षें उ.कोरियावर घातलेले बहुतेक निर्बंध उठवलेच होते. अमेरिका पूर्वी होती त्याच जागी परत आली होती आणि अमेरिकेच्या धाकदपटशामुळे कांहींच साध्य झाले नव्हते असे मत या वाटाघाटीत पूर्वी भाग घेतलेल्या उ.कोरियाच्या भूतपूर्व परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केले.

उ.कोरियाने इराणला एका वर्षात अण्वस्त्रचांचणीसज्ज करण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिल्याचा निनावी गुप्तहेर अधिकार्‍यांनी केलेल्या आरोपाचे वृत्त लंडनच्या 'डेली टेलिग्राफ'ने प्रसिद्ध केले. तीन आठवड्यानंतर बुश-४३ सरकारने पुन्हा जुना सूर लावला. इराणच्या नेत्यांवर इराकला शस्त्रास्त्रें आणि अनेक अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांना कंठस्नान घालण्यात यशस्वी ठरलेल्या डावपेचांबद्दलचे ज्ञान देऊन इराकमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.

पण साधारणपणे होकारात्मक स्वभावाच्या ज.पेसना हे पटले नाहीं. इराकमधील परिस्थितीचे आशादायक चित्र रंगविण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पेसना यात इराणचा हात आहे हे मान्य नव्हते. नुकताच निवडणुकीत झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन बुशनी पुन्हा एकदा आपले पाऊल मागे घेतले. सिनेटमध्ये बोलताना सिनेटर हिलरी क्लिंटननी ताकीद दिली कीं इराकमधील चुकांतून आपण सगळेच शिकलो आहोत. ते ज्ञान इराणच्याबाबतीत केल्या जाणार्‍या आरोपांमध्ये वापरले पाहिजे. बुश-४३ना संबोधून त्या पुढे म्हणाल्या कीं पुन्हा जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे असे दिसते. आपण पुन्हा कधीही चुकीच्या गुप्त माहितीवर अवलंबून निर्णय घेता कामा नये. पण बुश फारसे बधले नाहींत.
अमेरिकेच्या इराणबरोबरच्या धोरणात फारसा बदल झाला नाहीं याचा सर्वात जास्त आनंद अल कायदाच्या डवपेच आखणार्‍या विभागाला झाला असणार कारण इराणबरोबरचे अमेरिकेचे युद्ध त्यांच्या सर्वंकष योजनांना सोयीचे होते. २००१च्या नोव्हेंबरच्या युद्धात अल कायदाला दारुण पराभव पत्करावा लागला होता व त्यांच्या ७५ टक्के प्रशिक्षित सैनिकांची कत्तल झाली होती. त्यामुळे तेही काय चेकले व त्यातून काय धडा घेतला पाहिजे याबद्दल विचार करत होते. मुस्ताफा सेत्मारियम नासर या सीरियन तरुणाने भूमिगत असताना अबू मुसाब अल सुरी[२६] या टोपणनावाखाली अरबी भाषेत एक "Call to Worldwide Islamic Resistance या नावाचे १६००-पानी सुस्पष्ट पुस्तक लिहिले होते आणि ते तो इंटरनेटवर चढवत होता. त्या पुस्तकात मुस्लिमांना शस्त्रास्त्रे धरण्याचे आवहन होते व युद्धाच्या एका नव्या स्तराच्या आगमनाची पूर्वसूचना होती. या प्रणालीनुसार अमेरिकेच्या आणि तिच्या मित्रराष्ट्रांच्या मानवी व भौतिक संपत्तीचे कसे अतोनात विनाश होईल याची चर्चा होती व त्यात दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रें येणे हा महत्वाचा भाग होता.

अल-सुरींनी वापरलेली 'आयुष्याची पायवाट' बर्‍याच नव्या जिहादींच्या नेत्यांनी निवडलेली (व म्हणून परिचित) होती. सीरियात यंत्रशास्त्रातल्या अभियंत्याचे शिक्षण घेतलेले अल सुरी मग जॉर्डनला गेले व 'मुस्लिम ब्रदरहुड' या संघटनेत शिरले. स्फोटके व गनिमी काव्याच्या युद्धात तज्ञ समजले जाणारे अल सुरी त्यांचा भ्रमनिरास झाल्यावर स्पेनला अश्रयाला गेले. १९८०साली विवाहबद्ध झाल्यावर ते स्पेनचे नागरिकही झाले. १९८७साली स्पेन सोडून ते अफगाणिस्तानला गेले व तिथे ओसामांना भेटले. इतरांप्रमाणे ते मृदुभाषिक आणि तपस्व्यासारखे रहाणार्‍या ओसामांमुळे प्रभावित झाले नाहींत. त्यांना ओसामांच्या वाळवंटातील शिबिरांत अव्यवस्था आणि योजनांचा अभाव दिसला. अल सुरींच्या मते ओसामा हे आपले काम पुरेशा गांभिर्याने करत नव्हते. लोक रिकाम्या डोक्याने इथे येतात आणि रिकाम्या डोक्याने इथून जातात असे त्यांचे मत झाले.

असंतुष्ट होऊन अल सुरी स्पेनला व तिथून इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये ते धर्मगुरू आणि वृत्तपत्राचे संपादक असलेल्या अबू कताडा यांच्यासाठी बातम्या लिहू लागले. ब्रिटिश व अमेरिकन अधिकारी अल कायदासाठी युरोपमध्ये टेहळणी करणारे नेते असा अबू कताडांचा उल्लेख करू लागले. पुढे 'शू बाँबर' रिचर्ड रीड आणि ९/११च्या हल्ल्याचे योजक म्हणून २००६ साली जन्मठेप झालेल्या झकारियास मुसावी यांना अध्यात्मिक मार्गदर्शन केल्याबद्दल ते (कु)प्रसिद्ध झाले. पॅरिसमधल्या १९९५सालच्या मेट्रोवरील बाँबहल्ल्यात त्याचा संबंध असल्याचे बरोबर अनुमान ब्रिटिश पोलिसांनी केले असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे ते १९९७साली अल सुरी पुन्हा अफगाणिस्तानला गेले तेंव्हां तालीबानने काबूल घेतल्याला एक वर्ष झाले होते. पाश्चात्य देशात "wanted" असलेल्या अल सुरींना इथे एका सार्वभौमिक राष्ट्राकडून त्यांच्या जमातीच्या पाहुणचाराच्या प्राचीन नियमानुसार संरक्षण मिळत होते ही एक सुवर्णसंधीच वाटली. जिहादी तत्वांच्या भट्टीत एकसंध बनलेले हे राष्ट्र अल कायदाच्या कारवायांनाही लपवणार होते!
नेहमीच आघाडीवर असलेल्या अल सुरींनी लपलेले असताना काबूलजवळील अल घुराबा प्रशिक्षणकेंद्रात काम केले. तिथे त्यांची मिधात मुर्सी अल-सायिद (उर्फ अबू खबाब अल-मस्री) या इजिप्शियन रसायनशास्त्रज्ञाशी गट्टी जमली. ते अल-कायदाच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या विभागाचे प्रमुख होते आणि त्यांना अल सुरींनी अल कायदाकडचे शस्त्रागार सुधारण्यास मदत केली. अल सुरींना संहाराचा, अरिष्टांचा आणि प्रलयंकारी घटनांचा 'दादा' व्हायचे होते. एव्हाना ते उघड-उघड पुराणमतवादी ('सालाफी'[२७]) झाले होते.

अल सुरींनी नंतर दावा केला कीं ओसामांना सालाफी बनविण्यास आणि जोपर्यंत सार्‍या अरबी पवित्र भूमीवरून अमेरिकन सैन्य बाहेर जात नाहीं तोपर्यंत जिहाद चालूच राहिले पाहिजे असे त्यांच्या मनात विश्वास जागविण्यास तेच जबाबदार होते. पण १९९९मध्ये त्यांच्यात अध्यात्मिक व अधिभौतिक कारणावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यात ओसामांची प्रसिद्धीची आवड हेही एक कारण होते. त्यांच्या उस्फूर्त शाब्दिक हल्ल्याला सीएनएन आणि अल जझीरावर मिळालेल्या महत्वानंतर ओसामांना चित्रवाणीचा पडदा, कॅमेर्‍यांचे फ्लॅशबल्ब्स, चाहते आणि टाळ्या यांचा आजार जडलेला दिसतो असे अल सुरींनी लिहिले होते. पुढच्याच वर्षीं अल सुरी बाहेर पडले व अल मस्री नरसंहारक्षम शस्त्रास्त्रप्रकल्पाचे प्रमुख बनले व लपलेले असतानाच अल सुरींनी आपला धोरणविषयक जाहीरनामा लिहून संपविला.

अफगाणिस्तानात त्यांनी जे पाहिले होते त्यावरून त्यांनी अल कायदाचा एक खडे लष्कर या नात्याने पाडाव होईल असे भाकित केले होते. त्यांच्या मते अल कायदाने पाश्चात्य राष्ट्रांच्या हल्ल्यापुढे टिकू न शकणारी एक अवजड शस्त्रधारी वाळवंटात रहाणारी जमात न रहाता केवळ एक मूलतत्व, एक मार्गदर्शक हात बनले पाहिजे. अल कायदा ही एक संघटना किंवा चमू नसून एक आरोळी, एक निमंत्रण, एक संदर्भ आणि एक कार्यपद्धती आहे. २००२पर्यंत तालीबान उद्ध्वस्त झाली व अल कायदाच्या सभासदांनी पलायन केले त्यावरून अल सुरींनी निष्कर्ष काढला होता कीं आता नवीन युद्धें मध्यवर्ती 'निर्नेतृत्व प्रतिकार' असतील व छोट्या-छोट्या कप्प्यातून शत्रूला नमवून, जेंव्हां पूर्ण तयारी होईल तेंव्हां नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांसह जास्त महत्वाकांक्षी युद्ध अल कायदा खुल्या आघाडीवर लढेल.

अल-सुरींनी अशा रणभूमींचा उल्लेखही केला होता: १) अफगाणिस्तान. इथे उरले-सुरले तालीबानी त्यांच्या पाकिस्तानी समर्थकांसह राज्यकर्त्यांना राज्य करायला अशक्य करू पहात होते. २) मध्य आशिया: इथला सोवियेत डिंक निघाला होता व त्याची जागा रशियाच्या बेफाम दडपशाहीने घेतली होती. या दडपशाहीमुळे स्वातंत्र्य मिळवू इच्छिणार्‍य़ा इस्लामी शक्ती मोकळ्या झाल्या होत्या. ३)येमेन आणि मोरोक्को: येथील पाश्चात्यधार्जिण्या राजवटींनी तृणमूल इस्लामी चळवळ दडपली होती. ४) इराक: येथे अमेरिकेच्या स्वारीनंतर एक नव्या तर्‍हेच्या संघर्षाचे भाकित अल सुरींनी केले होते. पाकिस्तानचा आक्रमण सुरू करण्यासाठी वापरायची एक फळी म्हणून उपयोग होता याचाही त्यात उल्लेख होता. पाकिस्तानच्या क्वेट्टा या शहरात जैश-ए-मुहम्मद संघटनेच्या 'सुरक्षित घरा'त अल सुरींना अटक झाली व त्यांना अमेरिकेच्या हवाली करण्यात आले व या पुस्तकप्रकाशनाच्या वेळेपर्यंत एका अज्ञात स्थळी ते अटकेत होते.

अल सुरीचे लिखाण म्हणजे एक बंदुकीच्या चापासारखे होते. त्यांच्या अनुपस्थितीत इतर सभासद त्यांनी दाखविलेल्या धोक्यांना विचारात घेऊन त्यांच्या योजनेबरहुकूम तारा खेचत राहिले. २००४च्या डिसेंबरला अल सुरींनी आपला जाहीरनामा इंटरनेटवर अपलोड केल्याच्या कांहीं महिन्यांतच आणखी एक प्रबंध प्रकट झाला व त्यात अल कायदाच्या मते कुठकुठल्या गोष्टी होऊन गेल्या होत्या व यापुढे काय होईल याबद्दल उहापोह केलेला होता. हे पुस्तकही अल कायदा चळवळीच्या वितळलेल्या गाभ्यातून अनेक प्रथितयश प्रशिक्षित सैनिकांच्या विचारांवर आधारित होते. हा प्रबंध फुआद हुसेन या नावाच्या एका जॉर्डनच्या पत्रकाराने लिहिला होता आणि त्यावेळी फारसा कुणाला माहीत नसलेले जिहादी अबू मुसाब अल-झरकावी[२८] यांच्याबरोबरच्या त्यांच्या तुरुंगातील कोठडीत झालेल्या संभाषणावर आधारित होता. १९६६मध्ये 'अल-झरका' या जॉर्डनमधील गावात जन्मलेले 'झरकावी' आधीपासूनच एक चळवळ्या, आंदोलक म्हणून जॉर्डनमध्ये आणि इतरत्र ओळखला जात होता. ते त्यावेळी गुंडांच्या टोळक्याचे प्रमुख व दारुडे होते. त्यांचे धर्मपिता आणि मानसिक जडणघडण करणारे होते एक जॉर्डनमध्ये रहाणारे पॅलेस्टीनी अबू महम्मद अल-मक्दीसी. तेही तुरुंगात झरकावींच्या कोठडीतच होते.
हे तीघेही जॉर्डनच्या सुवाका तुरुंगात बंदिस्त होते. फुआद हुसेन कुठल्याशा किरकोळ राजकीय गुन्ह्यासाठी त्या तुरुंगात होते तर अल-झरकावी आणि अल-मक्सीदी जॉर्डनमधील राजेशाही उलथून पाडण्याच्या कटाबद्दल. अल-मक्सीदींनी लिहिलेल्या सौदी राजघराण्याला वाळीत टाकण्याची आणि त्यांच्या विनाशाची मागणी करणार्‍या "सौदी राजवटीने केलेला पवित्र वस्तूंबद्दल उघड अनादर"[२९] या पुस्तकामुळे सार्‍या अरब जगताला मूर्छा आली होती आणि सौदी अरेबियामध्ये ९०च्या दशकाच्या मध्यापासून आतापर्यंत उठाव झाले होते. त्यांची आणि अल-झरकावींची ओळख झाली ते दोघे सोवियेत सेनेबरोबर लढायला अफगाणिस्तानला जात असताना. अल झरकावी स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी जिहाद लढायला निघाले होते. ते गुलबुद्दिन हेकमतियारच्या सैन्याच्या साथीने लढले व काबूलपर्यंत गेले. युद्ध संपल्यावर या दोघांना कुठलेही ध्येय राहिले नाहीं. पुन्हा राजेशाहीशी लढायला ते परत जॉर्डनला आले व तिथे तिथल्या गुप्त पोलिसांनी तुरुंगात टाकले. दोन वर्षांनंतर त्यांची ओळख फुआद हुसेनशी झाली.

हुसेन पहिल्याच दिवशी त्यांच्या कोठडीकडे गेले तेंव्हां ते दोघे एका कोपर्‍यात बसले होते व स्वतःची ओळख 'राजकीय बाबींवर लिहिणारा वार्ताहार' अशी करून दिली. 'कुठल्याही इस्लामी गटाशी माझा संबंध नाहीं, पण मी तुमच्या केसचा मीडियामधून मागोवा घेतला आहे व त्यामुळे मला तुमच्या केसमध्ये रस आहे' अशी पुस्ती जोडली. 'जिहादचे सिंह' म्हणून प्रख्यात अल-झरकावींनी त्यांना चहा दिला आणि स्मितहास्य केले. त्यामुळे हुसेन यांचे त्यांच्याबद्दलचे भय निघून गेले.
अल झरकावींनाही हुसेन यांची गरज होती. त्यांना एकांतकोठडीत आठ महिने टाकले होते व त्यांना खूप छळले होते. इतके कीं त्यांच्या पायाच्या बोटांची नखे नव्हतीच. त्यांना शिपायांबरोबर उद्धटपणे वागल्याबद्दल पुन्हा शिक्षा करणार होते, पण तुरुंगातले कैदी बंड आणि दंगल करतील अशी चिन्हे दिसू लागली होती. हुसेननी मध्यस्ती केली व त्यातून एक तडजोड झाली. अल-झरकारी सामान्य तुरुंगात आणले गेले. य़ा उपकारांमुळे अल-झरकावी आणि अल-मक्दीसींनी आपले मनातले सगळे विचार हुसेनना भडाभडा सांगून टाकले. फुआद हुसेन यांच्या सुटकेनंतर ही मुलाखतीद्वारा मिळालेली माहिती वापरून अल कायदा चळवळीची अनेक कुलुपे खोलण्यात (गुपिते ओळखण्यात) त्यांना यश आले. व या माहितीमुळे इतर नेत्यांनीही आपले विचार व लिखाण जे हुसेनना ते 'बाहेरचे' असल्यामुळे देत नव्हते ते मिळू लागले व या सर्वांचे संकलन करून हुसेननी भावी युद्धाबद्दलचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक अल-सुरींच्या पुस्तकातल्या सल्ल्याच्या पाठोपाठ प्रकाशित झाले व त्यामुळे ही योद्ध्यांची जमात व मूलगामी, सनातनी इस्लामी विचारवंत आपल्या विचारांची देवाणघेवाण करत होते आणि जे आधीच घडले होते त्यावरून पुढे काय करायला हवे याबद्दल एक धोरण बनवू पहात होते.[३०]

अल-झरकावी आणि अल-मक्दीसींची १९९९मध्ये तुरुंगातून सुटका झाली. अल-मक्दीसी सलाफी तत्वाच्या बाजूने लढायला जॉर्डनमध्येच राहिले व अल-झरकावी अम्मानमधील रॅडिसन होटेल ऐन १९९९च्या डिसेंबर ३१ला उडवून देण्याचा कट करून अराजक माजविण्यासाठी जॉर्डनम्ध्येच राहिले. पण तो कट फसला व ते आपले कांहीं साथीदार बरोबर घेऊन पाकिस्तानमधून चेचन्याकडे रवाना झाले. पण तिथे त्यांचे सरहद्दीवरील भ्रष्ट जवानांबरोबर बाचाबाची झाली व त्यांनी त्यांची प्रवासासाठी लागणारी कागदपत्रें चुकीची असल्याचे सांगून त्यांना अफगाणिस्तानमध्ये हद्दपार केले. तिथे ते तात्पुरते 'अल-कायदा'त सामील झाले. भांडखोर अल-झरकावींचे म्हणणे होते कीं 'अल कायदा'चे जाळे मऊ झाले आहे. 'अल कायदा'बरोबर भांडून त्यांनी पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरत या शहरात एक वेगळे प्रशिक्षण केंद्र उघडले. आपापसातील निष्ठा पक्की करण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांमध्ये आपापसात लग्ने करण्यास उत्तेजन दिले जेणे करून तो गट एक मोठे विस्तारित कुटुंब बनेल. पण नोव्हेंबर २००१मध्ये पाश्चात्यांशी मैत्रीचे संबंध असणार्‍या उत्तरीय एकजूट संस्थेचे (Northern Alliance) तालीबानविरोधी सैन्याच्या दबावाखाली त्यांना आपला तळ सोडावा लागला होता. अमेरिकेच्या इराकमधील बेतांबद्दल अंदाज करून आणि अमेरिका तिथल्या चिखलात रुतणार असल्याचा अंदाज करून अल-झरकावी पायी इराकला गेले कारण इराकमध्ये आपले बेत जास्त उपयोगी पडतील अशी त्यांची खात्री होती. बिन लादेन यांचाही होरा तोच होता. मग अल कायदाने डिवचणे आणि प्रलोभन दाखविणे या तंत्राचा उपयोग सुरू ठेवला म्हणजे बुश-४३ इराकमध्ये गुंतून रहातील आणि अमेरिकन सैनिकांविरुद्ध सतत रक्तस्त्रावाचे युद्ध दहशतवाद्यांना सुरू करता येईल. CIAने शस्त्रसज्ज केलेल्या आणि CIA आणि पाकिस्तानच्या ISIकडून प्रशिक्षण मिळविलेल्या बिन लादेन व त्यांच्या अनुयायांनी हे डावपेच अफगाणिस्तानमधील पर्वतामध्ये रशियन सैन्याविरुद्ध वापरून आत्मसात् केले होते.
लवकरच अल-झरकावी 'अल तव्हीद वा अल-जिहाद' (एकेश्वरवाद आणि जिहाद) या छोट्या गटाचा 'अमीर' म्हणून आपल्या बालपणीच्या मित्रांबरोबर व नव्य़ा कुटुंबाबरोबर प्रवास करू लागले व लढू लागले आणि लवकरच त्यांनी तायग्रिस आणि युफ्रेटीस[२९] या दोन नद्यांमधील गाळाने बनलेल्या सपाट प्रदेशात इराकमधील अल जझीरा या ओसाड पठारावर त्यांनी आपला तळ ठोकला व त्यांनी आपले जाळे तयार केले. जेंव्हां २००३च्या मेमध्ये अधिकृतरीत्या मुख्य युद्ध संपले तेंव्हा त्यांनी कांही आठवड्यातच हल्ले करायला सुरुवात केली व थोड्याच काळात ते हल्ले इतके क्रूर झाले कीं अल कायदाऐवजी या गटाचेच नांव सगळ्या मथळ्यांत झळकू लागले. या गटाने पाश्चात्य आणि इराकी गोटातही अस्वस्थता निर्माण केली. त्यांनी "फाटाफूट पाडा आणि राज्य करा" हे तत्व अंगिकारले होते. युद्धोत्तर युतीमधील 'आंतरराष्ट्रीय' घटकाला त्यांनी सुरुंग लावला. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे बगदादमधील मुख्यालय त्यांनी एका ट्रकबाँबने उडवले. त्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेचे इराकमधील राजदूत डिमेलो मरण पावले. युतीच्या लष्करालाही करबाला येथे, इटालियनांना अल-नसीरिया येथे, अमेरिकनांना अल-खलीडिया पुलावर, अमेरिकन गुप्तहेरकेंद्राला अल-रशीद हॉटेलमध्ये आणि पोलिश सेनेला अल-हिल्ला येथे सतत सतावण्यात आले. मग जातीय दुफळीचे लक्ष्य करून २००४च्या फेब्रूवारीत अल-झरकावींनी वारंवार व अतीशय क्रौर्यासह करबाला आणि अल-काझीमिया येथील शिया जमातीच्या शेकडोंची कत्तल घडवून आणली आणि हजारोंना जखमी केले तर मार्चमध्ये शिया बहुसंख्य असलेल्या बसरा बंदरावर हल्ला केला. त्याचा धसका इतका होता कीं अमेरिकेने त्यांना पकडून देण्यास मदत करणार्‍याला १ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आणि अल कायदाला इराक युद्धाने जन्म दिलेल्या या उपजमातीतील राक्षसी नरसंहारात कसलाही सहभाग नव्हता असे अतीशय मुलखावेगळे निवेदन प्रसृत करावे लागले. पण अल-झरकावींना केल्याचा पश्चात्ताप नव्हता. २००४च्या मे महिन्यात निकोलास बर्ग या ओलीस ठेवलेल्या अमेरिकन व्यवसायिकाचे 'अल तव्हीद' गटाने केलेले व चित्रफितीवर मुद्रित केलेले शिरविच्छेदन इंटरनेटवर दाखवून ते जगापुढे प्रकाशझोतात आले. जगाला त्यांनी जाहीरपणे सांगितले कीं त्यांनी डोक्यांची 'फसल' केली असून त्यांचे शरीराचे तुकडे करून त्याचे भाग इकडे-तिकडे टाकले होते. अजून बरीच लक्ष्ये त्यांच्यापुढे होती आणि आता कांहीं प्रकरणे संपली असून येणारी प्रकरणे अजून जास्त इन्शाल्ला ती अधीक दारुण आणि कडू असतील असेही त्यांनी जाहीर केले!

अल-झरकावींची रक्तपिपासू युद्धनीती त्यांनी २००४मध्ये बिन लादेनना लिहिलेल्या पत्रात उघड झाली होती. अमेरिकन सैन्याने इराकमध्ये अटक केलेल्या हसन जाल नावाच्या पाकिस्तानी जिहादीकडून घेतलेल्या CDवर ते पत्र मिळाले होते. त्यात अल--झरकावीही अल-सुरींनी म्हटल्याप्रमाणे केवळ अमेरिकेबद्दलचा द्वेष हे एकच उद्दिष्ट अल-कायदाला चळवळीला वाढवण्यास यशस्वी झाले नव्हते याचेच प्रतिपादन करत होते. ९/११च्या घटनेमुळे अरबी जनता चकित झाली पण प्रभावित झाली नाहीं. अल कायदा ही एक एकसंध संघटना बनली होती व तिच्या अमेरिकेवर हल्ला करायच्या एकुलत्या एक उद्दिष्टाने संपन्न अरब जनतेत दीर्घकालपर्यंतचे समर्थन मिळू शकले नव्हते कारण ही जनता पाच वेळा नमाज तर पढायचीच पण डोक्याची टोपी उतरवून डॉलरला सलामही करायची. अल-झरकावींनी बिन लादेनना सल्ला दिला कीं त्यांनी खूप जुन्या कडवट अढ्यांवर भिस्त ठेवावी आणि शिया त्यांना धोका निर्माण करत आहेत असे सुन्नींना पटवून द्यावे जेणेकरून महंमद पैगंबरांच्या वंशावरून उदभवलेल्या बाचाबाचीपर्यंत पोचणार्‍या जातीयवादाचा डोंब उसळू द्यावा. जर शियांना जातीय युद्धात खेचता आले तर आपण उदासीन सुन्नींना त्यांना धोका निर्माण झाला आहे असे जाणवून देऊन पुन्हा जागृत करता येईल असेही त्यांनी बिन लादेनना सांगितले. फुआद हुसेन यांच्या अनुसार ओसामांना हे पटले व २००४च्या हिवाळ्यापासून इराकमधला आपापसातला रक्तपात वाढला आणि अल-झरकावींच्या अनुनायांनी हजारो शियांना आणि पाश्चात्य नागरिकांना कंठस्नान घातले आणि त्या प्रसंगांतील अतिहिंसक तुकडे चित्रित केले आणि अल कायदा संघटनेला मुळापासून हादरविले.

त्यांच्या अनुयायांनी आणखी एक सिद्धांतही अनुसरला. धार्मिक सूडाच्या भावनेने बेसुमार फुगलेल्या अनुयायांना त्यांनी इराकमधील मुख्य गटापासून विखरवले. एक=एक, दोन-दोन जणांना त्यांनी पश्चिमेला दौडवून न कळत युरोपमध्ये घुसविले. त्यांचे छोटे गट बनवले आणि त्यांना अल कायदाचे मार्गदर्शन मिळेल पण नेतृत्व स्वतःचेच असेल असे संघटन केले. अल कायदाच्या गुप्तहेरसंघटनांनी या गटांना २००४च्या माद्रिदच्या रेल्वेस्टेशनवरील बाँबहल्ल्यात आणि २००५च्या लंडनमधील मेट्रो आणि बसहल्ल्यात एकत्र आणले होते.

पण अल-सुरींच्या या योजना फुआद हुसेननी अरबी भाषेत त्यांच्या वर्षानुवर्षे घेतलेल्या मुलाखतींची माहिती २००५मध्ये प्रकाशित झाल्यावरच बाहेर आल्या. यामुळे ९/११ आणि १९९८च्या आफ्रिकेतील दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांसंबंधात हवे असलेले, ओसामांच्या सुरक्षिततेबद्दलचे सल्लागार, सध्या अदृश्श पण इराणमध्ये भूमिगत असण्याची शक्यता असलेले सैफ अल-अद्ल यांचे विचारही वेचले गेले. हुसेन यांचे पुस्तक १०० टक्के काटेकोर नसले तरी त्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला. त्यात भविष्यकाळातील वीस वर्षांचा प्रवास आखलेला होता व त्याचा शेवट २०२०मध्ये एका भीतीदायक अखेरीत होणार होता. ही जणू अल कायदाची दैदिप्यवान, खिलाफतीला पुन्हा जुने वैभव देऊ पहाणारी आणि पाश्चात्य जगाबरोबरच्या निर्वाणीच्या लढाईची योजना होती व त्यानुसार जिहादी अण्वस्त्रें वापरून खराखुरा भीषण दहशतवाद उलगडतील आणि त्यात 'काफीर' जगताचा शेवट होईल अशी योजना आखली होती.

पहिला टप्पा होता जागृती. या टप्प्यात सापाच्या डोक्यावर वार करून त्याला असंघटित प्रतिहल्ला करातला प्रोत्साहन देणे. हा टप्पा २००० ते २००३च्या दरम्यान घडला होता व त्यात अमेरिकेच्या सैनिकांवर, जहाजांवर, दूतावासांवर हल्ले करत-करत ९/११च्या मोठ्या हल्ल्यात त्या टप्प्याचा नेत्रदीपक शेवट झाला होता व हा टप्पा यशस्वी रीत्या पार पडला असाच निर्वाळा जाणत्यांनी दिला. या हल्ल्यामुळे डिवचली गेलेली अमेरिका प्रतिहल्ला करण्यासाठी मध्यपूर्वेत ओढली गेली होती व त्यामुळे अमेरिकन लक्ष्यें जवळ आली व सोपी झाली. आता 'अल कायदा'ला जणू श्रोतृवर्ग लाभला होता!

दुसर्‍या टप्प्याचे नाव होते 'डोळे उघडणे'. २००६ साली संपलेल्या या टप्प्याचे उद्दिष्ट होते अमेरिकाविरोधी चळवळीचा शियाविरोधी बंडात विस्तृती.होणे. अल-झरकावींच्या या योजनेलाही ओसामांची संमती मिळाली. या टप्प्यात अमेरिका आणि युरोपीय देश मुस्लिमविरोधी आहेत असा आभास निर्माण करणे हेही उद्दिष्ट होते. हाही टप्पा यशस्वी झाला होता.

हे पाकिस्तानसारख्या देशात दिसू लागले होते कारण मुस्लिम देशवासियांना व्हिसा देण्याबाबतचे निर्बंध कडक झाल्यामुळे सुखवस्तू मुसलमनांनाही आपला देश सोडणे कठीण होऊ लागले होते. त्यामुळे मुस्लिम पैसा पाश्चात्य देशांत यायच्याऐवजी पाकिस्तानसारख्या देशांत परत जाऊ लागला. बँकांना वैभव आले, स्थावर वास्तूंचे भाव वाढले, इस्लामचे पुनरुत्थान झाले आणि पाकिस्तानचा पश्चिमेकडे कलणारा मध्यमवर्ग मशीदींकडे वळला. श्रीमंत व्यवसायी लोक मद्रासांना आणि तत्सम सेवाभावी संस्थांना जाऊ लागला. भयामुळे आणि तिटकार्‍यामुळे सर्व स्तरांतील पाकिस्तान्यांना बाजू निवडणे आवश्यक बनले व उच्चभ्रू समाज-लष्करातील कंपूच नव्हे तर पाकिस्तानचा परमाणूप्रकल्प चालविणारे सुशिक्षित शास्त्रज्ञसुद्धा इस्लामकडे व पाश्चात्यांच्या विरुद्ध झुकले.

हुसेन यांच्या पुस्तकात इस्रायलबद्दलही विचार होते. इस्रायलवर २००६मध्ये झालेल्या युद्धासारखी नवी आणि खर्चिक युद्धे लादली पाहिजेत, युद्धाला कंटाळलेले इस्रायली युद्ध हरतील व त्यातून हिजबुल्लासारख्या संघटना सशक्त होतील आणि असे विजय मिळाल्यास जिहादींची संख्याही फुगेल अशी मतें त्यात व्यक्त केलेली आहेत.

इंटरनेटचा उपयोग करण्याबद्दलही यात चर्चा आहे. अल सुरी आणि फुआद हुसेन यांच्या पुस्तकातील विचार येथे कुणालाही वाचता येतील. एकाद्या विश्वविद्यालयाला नागरी युद्धे, अण्वस्त्रांबद्दलची माहिती आणि धार्मिक विचारांचा प्रसार याचे काम इंटरनेटद्वारा करता येईल. पाश्चात्यांची नीतिमूल्ये आणि संस्कृती यांच्यावर बाँबहल्ला वापरणार्‍या संस्कृतीने हल्ला केला आहे आणि त्यांच्याकडे याच्याशिवाय इतर कांहींच देण्यासारखे नाहीं अशा प्रचाराला तोंड देण्यासाठी अल कायदाला विचारांच्या युद्धात पडावे लागणार होते. पण आता अनेक पुस्तके अपलोड केलेली होती व अनेक विचार त्यांत उपलब्ध होते.
या पुस्तकातला तिसरा टप्पा होता 'उठणे आणि उभे रहाणे' हा होता. मध्यपूर्वेतील कुठल्याही राष्ट्राने जर सत्ता गमावली तर त्याचा फायदा घ्यायला अल कायदाने तयार असले पाहिजे असा विचारही होता. जरी हे राष्ट्र सुन्नी असले तरी राजनैतिक कारणांसाठी इराणच्या शियांबरोबर उभे होते. पण तिथली मुस्लिम सनातनी लोक बशर अल-अस्साद यांची हुकुमशाही संपविण्याच्या संधीचीच वाट पहात होते. लेबॅनॉनचेही तुकडे पाडायचे होते. या सर्व देशातल्या आणि जॉर्डनच्या सुन्नींना एका उद्देशासाठी एकत्र आणणे जरूरीचे होते.

२०१०पासून तीन वर्षें अल कायदा चौथ्या टप्प्यात शिरायचा होता (हे पुस्तक २००७साली प्रसिद्ध झाले आहे. एव्हाना शिरलाही असेल). तोवर नावडत्या/तिरस्कृत अरबी सरकारांचा पाडाव झालेला असेल असा लेखकाचा होरा होता. या काळात डॉलरऐवजी सोने हे चलन वापरून जागतिक आर्थिक परिस्थितीला धक्का लावण्यासाठी अरब तेल जाळायची त्यांची योजना होती. तसेच सायबर-दहशतवादही.सुरू करणार आहेत. तोवर अमेरिका बरीच कमजोर होऊन सुपरपॉवर उरणार नाहीं, ती आपल्या कोशात जाईल व इस्रायल स्वत:चे रक्षण करू शकणार नाही. २०१३पर्यंत ही परिस्थिती आली कीं योजना पाचव्या टप्प्यात जाऊ शकेल व एका इस्लामी राजवटीची घोषणा करता येईल. इस्लामी जगतात पाश्चात्यांचा पगडा कमजोर झाल्यामुळे अल कायदाच्या विचारांना विरोध रहाणार नाहीं. व त्यातून शेवटचा "संपूर्ण (शक्तीनिशी) टक्कर" हा टप्पा सुरू होईल. हा 'काफीरां'विरुद्धचा शेवटचा व प्रलयंकारी संघर्ष असणार होता आणि यात नरसंहाराची सर्व-परमाणू, रासायनिक व जैविक-अस्त्रें वापरून संपूर्ण हुकुमत मिळवून जागतिक खिलाफतीची स्थापना करण्याची योजना होती. कुराणातील एक श्लोकाचा उल्लेख करून हुसेन लिहितात कीं "आता सत्याचे आगमन झाले असेल आणि असत्याचा विनाश. कारण असत्याचा साहजीकच विनाश होणार. आम्ही शत्रूला घाबरवून सोडू आणि त्याला पळवून लावू!" २०२०पर्यंत सारे जग १५० कोटी मुसलमानांच्या मालकीचे असेल!

अल कायदाच्या विचारवंतांच्या मते शेवटी या सर्व योजनेला पुढे नेण्यासाठी लागणारा प्रज्वलक कोण असेल याचा अंदाज हुसेननी लावला आणि तो होता इराण! १९९६ आणि २००२च्या दरम्यान ज्यांनी हुसेन यांच्याशी संभाषण केले होते त्यांनी असे प्रतिपादन केले कीं अण्वस्त्रप्रकल्पाच्या प्रश्नावरून अमेरिकेने सुरू केलेले युद्ध हे साध्य करून देईल म्हणून ते हेतुपुरस्सर तसा प्रयत्न करत होते. इराणच्या परमाणूसुविधांवर हल्ला करण्याचा मोह अमेरिका टाळू शकणार नाहीं असे भाकित त्यांनी केले होते. हुसेननी २००५साली लिहिले कीं अल-झरकावी आणि अल कायदा यांनी ही योजना आधीच कार्यरत केलीच होती. इराणने अणूबाँब बनविण्यासाठी लागणारे सर्व घटकभाग आता मिळविले आहेत या गुप्तचरांनी आणलेल्या माहितीवर त्यांचे हे डावपेच आधारलेले होते. त्यांच्या प्रत्येक परमाणू, औद्योगिक आणि लष्करी सुविधांवर अमेरिका आणि इस्रायल एकाएकी जोरदार हवाई हल्ले करतील अशी इराणची अटकळ होती आणि इराणने असेल-नसेल त्या साधनांनी प्रतिहल्ला करण्याची योजनाही आखली होती. त्यात तेल उद्योगावर हल्ला करणाचा मनसुबा होता. पण त्यानंतऱच्या योजनेनुसार अमेरिकनांची आणि ब्रिटिशांची इराण इराकमध्ये गोंधळ माजविण्याचा कट करेल अशी भीती अटकळ खोटी ठरवून इराणने गुप्तपणे प्रशिक्षण दिलेले ३०,००० सैनिक दोन लबॅनीज जिहादींच्या नेतृत्वाखाली सार्‍या जगभरातील अमेरिकन आणि इस्रायली लक्ष्यांवर हल्ले करणार होते. गाझातून हमास आणि लेबॅनॉनमधून हिजबुल्ला इस्रायलवरही हल्ले करणार होते. या हल्ल्यामुळे सुन्नींचे समाधान होईल आणि इराणमध्ये गोंधळ माजून त्यांच्या सीमा उघड्या होतील आणि मग अल कायदाचे हस्तक तिथे घुसतील अशी योजना होती. सीरियालाही धोका निर्माण केला जाईल आणि अमेरिकेने अपेक्षेप्रमाणे सीरियावर हल्ला केल्यास अल कायदाचे हस्तक तिथे मुक्तसंचार करून इराकच्या प्रचंड मोठ्या सीमेवरून लेबॅनॉनमध्ये घुसणार होते.

एकाद्याला हा कल्पनाविलास वाटला असता, पण ज्या अचूकतेने आणि पद्धतशीरपणे या योजनेतील आधीच्या घटना घडविण्यात आलेल्या होत्या त्यावरून अशी कल्पना करणे धोक्याचेच ठरले असते. पाश्चात्यांना सतावणार्‍या सदसद्विवेकबुद्धीपासून मुक्त असलेले हे मुस्लिम तरुण आणि या मुस्लिम तरुणी भयंकर विनाशकारी शस्त्रास्त्रें वापरून या चक्रवाताचा फायदा घेणार होती. या तर्‍हेच्या संघर्षांत, त्यातही एक बाजू अण्वस्त्रे वापरत असताना, पाश्चात्यांच्या मित्रराष्ट्रांची निष्ठा त्यांच्या शत्रूंच्या क्रूरतेइतकीच महत्वाची ठरेल.!
----------------------------------------------
[१] अशा देशभक्त शास्त्रज्ञांना असे छळण्याची ही सारी पापे मुशर्रफ कधी व कुठे फेडणार आहे देव जाणे!
[२] शेवटी त्यांना मारले गेले त्यात कुणाकुणाचा किती हात होता हे कधी कळेल काय?
[३] 'डॉन'सारख्या मातब्बर वृत्तपत्रालासुद्धा कसे लष्करशहांपुढे लांगूलचालन करावे लागायचे याचे हे बोलके पण 'न पचणारे' उदाहरण आहे!
[४] रॉबर्ट गालुच्ची जवळ-जवळ तीस वर्षें खानसाहेबांच्या मागावर होते.
[५] राष्ट्राध्यक्ष केनेडींनी स्थापलेली Arms Control and Disarmament Agency ही संघटना.
[६] Verification and Compliance
[७] Counter-proliferation
[८] Bureau of International Security and Non-Proliferarion
[९] मायकेल रोझेंथाल याच्याबद्दलची माहिती इथे मिळेल: http://www.bnl.gov/education/nnss/Rosenthal.asp. परराष्ट्रमंत्रालयातून बाहेर पडल्यावर त्यांनी मे २००७मध्ये Brookhaven National Laboratory मध्ये अण्वस्त्रप्रसारविरोध आणि संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून नोकरी घेतली.
[१०] Agreed Framework with North Korea
[११] रॉबर्ट ओप्पनहायमर हे मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक होते. या प्रकल्पातूनच अणूबाँबचा शोध लागला.
[१२] हे पुस्तक लिहिले गेले तेंव्हा तालीबानचा पुनर्जन्म झालेला नव्हता!
[१३] American Enterprise Institute आणि Washington Institute on Near East Policy
[१४] Revolutionary Guardसाठी फारसी भाषेतला शब्द (इराणमध्ये अनेक वर्षें राहिलेल्या श्री. विनायक रानडे यांच्या सौजन्याने)
[१५] यात ३०४ अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले होते.
[१६] Under Secretary of State for Political Affairs
[१७] हे कार्टर यांच्या कारकीर्दीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते.
[१८] Nuclear Non-Proliferation Treaty
[१९] झिरजमीन-२७". फारसी भाषेत 'झिरजमीन' म्हणजे जमीनीखाली. आणि '२७' हा आकडा खोमेनींच्या १९७९च्या क्रांतीनंतर झालेल्या २७ वर्षांसाठी होता!
[२०] IAEAच्या असेल त्या परिस्थितीत सत्य शोधण्याच्या चिकाटीचे कौतुक केले पाहिजे.
[२१] Brinkmanship म्हणजे एकादी धोकादायक परिस्थिती किंवा एकादे भांडण दुसरा पक्ष नमते घेईल या आशेने सुरक्षिततेच्या रेघेपलीकडे जाईल इतके ताणायचे! पण दोन्ही पक्ष जर Brinkmanship करत असतील तर युद्ध/महायुद्ध पेटू शकते.
[२२] या पुस्तकात गोष्ट सदैव मागच्या-पुढच्या काळात येत-जात रहाते! २००६च्या हिवाळ्यातील निवडणुकांनी सुरू झालेला हा परिच्छेद मधेच २००२च्या उन्हाळ्यात जातो व त्यामुळे वाचक एकाग्रचित्ताने ते वाचू शकत नाहींत! या पुस्तकाचे संपादन अजून सुधारायला हवे होते असे वाटते.
[२३] या कारवाईला अमेरिकेत Troop Surge या नावाने संबोधले जाते! फ्रेडरिक कागन AEIचे अभ्यासक आणि West PointMilitary Academyचे इतिहासतज्ञ होते.
[२४] अली अन्सारी हे स्कॉटलंडच्या University of St. Andrews मधील Iranian Instituteचे संचालक होते.
[२५] मध्यपूर्वेचे असे लिहायला हवे होते कारण अहमदीनेजाद अरब नसून फारसी आहेत!
[२६] विकिपीडियातील शोधातून कळले कीं अबू या शब्दाचा अर्थ संत किंवा बाप असा आहे. अबू हसन म्हणजे हसनचा बाप. ('बिन'च्या उलटा. बिन म्हणजे "son of"). पण हे नांव दहशतवादी स्वतःसाठी कां निवडतात हे एक कोडेच आहे!
[२७] अरबी भाषेत साला म्हणजे प्राचीन ("ancient one"). प्रेषक महंमद यांच्या सोबत्यांसाठी हा शब्द वापरला जातो आणि सालाफी म्हणजे अतीशय शुद्ध असे मुसलमान जे त्यांच्या धर्माला पुन्हा त्या काळात आणि प्राचीन ग्रंथांच्या शब्दश: विवरणाकडे नेऊ इच्छितात व ज्याला बाकीचे जग प्रगती म्हणते त्या शेकडो वर्षांच्या र्‍हासाला काढून टाकू इच्छितात.
[२८] झरकावींबद्दल जास्त माहिती http://en.wikipedia.org/wiki/Abu_Musab_al-Zarqawi या दुव्यावर उपलब्ध आहे.
[२९] The Evident Sacrileges of the Saudi State
[३०] आपल्यातल्या कुणी अरबी भाषा जाणणार्‍याने Al-Zarqawi: The Second Generation of Al Qaeda या हुसेनलिखित पुस्तकाबद्दल भारतीयांना परिचित करायला हवे. फुआद हुसेनबद्दल माहिती वाचा http://en.wikipedia.org/wiki/Fouad_Hussein या दुव्यावर!